आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षणानंतरही मराठा मतांचा भाजपपेक्षा शिवसेनेलाच कौल; लोकसभेत सेनेला ३९, भाजपला २०% मराठा मते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मराठा समाजाला आरक्षण देऊन त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा भाजप प्रयत्न करत असला तरी राज्यातील मोठ्या संख्येने मराठा मतदार गेल्या विधानसभा व यंदाच्या लाेकसभा निवडणुकीत शिवसेनेच्याच पाठीशी असल्याचे दिसत आहे. लोकनीती व सीएसडीएस संस्थेने लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या सर्व्हेत हे निष्कर्ष समोर आले. अहवालानुसार युतीला मराठा समाजाची एकूण ५९ टक्के मते मिळाली. मात्र, त्यात शिवसेनेने तब्बल ३९% मते मिळवली. २०१४ च्या विधानसभेच्या तुलनेत भाजपची मते ४ टक्क्यांनी घटून २० टक्क्यांवर आली. आता हायकोर्टानेही मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्याने जास्तीत जास्त मराठा मतदान युतीकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही जास्तीत जास्त टक्केवारी आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न राहील. 


मराठा समाज हा काँग्रेसचा हक्काचा मतदार मानला जात असे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडल्यानंतर मराठा समाज त्यांच्या बाजूला गेला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात प्रत्येक वेळी चांगले यश मिळवू शकली. मराठा मतदार गेल्या काही वर्षांपासून भाजप, सेनेकडे वळला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा मते कुणाला तारणार हे विधानसभा  निवडणुकीत स्पष्ट होईल.

 

२०१९ लोकसभा : युतीला मराठा कौल

(२०१४ विधानसभेच्या तुलनेत २०१९ ची लोकसभा)
 

> शिवसेना 39% : २०१४ मध्ये ३०% मराठा मते घेतलेल्या सेनेने यंदा ३९ टक्क्यांचा टप्पा गाठला. 


> भाजप 20% : मराठा मतांमध्ये यंदा ४ टक्क्यांनी घट झाली आणि २० टक्के मराठा मते मिळाली. 


> राष्ट्रवादी 28% : २०१४ च्या तुलनेत १०% मराठा मते वाढून एकूण टक्केवारी २८% वर पोहोचली. 


> काँग्रेस  09% : मराठा समाजाने काँग्रेसला ९% मते दिली. २०१४ च्या तुलनेत २% घट झाली.

 

मुस्लिम मते : २०१४ आणि २०१९
२०१४ मध्ये मुस्लिम समाजाने काँग्रेसच्या पारड्यात ५४% मते टाकली होती. २०१९ लोकसभेत काँग्रेसला मुस्लिम समाजाची ५६% मते पडली. ती २०१४ विधानसभच्या तुलनेत २ टक्क्यांनी जास्त आहेत. 

 

इतर जाती-धर्मांनी दिला असा कौल
पक्ष         उच्चवर्णीय    एसटी    मुस्लिम    बौद्ध 
भाजप            63%     23%    09%    04%
शिवसेना          21%    12%    04%    02%
राष्ट्रवादी         03%    37%    30%    04%
काँग्रेस            07%     11%    56%    05%
वंचित+इतर    06%    16%     01%    85%