आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्या दिवशी मित्राचे कडक स्वभावाचे काका खिडकीत दिसले नाहीत... अन् माझ्या ‘बोंबाबोंब’ला लागला जिव्हारी चटका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...त्यामुळे मग ‘होळीचा दिवस बोंब मारण्याचा’ अशी जाहिरात दवंडी पिटून करण्यात आली असावी

मकरंद अनासपुरे   होळी म्हटलं की, लोकांना रंग खेळणं, होळी पेटवणं असं आठवतं. पण अनेकांच्या मते होळीची सर्वात मोठी ताकद काय असेल तर ती बोंबा मारणं आहे. मलाही असे वाटायचे की, बेंबीच्या देठापासून बोंबा ठोकण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. तसं आपण कायम कोणाच्या ना कोणाच्या नावानं त्या ठोकतच असतो. पण त्या बहुतेकदा मनातल्या मनात असतात. आणि त्या बोंबा नाहीतर चहाट्या, कुटाळक्या असतात. बरं, ज्याच्या नावानं बोंब मारायची तो आजूबाजूला नाही ना, याची खात्री करून घ्यावी लागे. त्यामुळं त्या बोंबा त्याच्यापर्यंत पूर्ण शक्तीनिशी पोहोचतच नाहीत. मग मनात साचलेला मळ कसा बाहेर काढायचा, एखाद्याबद्दलचे आपले प्रामाणिक मत त्याला कसे ऐकवायचे, असा प्रश्न बहुधा शेकडो वर्षांपूर्वी समाजबांधणी करणाऱ्यांना पडला असावा. त्या वेळीही अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकार असे मुुद्दे चर्चेला आले असतील. त्यामुळे मग ‘होळीचा दिवस बोंब मारण्याचा’ अशी जाहिरात दवंडी पिटून करण्यात आली असावी.  त्यामुळे दर होळीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी रंग खेळताना आवर्जून मित्रांच्या घरात दडलेल्या शत्रूंना शोधून काढायचो आणि बोंबा ठोकायचो. कोणालाही मनसोक्त शिव्या देणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी प्रबळ भावना माझ्या शाळकरी गँगच्या मनात होती. ती एक दिवस कायमची मोडीत निघाली. तो प्रसंग अजूनही माझ्या स्मरणात आहे. झाले असे की, माझ्या एका मित्राचे काका खूपच खडूस होते. ते गणिताचे शिक्षक. मित्राच्या घरी मी त्याला दुपारी खेळण्यासाठी निमंत्रण द्यायला गेलो की ते हमखास समोर उभे राहत आणि झाडाझडती घेत. कधी कधी तर कानही पिळत आणि ‘घटक चाचणीत बोंब मारलीआहे. दहापैकी फक्त तीन मार्क मिळाले आहेत..’ असं जोरजोरात ओरडायचे. त्याचा बदला मी होळीच्या, रंगपंचमीच्या दिवशी बोंबा मारून चुकवायचो. ते खिडकीत बसून माझ्याकडं बघत राहायचे. अशी तीन वर्षे गेली. माझे गणिताचे शिक्षक बदलले. पण माझी खुमखुमी कायम होती. चौथ्या वर्षीही मी रंगात भिजून त्या मित्राकडे गँगसह पोहोचलो. खिडकीकडे पाहिले तर मित्राचे काका तिथे नव्हते. मी विचारणा केली तर तो म्हणाला, ‘काका अंथरुणाला खिळून आहेत.’ माझ्यासह पूर्ण गँगच चपापली. तिथून बाहेर पडलो. दोन दिवसांनंतर तो मित्र रडत सांगू लागला, ‘मक्या, माझा काका गेला रे.’ माझ्या भावनाच गोठून गेल्या. जिव्हारी चटका लागला. यापुढे एखाद्याबद्दल राग असला तरी तो बोंब मारून व्यक्त करायचा नाही, असं मी त्या क्षणाला ठरवून टाकलं.

बातम्या आणखी आहेत...