आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Actress Spruha Joshi Faces Worst Body Shaming Experience In Film Industry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्पृहा जोशीला करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना, ‘ किती जाड झालीये, ‘ ‘ ही कसली हिरोईन ‘, ‘ किती बेढब शरीर ‘ , ऐकावे लागले असे टोमणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेली नायिका स्पृहा जोशी अभिनेत्रीसोबतच एक उत्तम कवयत्री असल्याचे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. सध्या स्पृहा सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर हा कार्यक्रम होस्ट करताना छोट्या पडद्यावर दिसतेय. अभिनेत्री आणि कवयत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या स्पृहाला चित्रपटसृष्टीत  मात्र आजही अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. या क्षेत्रात वावरत असताना बॉडी शेमिंगचा वाईट अनुभव आल्याचे स्पृहाने अलीकडेच एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. 2018 हे वर्ष तिच्यासाठी एकंदरीत कसे गेले, याचा अनुभव तिने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

 

२०१८.. वेगवेगळ्या पातळयांवर स्वतःशी स्ट्रगल करत या वर्षाची मी सुरुवात केली होती. पर्सनल, प्रोफेशनल सगळ्या पातळ्यांवर अनेक चॅलेंजेस समोर होती. मनासारखं काम मिळत नव्हतं, तब्येती कडे दुर्लक्ष होत होतं. अनेक माणसांची..https://t.co/KpNbgE2jjS pic.twitter.com/wBSKHb0aPI

— Spruha Joshi (@spruhavarad) January 1, 2019

स्पृहा जोशीची पोस्ट... 

‘२०१८.. वेगवेगळ्या पातळयांवर स्वतःशी स्ट्रगल करत या वर्षाची मी सुरुवात केली होती. पर्सनल, प्रोफेशनल सगळ्या पातळ्यांवर अनेक चॅलेंजेस समोर होती. मनासारखं काम मिळत नव्हतं, तब्येतीकडे दुर्लक्ष होत होतं. अनेक माणसांची वेगळीच रूपं सामोरी आली होती. या सगळ्यात प्रसिद्धी माध्यमांमध्ये हसरा चेहरा ठेऊन वावरण्याची कसरत करता करता दमून जायला झालं होतं.

 

पण हळूहळू ‘one day at a time’ असं म्हणत, स्वतःच स्वतःला boost करत गाडं रुळावर यायला लागलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक नवा छंद जोपासायला लागले. Doodles करण्याचा.. चित्रकलेच्या वहीत एकही उभी आडवी रेष ना मारणारी मी मुलगी, हा छंद सापडला तशी स्वतःवरच खुश होत गेले. मी काही नव्या कविता लिहिल्या. तिसऱ्या कवितासंग्रहाचं काम वेग घ्यायला लागलं..

 

या वर्षात प्रोफेशनली म्हणावं तसं यश मिळालं नाही. ‘ देवा ‘ आणि ‘ होम स्वीट होम ‘ मधल्या भूमिकांचं कौतुक झालं. पण नवीन चित्रपटांसाठी आपला विचारच केला जात नाहीये हे लक्षात आलं आणि आधी frustration आणि नंतर रियालिटी चेक करायला मला या गोष्टीने भाग पाडलं. पण ऑक्टोबर नंतर मात्र मरगळ आलेल्या मला ‘ सूर नवा ध्यास नवा ‘ ने जवळपास ‘ श्वास नवा ‘ दिला. फारच गोड अनुभवांची शिदोरी या कार्यक्रमाने दिली. आणि त्याच बरोबर ढळढळीतपणे बॉडी शेमिंगचाही अनुभव घेतला. ‘ किती जाड झालीये, ‘ ‘ ही कसली हिरोईन ‘, ‘ किती बेढब शरीर ‘, ‘ मराठीत काही अवेअरनेसच नाही ‘, इथपासून ते एका दिग्दर्शकाने तर कर्णोपकर्णी मी प्रेग्नंट असल्याचं कळल्यामुळे अनेक निर्माते दिग्दर्शकांनी मला चित्रपटात काम द्यायचं नाही असं ठरवल्याची फारच प्रोत्साहनपर बातमी माझ्या कानावर घातली. 

 

आधी राग आला. मग वाईट वाटलं. आपण सगळ्यांशी मनापासून प्रेमाने वागूनही आपल्याला पाण्यात पाहणारे इतके लोक आहेत याचं खूप दुःख झालं. पण मग एका पॉईंटला डोळे खडखडून उघडले. झोपेतून कोणीतरी हलवून हलवून जागं केल्यासारखं झालं. आणि मग अचानक सगळा कडवटपणा निघूनच गेला. हे २०१८ ने मला दिलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट!


आत्ता या घडीला मी माझं सगळ्यात चांगलं आयुष्य जगायचा प्रयत्न करतेय. स्वतःवर पूर्ण लक्ष केंद्रित करतेय. मी जशी आहे तशी आवडून घ्यायचा प्रयत्न करतेय. समोरची वाट अनोळखी आहे. पडाव अजूनही दिसत नाहीयेत, पण त्या वाटेवरून जायची प्रचंड उत्सुकता आहे. ‘ आता पुढे काय? ‘ ची एक्साइटमेंट आहे. स्वतःलाच घालून दिलेली नवीन नवीन आव्हानं आहेत. नवी स्वप्नं, नव्या पॅशन्स, नवी गोल्स आहेत. मी आणखी ‘ आत्ता ‘ मध्ये, ‘ त्या क्षणात ‘ जगण्याचा प्रयत्न करतेय. माझ्या कम्फर्ट झोन च्या बाहेर पडायचा प्रयत्न करतेय.

 

अशा गोष्टी शोधतेय ज्या केल्या की ‘ मला ‘ बरं वाटतं. खुश वाटतं. माझा पुढचा दिवस चेहऱ्यावर हसू ठेवून जातो. खरं सांगायचं तर ‘ लोक काय म्हणतात, पासून सुरु झालेला अट्टाहास ‘ मला कसं वाटतंय ‘ पर्यंत येऊन पोहोचलाय. त्यामुळे माझ्या आसपास बाकी मंडळी काय स्पर्धेत आहेत, याचा आता मला फारसा फरकच पडत नाहीये. मी माझी माझी मजेत आहे. माझी ग्रोथ मला समोर दिसतेय. आणि मी आणखी चांगली माणूस बनतेय. छान hopeful वाटतंय. या प्रवासात कुठलीही दुसरी व्यक्ती माझ्यासाठी अडथळा बनू शकणार नाही इतका हा प्रवास आनंदाचा झालाय. मला खूप हलकं हलकं वाटतंय..'
– स्पृहा.