आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद MIDC मधील हिंसेची CID चौकशी करा..15 ऑगस्टपासून एकवेळ चूल बंद आंदोलन-विनोद पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औंरगाबाद - वाळूज एमआयडीमध्‍ये 60 कंपन्‍यात झालेली तोडफोड मराठा आंदोलकांनी केलेली नाही. या तोडफोडीशी आमचा काहीही संबंध नाही. काही जणांतर्फे आंदोलनाला गालबोट लावण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. त्‍यामुळे या परिसरांत हिंसा कोणी केली, याची सीआयडी चौकशी करावी व आरोपींना अटक करण्‍यात यावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्‍वयक विनोद पाटील यांनी केली आहे. औरंगाबादेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

हा हल्‍ला उद्योगांवर नव्‍हे, शहराच्‍या अस्मितेवर
यावेळी विनोद पाटील यांनी वाळूज एमआयडीसीमध्‍ये झालेल्‍या हल्‍ल्‍याचा निषेध केला. वाळूज एमआयडीसीमध्‍ये अनेक कंपन्‍यांमध्‍ये मराठा तरूण मोठ्या प्रमाणात रोजदांरीवर आहे. त्‍यामुळे या कंपन्‍यांवर मराठा तरूण हल्‍ला करूच शकत नाही, असे पाटील म्‍हणाले. या शहरात उद्योग यावेत व तरूणांच्‍या नोकरीचा प्रश्‍न सुटावा, अशीच आमची इच्‍छा आहे. रोजगाराच्‍या प्रश्‍नावरच मराठा आंदोलन केले जात आहे. असे असताना याच कंपन्‍यांवर आम्‍ही हल्‍ला का करू, असा सवाल त्‍यांनी उपस्थित केला. तसेच हा हल्‍ला केवळ उद्योगांवर नसून शहराच्‍या अस्मितेवर आहे, असे ते म्‍हणाले.

 

उद्योजकांशी चर्चा करण्‍यास तयार
गुरूवारी वाळूज एमआयडीसीमध्ये झालेल्‍या हिंसेमुळे उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्‍यामुळे संध्‍याकाळी पत्रकार परिषद घेत उद्योजकांनी येथून बाहेर पडण्‍याचा निर्वाणीचा इशारा दिला होता. यावर बोलताना विनोद पाटील म्‍हणाले की, 'उद्योजकांनी हाक दिल्‍यास आम्‍ही अर्ध्‍यारात्रीही त्‍यांना मदत करण्‍यास तयार आहोत. पत्रकार परिषदेनंतर आपण उद्योजकांशीही चर्चा करणार आहोत. यावेळी त्‍यांच्‍या समस्‍या जाणून  घेऊन त्‍यांना शक्य ती सर्व मदत करण्‍याचा आम्‍ही प्रयत्‍न करू, अशी माहिती पाटील यांनी दिली. 

 

15 ऑगस्‍टपासून एकवेळ चूलबंद आंदोलन

मराठा आंदोलनाना आता हिंसक वळणं लागत असून पूर्वी शांततेने होणारे आंदोलन आता भरकटले आहे का? या प्रश्‍नावर विनोद पाटील म्‍हणाले, 'गुरूवारी औरंगाबाद शहरात पूर्णपणे शांततामय पद्धतीने आंदोलन करण्‍यात आले. यांदरम्‍यान अडचणीत असलेल्‍या प्रवाशांना आंदोलकांनी रस्‍ता दिला. हज यात्रेकरूंनाही आम्‍ही वाट करून‍ दिली. संध्‍याकाळी राष्‍ट्रगीताद्वारे आंदोलनाचा समारोप करण्‍यात आला. यामुळे आंदोलन भरकटले असे म्‍हणता येणार नाही. मात्र काहीजण आंदोलनाला गालबोट लावण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. ते कोणत्‍याही जातीचे असोत, त्यांचा आम्‍ही निषेधच करतो.' आंदोलनाच्‍या पुढील दिशेबद्दल विनोद पाटील यांनी राज्‍यभरात 15 ऑगस्‍टपासून एकवेळ चूलबंद आंदोलन करण्‍यात येईल, अशी माहिती दिली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...