आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाकचेरीवर ठिय्या, महामार्गावर रास्ता रोको; तीन तास धरणे, राष्ट्रगीताने सांगता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या संघर्षाचा एक भाग म्हणून सकल मराठा समाजाने आज, गुरुवारी (ऑगस्ट क्रांतीदिन) कडकडीत बंद पाळत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. प्रारंभी त्याच ठिकाणाहून एक रॅली काढण्यात आली. नंतर जाहीर सभा घेण्यात आली. तर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले. 


पूर्वघोषित वेळापत्रकानुसार आज, ऑगस्टक्रांतीदिनी बंद पाळून जिल्हाकचेरीसमोर मराठा समाजबांधवांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. आंदोलनादरम्यान या ठिकाणी जाहीर सभाही घेण्यात आली. सभेत आरक्षणाच्या मागणीचा इतिहास मांडणारी भाषणे झाली. बंदची पडताळणी करण्यासाठी शहरातील प्रमुख मार्गांची फेरी झाल्यानंतर जिल्हा कचेरीवरच ही रॅली विसर्जित करण्यात आली. दुपारी ३ वाजता राष्ट्रगीताने या आंदोलनाची सांगता झाली. 


एसटीला ५० लाख रुपयांचा फटका
आजच्या आंदोलनाचा धसका एसटी महामंडळानेही घेतला. त्यामुळे अकोला विभागाने ३७५ शेड्यूल्ड रद्द केले. या वाहनांद्वारे २ हजार १७० फेऱ्या व १ लाख ५५ हजार किलोमीटरचे अंतर कापून त्यापोटी महामंडळाला सरासरी ४८ ते ५० लाख रुपयांचे उत्पन्न होते. बंदमुळे महामंडळाला ५० लाखांचा फटका बसला. 

 

पेट्रोलपंप डिलर असोसिएशनचा बंदला पाठिंबा 
पेट्रोलपंप डिलर असोसिएशनचा गुरुवारच्या बंदला पाठिंबा होता. त्यानुसार दुपारी २ वाजेपर्यंत पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले होते. पेट्रोलपंप सुरू झाल्यानंतर गाड्यांमध्ये इंधन भरण्यासाठी एकच झुंबड उडाली. असोसिएशनचे अध्यक्ष राहुल राठी यांनी संघटनेच्या वतीने पाठिंबा दिला होता. सर्वांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.


महापालिका परिसरात शुकशुकाट 
सकल मराठा समाजाने पुकारलेला बंद आणि राज्य कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपामुळे ९ ऑगस्ट रोजी अकोला महापालिका कार्यालय परिसरात शुकशुकाट होता. बंदमुळे समस्या घेऊन येणाऱ्या नागरिकांची वर्दळ कमी होती तसेच नगरसेवकही फिरकले नाहीत. 


या मार्गावरून निघाली मोटारसायकल रॅली
हातात भगवे झेंडे घेऊन सकल मराठा समाज बांधव दुचाकीवरून रॅलीत सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघालेली रॅली पंचायत समिती, सिटी कोतवाली चौक, कपडा बाजार, गांधी रोड, रेल्वे स्थानक चौक, सातव चौक, सिव्हिल लाइन्स चौक, मुर्तिजापूर रोड, विद्यानगर, गोरक्षण रोड, तुकाराम चौक, कौलखेड चौक, सिंधी कॅम्प रोड, जेल चौक, अशोक वाटिका चौक व पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅलीचा समारोप झाला. 


दलित व मुस्लिम वस्तीमध्येही बंदचे वातावरण
शहरातील दलित वस्तीमध्ये व मुस्लीम वस्तीमध्ये बंदचा परिणाम जाणवला. या भागातील दुकानेही बंद होती. दलित व मुस्लिम बांधवांनी मोर्चाला समर्थन दिल्याचे दिसून आले. 


> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने क्रांतीदिनी गुरुवारी बंदचे आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, मोटार सायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून जात असताना विद्यानगरमध्ये गोयनका हिरो मोटार सायकलचे शोरूम उघडे दिसल्याने आंदोलनकर्त्यांनी दगडफेक केली. दगडफेकीत शोरूमच्या काचा फुटल्या. 
> गुरुवारच्या बंदमध्ये अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचा सहभाग होता. त्यामुळे बाजार समितीतील उलाढाल ठप्प झाली. सध्या हंगाम नसला तरी बाजारामध्ये धान्याची आवक असतेच. सध्या तीन साडेतीन हजार क्विंटल धान्याची आवक होत आहे. या सर्व व्यवहारावर परिणाम झाला. गेल्या काही दिवसांमध्ये बाजारातील बंदचा परिणाम व्यापार उलाढालीवर झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...