आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day : अतुल कुलकर्णींनी ठरवून होऊ दिले नाही स्वतःचे मुलबाळ, वाचा खासगी आयुष्याविषयी A to Z

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अतुल कुलकर्णी हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध नाव. एक विचारवंत अभिनेता म्हणून ओळखले जाणारे अतुल कुलकर्णींनी यांनी 10 सप्टेंबर रोजी वयाची 52 वर्षे पूर्ण केली आहेत. सात भाषांमध्ये 70 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अतुल आता निर्मातेसुद्धा आहेत. लवकरच त्यांच्या आगामी 'मणिकर्णिका' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात कंगना रनोटची प्रमुख भूमिका असून अतुल यांनी तात्या टोपेंची भूमिका साकारली आहे. अतुल यांचे लग्न अभिनेत्री गीतांजली यांच्यासोबत झाले आहे. दोघांचे लव्हमॅरेज असून त्यांच्या लग्नाला 22 वर्षे झाली आहेत. गीतांजली आणि अतुल यांना मुलं नाही. विशेष म्हणजे या दोघांनी ठरवून स्वतःचे मुलं होऊ दिलेले नाही. याविषयी अतुल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात त्यांचे खासगी आयुष्य आणि करिअरविषयी...


खासगी आयुष्य... 
अतुल कुलकर्णी मुळचे कर्नाटकचे असून सोलापुरात ते लहानाचे मोठे झाले. 10 सप्टेंबर 1965 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथील हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये पूर्ण केले. अतुल यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. मात्र अभियांत्रिकीमध्ये मन न रमल्यामुळे नंतर सोलापुरातील डी.ए.वी. महाविद्यालयातून इंग्रजी सहित्य या विषयात बी.ए. पूर्ण केले.


बारावीत नापास झाले होते अतुल... 
अतुल बारावीत नापास झाले होते. याविषयी एका मुलाखतीत ते म्हणाले होते, "ते खूप महत्त्वाचं नि आयुष्याला कलाटणी देणारं वळण होतं. जर मी हुशार विद्यार्थी असतो, बारावी उत्तम गुणांनी पास होऊन इंजिनीअरिंगला व्यवस्थित पास झालो असतो, तर मी वेगळा माणूस झालो असतो. मात्र बारावीतल्या अपयशाचा काळ माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ होता. खरा माणूस म्हणून मला याच काळानं घडवलं. हे अपयश पचवून त्यापुढील तीन-चार वर्ष बीए पूर्ण होईपर्यंत ते अगदी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये याच काळानं बरंच काही शिकवलं. नापास होणं, इंजिनीअरिंग सोडून परत येणं आणि त्यानंतर मी बीए होणं ते एनएसडीला जाण्याचा निर्णय घेईपर्यंतचा सात-आठ वर्षांचा काळ मोठ्ठं वळण होतं, थोडक्यात म्हणजे ते ‘यू टर्न’ होतं. त्या सगळ्या काळात खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्यात असं मला वाटतं."


शालेय जीवनापासूनच अभिनयात रुची... 
शालेय व महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातील नाटकात काम करणे सुरू केले होते. त्याचवेळी सोलापुरातील 'नाट्य आराधाना' नावाच्या हौशी नाट्यसंस्थेचे सदस्यही बनले. दोन वर्षे पडद्यामागे काम केल्यानंतर त्यांना नट म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्यातच कारकिर्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1992 मध्ये अतुल यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, नवी दिल्ली मध्ये प्रवेश घेतला. 1995 साली पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ड्रॅमाटीक आर्ट्स ही पदवी मिळवली


गीतांजलीसोबत केला प्रेमविवाह... 
अतुल कुलकर्णी यांनी गीतांजलीसह प्रेमविवाह केला. 1993 मध्ये एनएसडीमध्ये त्यांची भेट गीतांजलीसोबत झाली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. 29 डिसेंबर 1996 रोजी पुण्यात दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिकचा काळ झाला आहे.  


प्रेमविवाह होता घरच्यांसाठी आश्चर्याचा धक्का... 
अवधूत गुप्तेंच्या 'खुपते तिथे गुप्ते' या शोमध्ये अतुल कुलकर्णी यांनी आपल्या प्रेमविवाहाविषयी सांगितले होते. ते म्हणाले होते, ''मी प्रेमात पडलो किंवा प्रेमात कसा अडकलो हे माझे मलाच पडलेले कोडे आहे. मी प्रेमात पडलो आणि विवाहबद्ध झालो, हा माझ्या घरच्यांसाठीसुद्धा आश्चर्याचा धक्का होता. कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर कलाकार म्हणून बदलत गेलो. सोलापुरात एक नाटक केले. त्या नाटकाने मला रंगभूमीच्या प्रेमात पाडले. त्यानंतर एनएसडी गेलो. एनएसडीत गीतांजलीबरोबर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात आणि नंतर लग्नात झाले.'' तर गीतांजली यांनी म्हटले होते, ''परफेक्शनिस्ट अतुलची पत्नी असण्यापेक्षा मी त्याची शिष्य किंवा फॉलोअर अधिक बनलेय.''


ठरवून होऊ दिलं नाही मुलं... 
याविषयी अतुल कुलकर्णी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, की गीतांजली आणि मी एकमेकांचे चांगले मित्र होतो आणि ते आजवर राहिलो आहोत. चांगला संवाद आमच्यात होतो, हे महत्त्वाचं वाटतं. पारंपरिक नवरा-बायको अशी चौकट काही मला मान्य नाही. एका छताखाली आमची दोघांची वेगळी विश्वं आहेत, हे आम्ही मानतो. आम्ही ठरवून मूल होऊ दिलेलं नाही. आमचं इतर जग हेच आमच्यासाठी सारं काही आहे. 


पत्नी गीतांजली आहे अभिनेत्री...
गीतांजली ही सुद्धा अभिनय क्षेत्रातच असून अनेक हिंदी-मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये ती काम करते. नुकत्याच येऊन गेलेल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या‘कोर्ट’ सिनेमात गीतांजलीने वकीलाची भूमिका साकारली होती.  


दोनदा राष्ट्रीय पुरस्कारांवर उमटवली मोहोर... 
अतुल कुलकर्णी यांनी आत्तापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली आहे. 'हे राम' या सिनेमातील श्रीराम अभ्यंकर या भूमिकेसाठी त्यांना 2000 मध्ये पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2002 मध्ये 'चांदनी बार' या सिनेमातील भूमिकेसाठीही त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले.


हॉलिवूडमध्ये केली एन्ट्री.. 
आगामी 'सिंग्युलॅरिटी' या सिनेमाद्वारे अतुल कुलकर्णी यांनी हॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. या सिनेमात बिपाशा बसू त्यांच्यासोबत होती. हिंदी आणि मराठीसोबतच ते तेलगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ सिनेमांमध्येही बिझी असतात.


गाजलेले मराठी सिनेमे 
कैरी (2000), ध्यासपर्व (2001) , 10वी फ (2003), वास्तुपुरुष (2003), देवराई (2004), चकवा (2005), मातीमाय (2006), वळू (2008), नटरंग (2010), प्रेमाची गोष्ट (2013), हॅपी जर्नी  (2014), राजवाडे अँड सन्स (2015)


गाजलेले हिंदी सिनेमे 
हे राम (2000), चांदनी बार (2001), रन (2002), दम (2002), सत्ता (2003), 88 अॅन्टॉप हिल (2003), खाकी (2004), पेज 3 (2005), रंग दे बसंती (2006), गौरी: द अनबॉर्न (2007), देल्ही 6 (2009), मणिकर्णिका (आगामी सिनेमा)

बातम्या आणखी आहेत...