प्राजक्तासारखी मायबाेली / प्राजक्तासारखी मायबाेली

नुकतेच एका मंत्री महोदयांची एका इंग्रजी बातमीदाराने घेतलेली मुलाखत ऐकली . मराठी भाषिक मंत्रीमहोदयांचा इंग्रजीतूनच उत्तर देण्याचा अट्टाहास कौतुकास्पद होता.

सोनाली लोहार

Feb 27,2019 10:24:00 AM IST

नुकतेच एका मंत्री महोदयांची एका इंग्रजी बातमीदाराने घेतलेली मुलाखत ऐकली . मराठी भाषिक मंत्रीमहोदयांचा इंग्रजीतूनच उत्तर देण्याचा अट्टाहास कौतुकास्पद होता. पण जर त्यांनी मराठीतूनच उत्तरे दिली असती तर ती अधिक श्रवणीय आणि माहितीपर ठरली असती हे मात्र तितकेच खरे. 'मी माझ्या मातृभाषेतच बोलणार , तुम्ही करत बसा भाषांतर' हा आविर्भाव आणि हट्ट करणाऱ्या लोकांचं मला खरंच खूप कौतुक वाटतं. मला काही अगदी उच्चशिक्षित मंडळीही माहिती आहेत ज्यांनी ‘इंग्रजीतच बोलावं लागेल' असा आग्रह असलेल्या महाराष्ट्रातल्या काही सभारंभासाठीची भाषणाची निमंत्रणे नाकारली आहेत.कारणं माहित होती तरीही एकदा त्यातल्या एकांना मी विचारलच. त्यांनी जे उत्तर दिलं ते माझ्या कायम स्मरणात राहील. म्हणाले,"विशेष काही नाही, फक्त माझ्या आईला जिवंत ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतोय. "


मराठी असे आमची मायबोली !
किती सुंदर आहे ही आई आपली . ती कशीही अवतरली तरी सुंदरच दिसते . सर्व अलंकारांनी युक्त गर्भरेशमी वस्त्रप्रावरणे लेवून एखाद्या खानदानी स्त्रीचा आब राखून असलेली गूढ गंभीर मायमराठी सुंदरच आणि पहाटे डोक्यावरून न्हाऊन देवघरात देवासमोर दिवा लावणार्या साध्यासुध्या लुगड्यातल्या मध्यमवर्गीय स्त्री सारखी; एखाद्या शांत तेवणाऱ्या समईसारखी मराठी .. ती ही सुंदरच!


नुकतेच एका मोठया प्रकाशनगृहाच्या विश्वस्तांशी काही निमित्ताने बोलणं झालं . मराठीच्या, मराठी पुस्तकाच्या संवर्धनासाठी आणि त्याच्या प्रबोधनासाठी आयुष्य वेचलेल्या त्या व्यक्तीच्या बोलण्यात नकळत एक उद्विग्नता डोकावली होती. येणाऱ्या २-३ वर्षाच्या काळात पुस्तक छपाई हा प्रकार कितपत टिकून राहील, त्यातही मराठी पुस्तके कितपत छापली जातील याबद्दल ते साशंक होते.


येणाऱ्या पिढीने इतकं सुंदर आणि अनमोल मराठी साहित्य वाचलच नाही तर काय होईल? वाचलच नाही तर लिहिलं कसं जाणार? आणि लिहिलं नाही तर या एव्हढ्या मोठ्या वारश्याचं पुढे काय होणार? गावातला एखादा सुंदर , भव्य चौसोपी वाडा, मुलाबाळांनी- कुटूंब कबिल्याने आणि सुबत्तेने भरलेली ती वास्तू हळूहळू रिकामी होत जावी, दुर्लक्षित वास्तूच्या आजूबाजूला रान माजत जावं आणि हळूहळू एक एक खांब निखळत जावा.. नुसत्या विचारानेच जीव गलबलतो ..


मी व्यवसायाने 'स्पीच लंॅग्युएज पॅथॉलॉजिस्ट' आहे. भाषा या विषयावर झालेल्या संशोधनातुन हे सिद्ध झालय की आईच्या गर्भाशयातलं बाळ हे जन्माच्या ३ महिने आधीपासून भाषा ऐकायला आणि त्या भाषेचा नाद आत्मसात करायला लागतं. दोन वेगळ्या मातृभाषा असलेल्या दोन मातांच्या नवजात बालकांच्या रडण्याच्या आवाजाचा अभ्यास केल्यावर संशोधकाच्या लक्षात आलं की ते रडणं म्हणजेच व्यक्त होणं हे त्या त्या भाषेतल्या नाद आणि लयीप्रमाणे होत आहे.खरच किती अद्भुत आहे ही गोष्ट आणि किती महत्वाची ही ! मुलांच्या मेंदूचा विकास होण्यात मातृभाषेचा किती महत्वाचा सहभाग असतो बघा.


आपल्या पुराणात गर्भसंस्काराचा उल्लेख केला गेला आहे याची कारणमिमांसा हीच असू शकेल. विचारांचे आणि भाषेचेही संस्कार प्रत्यक्ष जन्माआधी पासूनच होत असतात .आपल्या मातृभाषेचा म्हणजेच मराठीच्या संवर्धनाचा प्रवास हा म्हणूनच या पातळीपासूनच सुरू व्हायला हवा . काळ बदलतोय पण सुदैवाने तंत्रज्ञानही या दृष्टीने आपल्याला मदतीचाच हात देऊ करतय. ऑडिओ बुक्स, इ-बुक्स सारखी माध्यम येणाऱ्या पिढीमध्ये मराठी यशस्वीपणे पोहोचवू शकतात. ही पिढी जितकं जास्त मराठी ‘ऐकेल' तेव्हढं जास्त ती ते 'बोलेल' आणि 'जपेल'. फक्त ही आवड त्यांच्यात निर्माण करण आणि मग ती जोपासणं हे मात्र मराठीवर पोसल्या गेलेल्या आधीच्या पिढीचे कर्तव्य नक्कीच आहे.मराठी ऐकणं आणि बोलत राहणं ही काळाची गरज आहे अस म्हटलं तर चूक ठरू नये. आणि इतकी सुंदर भाषा कोणाला आवडणार नाही बरं.. विचारांना थोडी कृतीची जोड हवी, मग काही कठीण नाही.


इंग्रजी गाण्यामधे प्रचंड रमणाऱ्या माझ्या लेकीला मी एकदा मंगेश पाडगावकरांची एक कविता वाचून दाखवली..
‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
भिर भिर भिर त्या तालावर गाणे आमुचे जुळे'
सध्या माझी लेक या कवितेला तिची स्वतःची चाल लावण्यात गुंतलीय.
त्या प्राजक्ताच्या फुलांसारखीच दैवी आणि स्वर्गीय अशी ही माझी मायबोली... माझी माय मराठी.. तिला त्रिवार अभिवादन !!!


सोनाली लोहार,
लेखिका, वाॅईस थेरपीस्ट

X
COMMENT