आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा क्रांती ठाेक मोर्चा ‘विधानसभा’ लढवणार, कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. राज्यातील सर्व २८८ जागा लढवणार असल्याची घाेषणा माेर्चाचे नेते आबासाहेब पाटील, रमेश केरे -पाटील, सुनील नागणे यांनी पत्रकार परिषदेत केली.


१९ जून २०१८ रोजी तुळजापुरातून मराठा क्रांती ठोक मोर्चाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर राज्यभरात अनेक मोर्चे निघाले. मोर्चांना यापूर्वी कोणतीही पक्षीय भूमिका नव्हती. मात्र समाजाचे प्रश्न सुटत नसल्याने मोर्चाने या वेळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे या नेत्यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतरही त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यात येत नाही. समाजातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क माफी, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र असे प्रश्न रखडलले आहेत. पंतप्रधान घरकुल योजनेत समाजाला स्थान नाही, असे सांगत हे प्रश्न सोडवण्यासाठी मोर्चाने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे या नेत्यांचे म्हणणे आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाची कोणत्याही पक्षांसोबत युती नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही पक्षाला आम्ही पाठिंबा देणार नाही, असे या नेत्यांनी सांगितले.  मराठा क्रांती ठोक मोर्चाने उमेदवार उभे केल्याच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना त्याचा फटका बसू शकतो. दरम्यान, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेडने विधानसभेत उमेदवार दिले होते. मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती.


क्रांती माेर्चाचा खुलासा, आमचा काहीच संबंध नाही
मराठा क्रांती मोर्चे सामाजिक मागणीचे होते. हा मोर्चा कोणतीही निवडणूक लढवत नाही. जे कोणी लढवणार आहेत, ते क्रांती माेर्चाच्या बाहेरचे लोक आहेत. मराठा समाजाचा अन‌् निवडणूक लढवणाऱ्या मंडळींचा काही संबंध नाही. जातीच्या आधारावर निवडणूक लढवणे चुकीचे आहे. समाज अशा मंडळींच्या मागे जाणार नाही. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या मंडळींनी असे प्रयत्न केले होते. मात्र समाजाने त्यांना जागा दाखवली. या वेळी तेच हाेईल, अशी प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...