आचारसंहितेपूर्वीच करा मराठा / आचारसंहितेपूर्वीच करा मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण; मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत इशारा, 8 मार्चला आंदोलन  

आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच ११ मार्चपर्यंत सरकारने शक्य तेवढ्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा आगामी निवडणुकांत सरकारला त्यांची जागा दाखवली जाईल

प्रतिनिधी

Mar 06,2019 09:52:00 AM IST

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाच्या २० मागण्यांपैकी सरकारने आजवर एकही मागणी पूर्ण केलेली नाही. आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच ११ मार्चपर्यंत सरकारने शक्य तेवढ्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा आगामी निवडणुकांत सरकारला त्यांची जागा दाखवली जाईल, असा इशारा सकल मराठा समाजातर्फे प्रा. चंद्रकांत भराड व डॉ. शिवानंद भानुसे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. ८ मार्चला राज्यव्यापी लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.


सरकारने एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याने मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलनाचे तिसरे पर्व सुरु करण्यासाठी ५ मार्च रोजी औरंगाबादेत राज्यस्तरीय बैठक झाली. यात डॉ. भानुसे म्हणाले की, विधायक मार्गाने आरक्षण दिलेले नाही. ईएसबीसीचा प्रवर्ग शोधला. यात न्यायालयाने देखील फटकारले आहे. सरकारला एका दिवसात निर्णय घेता येतील, अशा अनेक आग्रही मागण्या आहेत. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ८ मार्चला ११.३० ते १.३० वाजेपर्यंत गाव ते मुंबईपर्यंत राज्यव्यापी लाक्षणिक आंदोलन केले जाईल. यात सर्व मराठा बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.


बैठकीला मिलिंद पाटील, अभिजित देशमुख, जयाजीराव सूर्यवंशी, सुरेश वाकडे पाटील, सुनील कोटकर, रमेश गायकवाड, मनाेज गायके, विजय काकडे पाटील, गणेश उगले, भिसे, अनुराधा ठोंबरे, अॅड. स्वाती नकाते, रेखा वाहटुळे, सुवर्णा मोहिते, भोसले उपस्थित होते. मात्र, भाजप, शिवसेनेचे एकही पदाधिकारी बैठकीकडे फिरकले नाहीत.

X
COMMENT