आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूज तोडफोडीशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही, घटनेची सीआयडी चौकशी करा : विनोद पाटील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाळूज औद्योगिक वसाहतीत झालेली जाळपोळ आणि तोडफोडीचा आम्ही निषेध करतो. तोडफोडीशी मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही. कंपन्यांत घुसून तोडफोड कुणी केली याचा उद्योजक व पोलिसांनी शोध घ्यावा. या हिंसाचाराची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा करावी, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली. 


पाटील म्हणाले की, अशा प्रकारच्या घटना घडल्या तर शहरात नवीन उद्योग येणार नाहीत. विविध कंपन्यांत मराठा मुले-मुली मोठ्या संख्येने काम करतात याची जाण आहे. वाळूजचे आंदोलन शांततेत सुरू होते. राष्ट्रगीतानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले. मग कंपन्यांवर हल्ला कुणी चढवला याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही मदत घेऊन सखोल चौकशी करावी. १० ऑगस्टपर्यंत सरकारने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने आम्ही १५ ऑगस्टपासून एक वेळ चूल बंद व अन्न त्याग आंदोलन सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी राजेंद्र जंजाळ, अभिजित देशमुख, सुरेश वाकडे पाटील, रवींद्र काळे, राजेंद्र दाते पाटील, किशोर चव्हाण, सुवर्ण मोहिते, विजयकाकडे पाटील, रमेश गायकवाड, सतीश वेताळ पाटील, सुकन्या भोसले, प्रतिभा जगताप आदी उपस्थित होते. 


दानवेंच्या मागणीचे स्वागत 
भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी मराठा ओबीसी आरक्षण सहज देणे शक्य असल्याचे वक्तव्य केले आहे. याबाबत विचारले असता, चव्हाण म्हणाले, मराठवाडा निझामशाहीत होता तेव्हा मराठे कुणबीच होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कुणबीतून वगळण्यात आले. हा पुरावा ठोस आहे. आम्ही अनेक वर्षांपासून पुराव्यासह हीच मागणी करतोय. फरक एवढाच की दानवे आज बोलताहेत. त्याऐवजी प्रत्यक्ष कृती करावी. ते सत्तेतील महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. 

बातम्या आणखी आहेत...