आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री ही देवाने निर्माण केलेली सर्वोत्तम कलाकृती, मराठी अभिनेत्री सांगताहेत या खास दिनाचे महत्त्व

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः जगभरात 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. याचनिमित्ताने मराठी कलाविश्वातील नामवंत अभिनेत्रींनी सांगितले या खास दिनाचे महत्त्व... 

  • सोनाली कुलकर्णी (परीक्षक, युवा डान्सिंग क्वीन)

माझी आई पंजाबसारख्या राज्यात वाढली. मुलींचे लवकरात लवकर लग्न लावून देण्याची तिथली पद्धत नाकारून, तिने महाराष्ट्रात येण्याचा मोठा निर्णय घेतला. मराठी माणसाशी लग्न करून इथे स्थायिक झाली. मी माझी स्वप्न सकारावीत यासाठी सुद्धा तिने खूप मेहनत घेतली आहे. आज मी माझी स्वप्नं साकार, करू शकले, त्यामुळेच 'युवा डान्सिंग क्वीन'सारख्या कार्यक्रमाचे परीक्षण करण्याची संधी मला मिळाली आहे. आईच्या प्रोत्साहनामुळे हे शक्य झालं. महिलादिन संपूर्ण महिलावर्गासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. महिलादिनाच्या निमित्ताने, स्वतःच्या बरोबरीने समस्त स्त्रीवर्गाचा विकास होईल, यासाठी प्रयत्न करता येतील. सर्वांनी एकत्र येऊन महिलादिन साजरा करायलाच हवा.  मी यंदाचा महिलादिन 'हिरकणी' चित्रपटाच्या टीमसह साजरा करणार आहे. महिलादिनाच्या निमित्ताने अनेक चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा दाखवण्यात येणार आहे.

  • श्वेता शिंदे (अभिनेत्री , डॉक्टर डॉन)

नव्या जीवाला जन्म देण्याचे कार्य फक्त आणि फक्त एक महिलाच करू शकते. स्त्रीचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. रोजच महिलादिन साजरा व्हायला हवा. रोजचा दिवस, प्रत्येक स्त्रीसाठी खास असायला हवा. रोजच त्यांना योग्य तो मान मिळायला हवा. स्त्री हा समाजातील एक आदर्श आहे. माझ्याकरिता, माझी आई माझी आदर्श स्त्री आहे. एक स्त्री असूनही, तिने मिळवलेले यश वाखाणण्याजोगे आहे. तिच्याविषयी मला नितांत आदर आहे. यंदाचा महिलादिन, तिच्यासोबत साजरा करण्याची संधी मी दवडणार नाही. माझा आदर्श असलेली माझी आई आणि माझी लाडकी लेक, यांच्यासोबत मी यंदाचा महिलादिन साजरा करणार आहे. 'डॉक्टर डॉन'च्या शूटिंगमधून यासाठी फावला वेळ मी काढणार आहे.

  • गंगा ( सूत्रसंचालक , युवा डान्सिंग क्वीन)

स्त्री, ही देवाने निर्माण केलेली सर्वोत्तम कलाकृती आहे. या कलाकृतीचा सन्मान करण्याचा दिवस, म्हणजेच महिलादिन! मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, की 'स्त्री'चा निर्मळपणा मला लाभला आहे. अनेक स्त्रियांचा मी मनापासून आदर करते. यात, सर्वप्रथम माझ्या आईचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. माझ्यासाठी तिने समाजातील अनेक व्यक्तींशी लढा दिला. आयुष्यभर ती माझ्यासाठी झटली आहे. मी तिची फार फार ऋणी आहे. वर्षातील एकच दिवस महिलादिन म्हणून साजरा करणे मला योग्य वाटत नाही. माझ्यात स्त्रीचा अंश असल्याचे 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मंचावरून आज सर्वांना कळले आहे. माझ्यातील स्त्रीला आदर, सन्मान मिळावा यासाठी मी यापुढे सतत प्रयत्नशील असणार आहे. माझे संपूर्ण आयुष्यच आता, महिलादिनाचे सेलिब्रेशन ठरणार आहे. 

  • गायत्री दातार (अभिनेत्री, युवा डान्सिंग क्वीन )

महिलादिन मला खूप महत्त्वाचा दिवस वाटतो. वर्षातील, किमान एक दिवस, महिलावर्गाला योग्य तो मान दिला जातो, तो याच दिवशी!! मी एक स्त्री असूनही, माझी मतं स्पष्टपणे सर्वांसमोर मांडू शकते. मला माझ्या व्यवसायात ते स्वातंत्र्य मिळाले आहे. अर्थात, या क्षेत्रात मी येऊ शकले, याचं श्रेय माझ्या आईला सुद्धा जातं. मी माझी स्वप्नं पूर्ण करावीत, कठीण परिस्थितीत सुद्धा हार मानू नये, यासाठी आईने मला सतत प्रोत्साहन दिले आहे. माझ्या आयुष्यावर तिच्या चांगल्या गोष्टींचा प्रभाव असल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल. इतकंच नाही, तर मला भेटलेली प्रत्येक महिला, मला प्रभावित करत असते. प्रत्येकीकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. 'युवा डान्सिंग क्वीन'च्या मांचावरील माझ्या मैत्रिणींकडून सुद्धा मी अनेक गोष्टी शकत असते. यंदाच्या महिलादिनाला, मी स्त्रियांच्या समस्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे.