आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

माणूसपणाने ओतप्रोत भाषाप्रेमी घडवू...  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या मुलांनी उच्चशिक्षित व्हावं, उच्चभ्रू जीवनशैली जगावी, आपल्यापेक्षा उत्तम अभ्युदय साधावा... या साऱ्यांच्या जोडीने आपल्या मुलांनी ‘उत्तम माणूसपण’ निभावणं, हेही महत्त्वाचं आणि अगत्याचं आहे, याचं विस्मरण सध्या आजूबाजूला दिसतं. उत्तम माणूस होण्याची एक वाट पुस्तकं, भाषा, साहित्य, कलांमधून जाते, हे समजून घेणं, ही आजची गरज आहे. पालकांच्या हातात पुस्तकं असतील, तर मुलांच्या हातात ती वेगळी देण्याची गरजच पडणार नाही. मात्र, पालकांच्या हातात मोबाइल, टीव्ही असेल तर मुलांकडून वेगळ्या अपेक्षा करता येणार नाहीत... इतकं साधं समीकरण आहे... हे समजून घेतलं तर भाषा दिन ‘साजरा करण्या’पलीकडे पोहोचणं अवघड नाही. 


मराठीचा ‘भाषा’ म्हणून विचार सर्वप्रथम दोन पातळ्यांवर करायला हवा. पहिली शैक्षणिक पातळीवरची आणि दुसरी व्यावहारिक पातळीवरची. यापैकी शैक्षणिक पातळीवरच्या मराठी भाषेविषयी एकूणच असमाधानाचा सूर आहे. यातही ढोबळमानाने तीन भाग करता येतात. शालेय स्तर, महाविद्यालयीन स्तर आणि विद्यापीठीय स्तर. शालेय स्तरावर भाषा पाठ्यपुस्तकांमधून मुलांना भेटते. त्या पाठ्यपुस्तकांमधील पाठांची मुलांना गोडी लागणे आवश्यक आहे. ती गोडी निर्माण करणारा मजकूर आणि ते पाठ शिकवणारे शिक्षक, अशी दुहेरी कामगिरी आहे. भाषेची गोडी लागल्यानंतर मग भाषेचं व्याकरण, शुद्धलेखन, साहित्य आणि एकूणच भाषेचा पैस... असे टप्पे येतात. काळानुसार झालेल्या बदलांनी वृत्त-छंदबद्ध कविता मागे पडली - जी भाषेची गोडी निर्माण करण्यासाठी अंशत: साह्यभूत ठरत होती. अर्थात मुक्तछंदालाही अंतर्गत लय आणि छंद असतोच, पण तो समजण्याचा टप्पा विद्यार्थिदशेच्या पुढच्या वळणावरचा... बालवयात, किशोरवयात कविता म्हणण्याची गंमत आणि त्याद्वारे मौखिक परंपरेपासून सुरुवातीचे शिक्षण दूर गेले आणि कविता हा ‘ऑप्शन’चा विषय ठरला. पुढचा मुद्दा मुलांसाठी, किशोरांसाठी साहित्याची निर्मिती करणे, ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. किशोरावस्थेतील आजच्या मुलांचे भावविश्व, संवेदनशीलता, कल्पकता आणि भोवताल यांना नेमकेपणाने कवेत घेणारे साहित्य किती उपलब्ध आहे आणि ते मुलांपर्यंत प्रत्यक्षात किती पोहोचते आहे, हा प्रश्न आहे. सृष्टीशी-पर्यावरणाशी मुलांची नाळ जोडण्याचे कामही लेखकांचे आहे. ही साखळी निसटते आहे की काय, असे चित्र आज दिसते. 


विद्यापीठांमधील भाषा विभाग, हा गेल्या काही वर्षांपासून चिंतेचा विषय बनला आहे. भाषाविषयक संशोधन, भाषेशी संबंधित बृहत् प्रकल्प तुरळक अपवाद वगळता दिसत नाहीत. त्यातूनच प्रबंध पातळीवरील वाङ्मयचौर्याचा मुद्दा अधोरेखित होताना दिसतो. इथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करायला हवा. भाषाविषयक चळवळींमध्ये कार्यरत असणाऱ्या काही मंडळींनी भाषा शिक्षण आणि साहित्यभाषा, असा फरक केला जावा, अशी भूमिका मांडली आहे. मला इथे भाषा ही शिक्षणाच्या दृष्टीने अभिप्रेत आहे. साहित्यभाषा म्हणून भाषेचा विचार हा काहीसा वरच्या पातळीवरचा, अधिक परिपक्वतेचा मुद्दा आहे.  


मराठी ही उपजीविकेची भाषा नाही, असा आक्षेप घेणारे बहुसंख्य आहेत. पण असे का? हा प्रश्न त्यांनी स्वत:लाच विचारायला हवा. रिक्षावाले, दुकानदार यांच्याशीही आपण त्यांना अवगत भाषेत बोलतो. त्यांनी खरे तर अमराठी असूनही जरुरीपुरती आपली भाषा शिकलेली असते. पण आपणच त्यांच्याशी मराठीत न बोलता, अन्य भाषांत संवाद करतो. आपल्या भाषेसाठी आधी आपण प्रयत्न करायचे असतात, तो आपल्या कर्तव्याचा भाग आहे, हे आपण विसरतो की काय? पुरेशा गांभीर्याने मराठी माणूसच मराठी भाषेकडे पाहत नाही, दुर्लक्ष करणे, आळशीपणा, जाऊ दे... ही वृत्ती भाषेसाठी घातक ठरते आहे.   


भाषेशी संबंधित सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, केंद्रे, लेखक, प्रकाशक, विक्रेते, ग्रंथालये.. ही साखळी एकमेकांत गुंतलेली आहे. एकमेकांवर अवलंबूनदेखील आहे. चांगले लिहिणे, ते प्रकाशित होणे, ते विक्रीसाठी उपलब्ध असणे अाणि वाचले जाणे... ही सर्व कडी गुंतलेली आहेत, याचे सजग भान ठेवून आपले पालक, शिक्षक प्रयत्नशील राहिले तर मराठी भाषा दिन ‘साजरा करण्या’पलीकडे आपण जाऊ शकू. इंग्रजीविषयी कुठलाही आकस, अढी वा पूर्वग्रह नाही. इंग्रजी जरूर आली पाहिजे, पण त्यासाठी मराठीला अव्हेरण्याची गरज नाही. हे काम फक्त पालक आणि शिक्षकच करू शकतात. लहानपणापासून आपली मुले पालकांच्या, अन्य कुटुंबीयांच्या हातात फक्त मोबाइल किंवा टीव्ही रिमोट पाहत असतील तर मुलेही त्यापुढे जाऊन मोबाइल आणि चॅनेल्सच पाहत राहणार, हे नक्की. पण पालकांच्या हातात पुस्तके असतील तर मुलेही सहजपणे पुस्तके हाताळतील. त्यावर बोलतील, चर्चा करतील. त्यातून भाषेची गोडी, सौंदर्य आणि जीवनाविषयीचे भान अधिक परिपक्व होण्यास मदत होईल. मला तर वाटते की, आता पालकांच्या आणि शिक्षकांच्याच या विषयावर कार्यशाळा घ्यायला हव्यात. नव्या पिढीला ‘वाचत नाहीत’ अशी नावे ठेवण्यापेक्षा त्याला आपणच जबाबदार आहोत, ही जाणीव पालक-शिक्षकांमध्ये जागी होणे महत्त्वाचे आहे.


आपल्याला ‘रेस’मध्ये धावणारी यंत्रवत व्यक्ती हवी की, माणूसपणाने ओतप्रोत भरलेला भाषाप्रेमी नागरिक घडवायचा, हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अन्य माध्यमांचे आक्रमण भाषेवर होत असले तरी त्या माध्यमांचाच वापर भाषेला विद्यार्थ्यांशी जोडण्यासाठी कसा करता येईल, याचा विचार झाला पाहिजे. ऑडिओ बुक, अभिवाचन, चित्रांकित पुस्तके, मल्टिमीडिया बुक्स, कॅलिग्राफी, चित्रकला, गायन, नाट्यीकरण, चित्रीकरण... अशी अनेक माध्यमं भाषाप्रेमाच्या जागरणासाठी कौशल्यानं वापरणं, ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक गोष्टीला पैसाच लागतो, असंही नसतं. आपली कल्पकता, नावीन्याची ओढ, ध्यास, नवा विचार, नवं माध्यम.. यातूनही बरंच काही घडवता येतं. त्यातूनच भाषाप्रेमी, भाषासन्मुख आणि भाषासमृद्ध माणूस घडवता येईल, असा विश्वास वाटतो.  


डॉ. अरुणा ढेरे, संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य संमेलन, यवतमाळ
शब्दांकन : जयश्री बोकील, पुणे

0