आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता रस्त्यांवरची आंदोलने बंद; समाजकंटकांना पकडून देणार; मराठा माेर्चाची घाेषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी झालेल्या अांदाेलनाच्या वेळी काही समाजकंटकांनी हिंसाचार घडवून अाणला. त्याचा अाम्ही निषेधच करताे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान थांबले पाहिजे, या भूमिकेतून यापुढे मराठा समाजातर्फे रस्त्यावरचे कोणतेही आंदोलन करणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घाेषणा पुण्यातल्या मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली. हा निर्णय सध्या फक्त पुण्यापुरता असला तरी अाैरंंगाबादेत हाेणाऱ्या राज्य समन्वय बैठकीतही याबाबतचा प्रस्ताव अाम्ही ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


९ अाॅगस्ट राेजी पुण्यातल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने मराठ्यांची बदनामी झाली. त्यावर आत्मक्लेश करण्यासाठी १५ ऑगस्टला मराठ्यांच्या घरोघरी चूल बंद आंदोलन करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे रास्ता रोको, रेल रोको यांसारखी समाजाला वेठीला धरणारी व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनांऐवजी जिल्हा- तालुका स्तरावर साखळी उपोषण केले जाईल, अशी घोषणाही मराठा क्रांती मूक मोर्चाच्या समन्वयकांनी केली. 


गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे ठिय्या आंदोलन नियोजनाप्रमाणे शांततेत पार पडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्वांना घरी परतण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, आंदोलनात घुसलेल्या बाह्य शक्तींनी या वेळी धुडगूस घातला. क्रांती मोर्चाने कधीही हिंसेचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे हिंसक कारवाया करणाऱ्यांचे आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणीही मराठा क्रांती मूक मोर्चाच्या वतीने करण्यात आला. मोर्चाचे आयोजक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे, विराज तावरे आदी पत्रकार परिषदेस उपस्थित हाेते. 


पुण्यातल्या आंदोलनात पत्रकार व पोलिसांवर झालेल्या हल्ल्याबद्दल कुंजीर यांनी सकल मराठा समाजाच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. 'पोलिसांनी आंदोलकांना चांगली वागणूक दिली. परिस्थिती खूप संयमाने हाताळली; पण काहींनी मराठा समाजाला गालबोट लावण्याच्या, विध्वंस करण्याच्या हेतूनेच आंदोलनात माणसे पाठवली होती. त्यांची नावे पोलिस तपासात पुढे येतीलच,' असे विकास पासलकर यांनी सांगितले. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावरील ठिय्या आंदोलनाव्यतिरिक्त शहरात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या, त्याच्याशी आमचा संबंध नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे पोलिसांनी समाजकटकांना पकडावे. दरम्यान, या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 


अाचारसंहितेचे फलक लावूनच अांदाेलन 
कुंजीर म्हणाले, यापुढील आंदोलने आचारसंहितेचा फलक लावून केली जातील. आमच्या आंदोलनांमध्ये बाहेरच्या शक्ती घुसल्या तरी आमचे स्वयंसेवक त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करतील. आचारसंहितेनुसार येत्या चक्री उपोषणासह सर्व आंदोलने शांततापूर्ण मार्गाने होतील. अन्य कोणत्याही व्यक्तीने स्वतंत्रपणे आंदोलन करू नये. केल्यास त्यांचा मराठा क्रांती मूक मोर्चाचा संबंध राहणार नाही. मराठ्यांची बदनामी होईल, असे कोणतेही भडक संदेश सोशल मीडियातून पसरवू नयेत. 


ताेडफाेड, हिंसाचार मान्य नाहीच 
'पुण्यातल्या ठिय्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले. ही घटना सकल मराठा समाजाला मान्य नाही. त्यामुळेच राज्यभरात योग्य संदेश देण्याच्या उद्देशातून या नुकसानीची भरपाई करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तोडफोड, हिंसा आम्हाला मान्य नाही. आरक्षण व सरकार दरबारीच्या इतर मागण्यांसाठी सनदशीर मार्गानेच आंदोलन झाले पाहिजे,' असे मराठा क्रांती मूक मोर्चाचे आयोजक विराज तावरे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...