आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी साेमवारी अपेक्षेप्रमाणेच विरोधी पक्षांच्या अामदारांनी मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षणावरून आक्रमकता दाखवत विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. मुख्यमंत्री विधान भवनात प्रवेश करण्यासाठी येत असतानाच विरोधकांनी घोषणाबाजी केली आणि “या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, “कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा दिल्या. तसेच दुष्काळी मदत म्हणून सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये देण्याची मागणीही केली. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसी प्रवर्गात एक वेगळा उपप्रवर्ग तयार करून, मराठ्यांना स्वतंत्र १६ टक्क्यांचे आरक्षण द्यायला हवे होते, अशी मागणी पत्रकारांशी बोलताना केली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार मोठ्या संख्येने पायऱ्यांवर उपस्थित होते.धनगर अारक्षणाबाबत विखे पाटील म्हणाले, ‘निवडणुकीपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मात्र आता धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला नव्हे तर केंद्राला असल्याची कातडीबचाव भूमिका त्यांनी घेतली आहे.
यासंदर्भात राज्य सरकारला अधिकार नाहीत तर धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन का देण्यात आले? ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’कडून सर्वेक्षण का करून घेण्यात आले? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा’, अशी मागणीही त्यांनी केली.
मुस्लिम अारक्षणासाठी एमअायमचे अामदार आक्रमक
मुस्लिम आरक्षणावरून मुस्लिम आमदार आक्रमक झाले आहेत. ‘मुस्लिम समाजाने जल्लोष कधी करायचा याची मुख्यमंत्रीसाहेबांनी तारीख सांगावी’, अशी मागणी आमदार वारिस पठाण यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देत असाल तर आम्हालाही आरक्षण पाहिजे, अशी भूमिका मांडत हे सरकार मुस्लिमविरोधी असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या वेळी एमआयएमचे औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलीलही उपस्थित होते. या दोघांनीही मुस्लिम आरक्षणाच्या मागणीचे बॅनर घेऊन विधिमंडळ परिसरात प्रवेश केला होता.
दुष्काळग्रस्तांना द्या हेक्टरी ५० हजारांची मदत
सरकारने दुष्काळग्रस्तांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे, फळबागा, केळी, उसाला हेक्टरी १ लाख रुपये अनुदान जाहीर करावे, यंदाच्या खरिपात घेतलेले पीक कर्ज सरसकट माफ करावे आणि प्रचलित दुष्काळी उपाययोजना शिथिल करून १०० टक्के वीज बिल माफी, विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारच्या खासगी व शासकीय अभ्यासक्रमांचे सर्व प्रकारचे शुल्क माफ करावे, चारा छावण्या सुरू कराव्यात, पिण्याच्या पाण्याचे व रोजगाराचे नियोजन करावे, अशा मागण्याही विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व धनंजय मुंडे यांनी केल्या.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवावा
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा कालावधी वाढवावा, या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन निवेदन दिले. अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याबाबत सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, छगन भुजबळ, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.