आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात कडकडीत बंद; उत्स्फूर्त प्रतिसाद; एमआयडीसीमध्ये किरकोळ दगडफेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं..., छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करत सकाळी ८ च्या सुमारास सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला. माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करत सकाळी ९ च्या सुमारास इम्पिरियल चौकात ठिय्या आंदोलन सुरू झाले. सकल मराठा समाजाच्या शहर बंदच्या हाकेला व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर कडकडीत बंद पाळला. दरम्यान, शुक्रवारपासून जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय, तसेच गावपातळीवर साखळी पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. 


दुचाकी रॅली, तसेच मोर्चाने येणारे सर्व मराठा आंदोलक सकाळी इम्पिरियल चौकात जमा झाले. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी चौकात ठाण मांडले. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, महापौर सुरेखा कदम, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आंदोलनात सहभाग घेतला. महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती. आक्रमक झालेल्या तरुणांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. एकीकडे आंदोलन सुरू होते, तर दुसरीकडे शहरात सर्वत्र शुकशुकाट होता. 


व्यावसायिकांनी आपली दुकाने उघडलीच नाहीत. नगर-पुणे महामार्गावरील सर्व वाहतूक कोठी रस्त्याने वळवण्यात आली होती. इम्पिरियल चौकात मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते. अनेकांनी सकल मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आपले मनोगत व्यक्त केले. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज स्वस्थ बसणार नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास सरकारच्या निषेधार्थ जागरण गोंधळही घालण्यात आला. दरम्यान, इम्पिरियल चौकात आंदोलन सुरू असतानाच काही तरुण दुचाकीवरून शहरात फिरत होते. केडगाव येथे भूषणनगर चौकात टायर जाळून महामार्ग अडवण्यात आला होता. आंदोलनाला इतर समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला. मुस्लिम समाजाच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. अनेक मुस्लिम तरुणांनी आंदोलकांना अल्पोपाहार दिला. संयोजकांनी आंदोलनात सहभागी झालेल्या व आंदोलकांच्या अल्पोपाहाराची व्यवस्था करणाऱ्या इतर समाजाचे आभार मानले. सर्व मराठा आंदोलकांनी इतर समाजाने दर्शवलेल्या पाठिंब्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. चौकातील ठिय्या आंदोलन सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरूच होते. आंदोलनाची पुढील दिशा ठरवत राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता झाली. 


आंदोलनाची पुढील दिशा 
क्रांतिदिनी सुरू झालेले हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, तसेच गावपातळीवर साखळी पद्धतीने आंदोलन सुरू राहणार आहे. एकएक गाव या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले. सकल मराठा समाजाच्या औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील आंदोलनात मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे तत्काळ मागे घ्या; अन्यथा १६ अॉगस्टपासून स्वतंत्र आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशाराही संयोजकांनी सरकारला दिला. 


या आहेत मागण्या 
> कोपर्डी अत्याचारातील आरोपींना फाशी द्या मराठा समाजाला तत्काळ आरक्षण हवे 
> अॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवा आंदोलक शहिदांच्या कुटंुबांना ५० लाख द्या 
> शहीद शिंदे यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करा 
> मराठा बांधवांवर दाखल गुन्हे सरसकट मागे घ्यावेत 
> खुल्या प्रवर्गाच्या पळवण्यात आलेल्या जागांची चौकशी करा 
> मराठा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अनुदान व विनातारण कर्ज द्यावे 
> खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीतील अन्याय थांबवावा 
> सणसवाडी दंगलीतील राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांना फाशी द्या 
> मराठा आरक्षण मिळेपर्यंत ७२ हजार जागांची मेगा भरती थांबवावी 
> आरक्षणाच्या संबंधित सर्व विषयांना सरकारने न्याय द्यावा 
> अण्णासाहेब पाटील अार्थिक विकास महामंडळांतर्गत सरकारने कर्ज द्यावे 
> शिष्यवृत्ती योजनेत अभ्यासक्रमाच्या एकूण शुल्कात ५० टक्के सुट द्यावी 
> डॉ. पंजाबराव देशमुख योजनेतील त्रृटी दूर कराव्यात 
> प्रत्येक जिल्ह्यात ५०० क्षमतेचे विद्यार्थिगृह बांधावेत 
> 'पेसा' अंतर्गत एसटी व्यतिरिक्त इतर घटकांवरील अन्याय थांबवावा 
> शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेला भरीव निधी द्यावा 
> शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव द्यावा 
> जगातील सर्वात उंच असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्ण करावे 
> छत्रपती शिवाजी महाराजांसह मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण थांबवावे 


दिवसभर चालला ठिय्या 
माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सकाळी ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. दिवसभर हे आंदोलन चालले. 


शाळा-महाविद्यालये बंद 
नगर शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा- महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यातील तब्बल ८०० शाळा, तसेच महाविद्यालयांना सुटी देण्यात आली होती. शुक्रवारपासून शाळा- महाविद्यालये सुरळीत सुरू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या बस, तसेच अॅपेरिक्षादेखील गुरूवारी शहरात दिसल्या नाहीत. महाविद्यालयीन तरुण आंदोलनात सहभागी झाले होते. 


तरवडी येथे विक्रेत्यांच्या गाड्यांची मोडतोड 
नेवासे तालुक्यातील प्रत्येक रस्त्यावर चक्का जाम आंदोलन करत शंभर टक्के बंद पाळण्यात आला. तरवडी येथे विक्रेत्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. एसटी बससेवा बंद होती. सोनई, कुकाणे, देवगाव, वडाळा येथे आंदोलने झाली. नेवासे येथे गेले ४ दिवस चालू असलेल्या ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणीच नेवासे-श्रीरामपूर रस्त्यावर बसून सुमारे दीड तास भाषणे करण्यात आली. नंतर चक्का जाम करण्यात आला. यावेळी भाऊसाहेब वाघ, दादा गंडाळ, अनिल ताके, संभा माळवदे, भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष माउली पेचे, शिवसेनेचे बाळासाहेब पवार, काँग्रेसचे संजय सुखधान यांनी मार्गदर्शन केले.अंमळनेर येथे नेवासे-राहुरी रस्त्यावर ट्रॅक्टर व बैलगाड्या आणून चक्का जाम करण्यात आला. 


आता साखळी आंदोलन 
क्रांतिदिनी सुरू झालेले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संयोजकांनी केला. शुक्रवारपासून साखळी पद्धतीने हे आंदोलन चालणार आहे. 


चोख पोलिस बंदोबस्त 
पोलिसांनी शहर व जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवला होता. तब्बल दीडशे अधिकारी, दोन हजार पोलिस कर्मचारी, हाेमगार्ड व एसआरपीच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी हाेत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे व ड्रोन कॅमेऱ्याचीदेखील व्यवस्था केली होती. जागोजागी अग्निशमन वाहने, पोलिसांच्या गाड्या उभ्या करण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत बंदोबस्त तैनात होता. 


मुस्लिमांकडून अल्पोपाहार 
इम्पिरिअल चौकात ठिय्या आंदोलन सुरू असतानाच अनेकांनी तेथेच जेवण केले. मुस्लिम समाजाने पाणी व केळी वाटले. त्यासाठी मुस्लिम समाजाचे तरुण दिवसभर आंदोलनस्थळी उभे होते. केळीच्या साली उचलण्यापासून इतर कचरा आंदोलनस्थळी पडणार नाही, याची काळजी आंदोलक व मुस्लिम समाजाच्या तरुणांनी घेतली. आंदोलकांनी मुस्लिम समाजाचे आभार मानले. 


बससह रिक्षा बंद 
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ७५० एसटी बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. शहरातील रिक्षाही रस्त्यावर दिसल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसाय झाली. 

 

एमआयडीसी परिसरात किरकोळ दगडफेक 
सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी राज्यभरात कडकडीत बंद पुकारला असूनही एमआयडीसी परिसरात काही कंपन्या सुरू होत्या. ही माहिती समजल्याने या परिसरातील काही युवकांनी एमआयडीसी परिसरात दुचाकी रॅली काढली. कंपन्यांच्या प्रवेशद्वारावर जाऊन त्यांना कंपन्या बंद करण्यास फर्मावण्यात आले. काही कंपन्यांनी बंदला प्रतिसाद देत कामगारांना घरी पाठवून दिले, तर काही कंपन्यांच्या आवारात दगडफेक करण्यात आली. मराठा आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी गुरुवारी राज्यभरात सकल मराठा समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर एमआयडीसी परिसरातील कारखानदारांनादेखील कंपन्या बंद ठेवण्याचे आवाहन केलेे होते, तरीही काही कारखानदारांनी कंपन्या चालू ठेवल्याचा प्रकार आंदोलकांना समजला. त्यामुळे काही युवकांनी कंपनीच्या प्रवेशद्वारांवर जाऊन कारखाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत काही कारखानदारांनी काम बंद करून कामगारांना त्रास न देता कंपनीतून बाहेर सोडले. मात्र, काही कंपन्या बंदला न जुमानता सुरूच होत्या. त्यामुळे युवकांच्या टाेळक्याने सुरू असलेल्या कारखान्यांच्या आवारात दगडफेक केली. या घटनेची माहिती समजताच पोलिसांची वाहने घटनास्थळी आली. या वेळी काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. मात्र, चिडलेल्या इतर आंदोलकांनी पोलिसांच्या वाहनाला गराडा घातला. त्यामुळे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना नंतर सोडून देण्यात आले. एमआयडीसी परिसरात झालेल्या दगडफेकीमुळे पोलिसांचा अतिरिक्त ताफा तेथे दाखल झाला. त्यामुळे आंदोलकांची पळापळ झाली. त्यानंतर पळून गेलेल्या आंदाेलकांना पकडण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली. बंदला प्रतिसाद देत कारखाने बंद केलेल्या कंपन्यांमध्ये शुकशुकाट होता. 

बातम्या आणखी आहेत...