Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Maratha hostel place will fixed Soon

मराठा वसतिगृहासाठी लवकरच जागा निश्चित; जिल्हाधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी

प्रतिनिधी | Update - Aug 07, 2018, 11:11 AM IST

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत मराठा वसतिगृहासाठी लवकरच जागा निश्चित होणार असून, त्यासाठी एकूण चा

 • Maratha hostel place will fixed Soon

  सोलापूर- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत मराठा वसतिगृहासाठी लवकरच जागा निश्चित होणार असून, त्यासाठी एकूण चार ठिकाणी जागेची पाहणी करण्यात आली. योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी महाविद्यालयीन स्तरावर व जिल्हा स्तरावर कॅम्पचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.


  डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा आढावा घेण्यासाठी गठीत समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते.


  मराठा वसतिगृहासाठी शहरातील सात रस्ता येथील शासकीय दूध डेअरी, गुरुनानक चौकात सिंचन भवनची जागा, आयटीआयमधील एक इमारत आणि जय भवानी शाळा या चार ठिकाणच्या जागेची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यापैकी जयभवानी शाळेची जागा तत्काळ उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एकूण १३ खोल्या असून, ४० विद्यार्थी राहू शकतात. या वसतिगृहासाठी लवकरच जागा निश्चित करण्यात येणार आहे.


  राजर्षी शाहू महाराज शुल्क शिष्यवृर्ती योजनेंतर्गत किती विद्यार्थ्यांना लाभ मिळाला? १०० टक्के फी घेतलेल्या महाविद्यालयांनी ५० टक्के फी परत केली किंवा नाही? याबाबत सविस्तर माहिती देण्याबाबत संबंधित महाविद्यालयांना सूचना दिल्या. त्याबाबत १० ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक होणार असून फी माफ न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.


  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची निवासी जागेअभावी गैरसोय होऊ नये, त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी या योजनेतून विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.


  रानमसलेत बंद, चक्काजाममुळे वाहतूक विस्कळीत
  उत्तर सोलापूर : आरक्षणसाठी रानमसले येथे मराठा समाजाने सोमवारी गाव बंद ठेवून रास्ता रोको केला. गावातील सर्व किराणा दुकाने, हॉटेल, कृषी केंद्र, वाहन व्यवसाय, पानटपरी, शाळा आदी व्यवहार बंद राहिले. बसस्थानकाजवळील शिवाजी चौकात ठिय्या मारत चक्काजाम आंदोलन केले. यामुळे तासभर वाहतूक विस्कळीत झाली.


  प्रास्तविकात प्रभाकर गायकवाड यांनी आंदोलनामागची भूमिका मांडली. सेवानिवृत्त प्राध्यापक उद्धव गरड यांनी मराठा समाजास आरक्षणाची अत्यंत गरज असल्याचे सांगितले. इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण हे पूर्ण कायद्याच्या चौकटीत बसवून द्यावे. नोकरी नाही, व्यवसायासाठी भांडवल, योग्य मार्गदर्शन शासनाकडून मिळत नाही. यामुळे मराठा समाजाची वाताहत होत आहे. शासनाने समाजाचा अंत न पाहता त्वरित आरक्षण द्यावे, अन्यथा भविष्यात हा प्रश्न जटील होईल, असे ते म्हणाले. या वेळी बालाजी गरड, नंदकुमार गरड यांनीही मार्गदर्शन केले. तालुका पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. सहायक पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. आंदोलनात लक्ष्मण शिंदे, माजी सरपंच नितीन गरड, राजाराम गरड, बालाजी गरड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल गरड, प्रभाकर गरड, संतोष गरड, शशिकांत गरड, विशाल गरड, किशोर गरड , समाधान गरड यांच्यासह मराठा समाजबांधव व ग्रामस्थ सहभागी होते.


  टेंभुर्णीत जेलभरो, १२५ ताब्यात
  टेंभुर्णी : आरक्षणासाठी सकल मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी सकाळी ११ वाजता टेंभुर्णी (ता. माढा) पोलिस ठाण्यामध्ये जेल भरो आंदोलन केले. १२५ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. ग्रामपंचायत कार्यालय येथे जमून सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते जेलभरो आंदोलनासाठी पोलिस ठाण्यात गेले. जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय पाटील भीमानगरकर, माजी सभापती तुकाराम ढवळे, लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिनेश जगदाळे, किरण चव्हाण आदी आंदोलनात सहभागी झाले होते.


  मंगळवेढ्यात रक्तअंगठा निवेदन
  मंगळवेढा : आरक्षणासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता मराठा समाजाच्या ४४३ जणांनी रक्ताने अंगठ्याच्या निशाणीचे तहसीलदारांना निवेदन दिले. तसेच सरकारचा निषेध केला. तहसीलदार अप्पासाहेब समिंदर यांनी निवेदन स्वीकारले. मराठा समाजाने लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले. मात्र, शासनाने त्याची दखल घेतली नाही. या दिरंगाईमुळे मराठा समाजातील युवकांनी बलिदान दिले. याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे. यासाठी राज्यातील सर्व ठिकाणी साखळी पद्धतीने ठिय्या आंदोलन केले जात आहे. शेकडो युवकांच्या रक्ताने अंगठ्याची निशाणीची भावना लक्षात घेऊन शासनाने न्याय द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.


  माळशिरसला महिलांचा ठिय्या
  अकलूज : सोमवारी माळशिरस तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. तरुणांसह महिलांनी यात सहभाग घेतला. शाहीर राजेंद्र कांबळे यांच्या पोवाड्यातून समाजाच्या मागण्या मांडण्यात आल्या. खासदार विजयसिंह मोहिते यांच्यासह अनेकांनी आंदोलन ठिकाणी भेट दिली. जनसेवा संघटनेनेच्या आंदोलकांसाठी अल्पोपहाराची सोय केली होती. बुधवारी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान, जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे . खासदार मोहिते, मदनसिंह मोहिते, बाबाराजे देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शंकर देशमुख, उत्तम माने, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रिया नागणे आदींनी पाठिंबा दर्शवला.


  जिल्हास्तरीय समिती नेमली
  शुल्क माफी व वसतिगृहासाठी जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमली आहे. शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ़ महेंद्र चितलांगे हे सचिव असणार आहेत़ या समितीत उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ़ राजेंद्र धामणस्कर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ सुनील घाटे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ़ गणेश मंझा, वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ शशिकांत हलकुडे, सिंहगडचे प्राचार्य डॉ़ शंकर नवले, हिराचंद नेमचंद महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ़ संतोष कोटी, लोकमंगल कृषी महाविद्यालयाचे प्रमुख पी. बी. शेणमारे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सपना घोळवे, आदिवासी विकास महामंडळाचे प्रकल्प अधिकारी रामचंद्र सोनकवडे आणि उद्योजकता केंद्राचे सहायक संचालक कुंभार राजे यांचा समावेश आहे.


  पंढरपुरात निवेदनावर रक्ताने हजार सह्या
  पंढरपूर : आरक्षण मागणीसाठीच्या मराठा समाज ठिय्या आंदोलनाला पाचव्या दिवशी साेमवारीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आंदोलनाच्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती. दरम्यान, सकाळी मराठा समाजाच्या एक हजार तरुणांनी निवेदनावर रक्ताने स्वाक्षऱ्या केल्या. मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात येणार आहे. भोसे जिल्हा परिषद गटाततील गावातील युवकांसह ग्रामस्थ घोषणाबाजी करत आंदोलनात सहभागी झाले. भोसे जिल्हा परिषद गटातील दीड हजारांवर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवला.

Trending