आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षण: राज्यात ठिकठिकाणी भाजप-सेना कार्यकर्त्यांचा जल्लोष, क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मात्र अलिप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-  मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून राज्य सरकारने स्वतंत्र १६ टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत एकमताने मंजूर केले. यानंतर मराठवाड्यात जल्लोष करण्यात आला. मात्र, हा जल्लोष केवळ राजकीय पक्षांपुरताच मर्यादित राहिला. मराठवाडाभर भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच मिठाई भरवून आरक्षण विधेयक पारित झाल्याचा जल्लोष केला. मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा आणि इतर संघटना जल्लोषापासून अलिप्त दिसल्या. मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्याने आनंद वाटत असला तरी आरक्षणासाठी ज्या ४२ जणांनी हौतात्म्य पत्करले त्यांचे स्मरण करण्याची ही वेळ असून जल्लोषाची नाही, अशी सूचक प्रतिक्रिया मराठा समाजातील काहींनी व्यक्त केली.

 

नांदेड : आरक्षणाचे स्वागत
विधिमंडळात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर झाल्याचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले. मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णयाचे महानगर भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील वजिराबाद चौकात फटाक्यांची आतषबाजी करून व साखर वाटून जल्लोष साजरा केला. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या नावावर अनेक वर्षे राजकारण करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मराठा पुढाऱ्यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण देऊन खऱ्या अर्थाने मराठा समाजाला न्याय देण्याचे काम केल्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहण्यासारखा असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजाप्रमाणेच मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजालाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आरक्षण मिळवून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

प्राणांची आहुती देणाऱ्या ४२ जणांना आरक्षणाचे श्रेय: आ. वसंत चव्हाण
सकल मराठा समाजाने राज्यात ठिकठिकाणी काढलेल्या मूक मोर्चांमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळे सकल मराठा समाजाचे अभिनंदन. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनादरम्यान ज्या ४२ जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना या आरक्षणाचे संपूर्ण श्रेय जाते. हे आरक्षण यापूर्वीच दिले असते तर ४२ जणांना प्राण गमवावे लागले नसते, अशी प्रतिक्रिया नायगावचे काँग्रेसचे आमदार वसंत चव्हाण यांनी व्यक्त केली. 

 

समाजाने जल्लोष करू नये; काकासाहेब शिंदेंच्या कुटुंबीयांचे आवाहन
गंगापूर- मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदेंसह समाजातील ४२ युवकांनी हौतात्म्य पत्करले असून या आंदोलनात हजारो युवकांवर गुन्हे दाखल झाले असून जाहीर झालेले आरक्षण कोर्टात टिकण्याचे आव्हान असल्याने समाजाने जल्लोष साजरा करू नये, असे आवाहन काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.  मराठा समाजाच्या कायगाव येथे झालेल्या ठोक मोर्चा आंदोलनात सर्वप्रथम जलसमाधी घेऊन आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्यांचे भाऊ व वडिलांनी आरक्षण विधेयक मंजूर झाल्याबाबत आनंद व्यक्त केला. मात्र हा जल्लोष करण्याचा प्रकार नसून आरक्षण टिकण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी, अशी अपेक्षाही शिंदे कुटुंबीयांनी व्यक्त केली. दरम्यान, जिल्हाभरात ठिकठिकाणी भाजप शाखांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याबद्दल जल्लोष केल्याचे चित्र होते.

 

उस्मानाबादेत सर्वपक्षीय मराठा नेत्यांकडून स्वागत धनगर, मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणी
मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठा नेत्यांनी तसेच संघटनांनी स्वागत केले आहे. तसेच हा निर्णय कोर्टात टिकेल अशी व्यवस्था करून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्याची मागणी या नेत्यांनी केली आहे.

आरक्षण कोर्टात टिकेल याची खबरदारी घ्या: आमदार राणाजगजितसिंह पाटील
विधेयक हा आरक्षण प्रक्रियेतील हा एक निर्णायक टप्पा आहे. आता याला कुठलीही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून तातडीने केंद्र सरकारने येत्या अधिवेशनात याबाबत कायदा संमत करून ५० टक्केपेक्षा अधिकचे आरक्षण कोर्टात टिकेल याची खबरदारी घ्यायला हवी. तसेच सरकारने धनगर व मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत देखील इतर घटकाच्या आरक्षणाला धक्का न लावता तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

 

काँग्रेसचीही मराठा आरक्षण मागणी होती- आ. चव्हाण
मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळावे ही काँग्रेस पक्षाचीही मागणी होती. आमचीच मागणी सरकारने मान्य केली आहे. हे आरक्षण न्यायालयात टिकावे एवढीच अपेक्षा असून यासाठी शासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे काँग्रेसचे आमदार मधुकरराव चव्हाण म्हणाले. 

 

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत: विजयकुमार पवार
निर्णय स्वागतार्ह आहे. याचे पहिले श्रेय या आंदोलनात हुतात्मा झालेल्यांना आहे. या निर्णयाबाबत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचेही अभिनंदन. आता हे आरक्षण कायद्याच्या पातळीवर टिकवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. भरती प्रक्रिया सुरू करावी. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे विजयकुमार पवार यांनी केली.

 

तातडीने विधेयकाला मान्यता दिली: आ. राहुल मोटे
मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी समाजाने लाखोंचे मोर्चे काढले. या दरम्यान, अनेक तरुणांनी बलिदान दिले. त्यामुळे सभागृहात मराठा आरक्षण कृती अहवाल सादर होताच विरोधकांनी कोणतीही चर्चा न करता तातडीने मान्यता दिली, असे आमदार राहुल पाटील म्हणाले. 

 

कायद्याच्या कसोटीवर टिकणारे: आ. हेमंत पाटील
आजवर मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकले नाही. शिवसेना भाजप युती सरकारने दिलेले आरक्षण हे कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण आहे. त्यामुळे मराठा आमदार आणि मराठा समाजात अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. या आरक्षणाचा उपयोग मराठा समाजातील गरीब आणि सुशिक्षित तरुणांना होईल, असे मत नांदेडचे शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केले.  

 

प्रत्यक्ष लाभ मिळाल्यावर आभार मानू, भाजपचा मात्र जल्लोष
हिंगोली येथील गांधी चौकात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून मराठा आरक्षण मिळाल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. तर सकल मराठा समाजाकडून मात्र जल्लोष न करता आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ मिळाल्यावर शासनाचे आभार मानण्यात येणार असल्याची भूमिका सायंकाळी उशिरा प्रसिद्धी पत्रक काढून मांडण्यात आली. येथील गांधी चौकात भाजपचे नेते माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, रामरतन शिंदे यांच्यासह कार्यकत्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. भाजप सरकारने आरक्षणाची मागणी पूर्ण केल्याबद्दल शासनाचे आभार  मानून दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार असल्याचे माजी खासदार शिवाजी माने यांनी  नमूद केले. मात्र सकल मराठा समाजाच्या वतीने  सायंकाळी उशिरा प्रसिद्धी पत्रक काढून आपली भूमिका मांडण्यात आली. मिळालेले आरक्षण हे ५८ मोर्चे आणि ४२ हुतात्म्यांच्या त्यागातून मिळाले असल्याने जल्लोष करण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच हे आरक्षण न्यायालयात टिकून त्याचा मराठा समाजाला प्रत्यक्ष लाभ मिळाल्यावर शासनाचे आभार मानण्यात येतील, असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

 

लातूर : भाजपकडून जल्लोष 

मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळात पारित झाल्यानंतर लातूरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शहर, जिल्ह्यात जल्लोष केला. प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा विषय राज्यातील भाजप सरकारने अजेंड्यावर घेऊन तो रीतसरपणे विधिमंडळात मंजूर करवून घेण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. विधिमंडळात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर करवून घेत त्यांनी शब्द पाळल्याचे मत खासदार सुनील गायकवाड यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.   मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्याचे समजताच  खासदार गायकवाड, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, शहराध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या उपस्थितीत लातूरच्या शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जल्लोष  करण्यात आला.  फटाक्यांची आतषबाजी करून पेढे भरवण्यात आले. नगरसेवक अजय कोकाटे, सुनील मलवाड, देवानंद साळुंके, गुरुनाथ मगे, नगरसेविका स्वाती घोरपडे, श्वेता लोंढे, शोभा पाटील, दीपा गिते, वर्षा कुलकर्णी, शीतल मालू, मोहन माने, संतोष भालेकर, सरचिटणीस तुकाराम गोरे, मंडल अध्यक्ष गणेश हेड्डा, ज्योतीराम चिवडे, गोरोबा गाडेकर, शिरीष कुलकर्णी,  अभिजित माचिले आदींसह नगरसेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा, औसा, रेणापूर, मुरूड येथेही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला.  दरम्यान, या जल्लोषापासून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र स्वत:ला दूर ठेवले. विधेयक पारित झाले, असले तरी अद्याप त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झालेली नाही. अद्याप त्याला राष्ट्रपतींची मंजुरी नाही, हे न्यायालयात टिकेल काय, याचा प्रत्यक्ष किती लाभ होईल, अशा अनेक शंका असल्याचे दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आरक्षणासाठी आंदोलने करणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाकडूनही जल्लोष करण्यात आला नाही. हे आंदोलन उभे करताना राज्यभर अनेक जणांनी मृत्यूला कवटाळले. त्यामुळे हा क्षण जल्लोष करण्याचा नाही तर, आरक्षणासाठी जीव दिलेल्या स्मरण करण्याचा असल्याचे सांगत मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी जल्लोषापासून दूर राहिले.

 

आरक्षण: निर्णयानंतर एकमेकांना भरवले पेढे
जालना जिल्ह्यात विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. तर काही ठिकाणी आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तरुणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जालना शहरातील भाजपा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. परतूर, भोकरदन, जाफराबाद, मंठा, अंबड, घनसावंगी कुंभार पिंपळगाव, केदारखेडा आदी ठिकाणी जल्लोष साजरा केला. आरक्षणासाठी मराठा समाजाचा अनेक वर्षापासून लढा सुरू होता. शांततेच्या मार्गाने काढलेले मोर्चे, तरुणांचे बलिदान यामुळेच आरक्षण जाहीर झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.

 

बीडमध्ये भाजप, शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची आतषबाजी

बीड जिल्ह्यात भाजपासह शिवसंग्राम व घटकपक्षांनी निर्णयाचे जोरदार स्वागत केले. केज येथील आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर तोफांची सलामी देण्यात आली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तर बीड शहरात युवक नेते राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने बीड  जिल्हा परिषदेच्या शासकीय निवासस्थानासमोर अतषबाजी  करण्यात आली तरुणांनी एकमेकांना पेढे भरवले. बीड येथील शिवसंग्राम भवन येथे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व  करत फटक्यांची अतषबाजी केली. जल्लोष साजरा करण्यापूर्वी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी प्रथम मराठा आरक्षाच्या लढयासाठी आपल्या प्राणाचे बलीदान देणाऱ्या महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना प्रथम श्रध्दांजली अर्पण केली. भाजपाच्या वतीनेही बीडमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्या नेतृत्वाखाली  भाजप कार्यकर्त्यांनी आंनद साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...