आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Movie review: महाराष्ट्राच्या हृदयातील व्यक्ती आणि वल्लीची कसदार मैफल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्टार रेटिंग 3/5
कलावंत सागर देशमुख, विजय केंकरे, शशांक कुलकर्णी, इरावती हर्षे, शुभांगी दामले, सतिश आळेकर, अश्विनी गिरी, सचिन खेडकर, मृण्मयी देशपांडे आणि प्रभाकर मोरे
दिग्दर्शक महेश मांजरेकर
संवाद रत्नाकर मतकरी,
संगीत अजित परब
श्रेणी बायोपिक, पटकथा
रनिंग टाइम 2 तास 45 मिनिटे
 

 

 

ताना, बोलताना, आरोह आणि अवरोहांसोबतच गानमुद्रांची कसदार मैफल म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई व्यक्ती की वल्ली’. उत्तम अभिनय, भरभक्कम पटकथा, चपखल संवाद आणि अचूक दिग्दर्शनाने सजलेली ही एक संस्मरणीय मैफल आहे असे म्हणता येईल. 

 
तमाम मराठी जनांनवर ज्यांच्या अमोल व्यक्तित्त्वाची छाप कोरली गेली आहे, असे नट, लेखक, गायक, संगीतकार आणि लेखक पु. ल. देशपांडे यांच्यासोबत आयुष्याचे काही क्षण जगण्याची संधी देण्याचे कसब या चित्रपटात आहे. ख्यातनाम विनोदी लेखक पुल, त्यांचे वलय आजही महाराष्ट्रातील सृजनशिल व्यक्तींना आकर्षित करते. त्यांच्या व्यक्तित्त्वाचे अनेक पदर उलगडून दाखवण्याचा मांजरेकरांनी केलेला प्रयत्न उत्तम जमला आहे. खर तर पुलंच आयुष्य तीन तासांच्या सिनेमात बांधणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे आहे. दोन भागात बनवलेल्या या चित्रपटाचा पहिला भाग म्हणजे ‘भाई व्यक्ती की वल्ली’. भाई व्यक्ती कसा आणि वल्ली कसा हे यामध्ये निवडक प्रसंगांतून उत्तम मांडले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर बायोपिक बनवला जातो तेव्हा तो कथेच्या केंद्रस्थानी असतो. त्याचे व्यक्तीमत्त्व, स्वभावाचे कंगोरे, आयुष्यातील अस्पर्शित प्रसंग चित्रपटातून पुढे आणले जातात. मात्र, या चित्रपटात पुलंविषयी जितक्या बारकाईने अभ्यास मांडला आहे, तितकेच बारीक काम इतर प्रत्येक पात्रावर आहे. बाळासाहेब ठाकरे, जब्बार पटेल, कुमार गंधर्व, भिमसेन जोशी, वसंतराव देशपांडे अशा मात्तब्बरांचे दर्शन यात घडते. प्रत्येक पात्र एकदम चपखलपणे चित्रपटात प्रवेश घेत जाते. पुलंसोबत आपणच आयुष्य जगतो आहोत, असा अनुभव हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना येईल. 
 
सिने समिक्षक गणेश मतकरी यांनी लिहीलेली चित्रपटाची पटकथा सकस आहे. प्रत्येक पात्राचा प्रेक्षकांशी  अतिशय सहजपणे परिचय घडवला आहे. भिमसेन जोशी आणि कुमार गंधर्व या स्वरसम्राटांसह नाटककार वसंत देशपांडे यांची जुगलबंदी तर दिलखुश करणारी आहे. मांजरेकरांनी दिग्दर्शनातून पुलंचा सहवासच प्रेक्षकांना घडवला आहे. त्या काळातील वास्तू, भाषाशैली अगदी हुबेहूब जमून आली आहे. रत्नाकर मतकरींनी लिहीलेले संवादही सुंदर झाले आहेत. पुलंच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा परिचय त्यांच्या पुस्तकांतून, लेखांतून आणि पत्रांतून प्रेक्षकांना झालेला आहे. मात्र, तो पडद्यावर अनुभवणे म्हणजे एक गंमत आहे. साध्याच प्रसंगांत केलेल्या कोट्या खळखळून हसवणाऱ्या आहेत. साध्याच आयुष्यात त्यांनी आनंदाचा झरा निर्माण केला, त्याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. 
 
यामध्ये कुमार गंधर्व, भिमसेन जोशी आणि वसंत देशपांडे यांच्या जुगलबंदीत ‘कानडा राजा पंढरीचा...’ ऐकणे हा एक सुंदर अनुभव यामध्ये प्रेक्षकांना मिळतो. 
 
कथा : (३/५) 
पु. लं देशपांडे यांच्या बालवयापासूनचा प्रवास चित्रपटात मांडण्यात आला आहे. यामध्ये शाळेतील नाटकांत भाग घेणारे पुल, वर्गात हजरजबाबीपणा दाखवणारे पुल, फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षक आणि मित्रांसोबत घडणारे प्रसंग तसेच नोकरी आणि वैय्यक्तिक आयुष्यात आलेले प्रसंग यामध्ये आहेत. 
 
दिग्दर्शन : (३.५/५)   
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, नटसम्राट, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श तर हिंदीत अस्तित्त्व, वास्तव, कुरुक्षेत्रसारख्या चित्रपटातून वेगळे अस्तित्त्व निर्माण केलेले दिग्दर्शक महेश मांजेरकर यांनी भाईंवर चित्रपट करायला घेतला म्हणजे नक्कीच काहीतरी स्मरणीय असणार असा विश्वास प्रेक्षकांत निर्माण होतो. त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही असा हा चित्रपट झाला आहे. मांजरेकरांच्या नजरेतून दिसणारे भाई आपल्यासोबत जीवन जगत असल्याचा अनुभव येतो. याशिवाय पात्रांची निवड, कॅमेरा अँगल, तेव्हाचा काळ उभा करणे या सर्व बाबी ताकदीने त्यांनी केल्या आहेत यात शंका नाही. 
 
अभिनय : (३.५/५)
सागर देशमुख यांनी वठवलेला पुल म्हणजेच प्रत्यक्ष पुल देशपांडे याची प्रचिती येते.  अभिनयातून त्यांनी पुलंना जीवंत केले. क्षणभरही नजर पडद्यापासून दूर जात नाही की कान एक सेकंदही बाजूला होत नाही. मेंदू आणि मनावर कोरला जाईल, असा अभिनय पुलंच्या भूमिकेत सागर यांनी केला आहे. इरावती हर्षेने निभावलेली सुनिता ठाकुरही ताकदीची आहे. यासोबतच पुलंच्या आईच्या भुमिकेत असलेली अश्विनी गिरी कसदार अभिनेत्री असल्याची प्रचिती तिच्या प्रत्येक प्रसंगातील अभिनयात येते. भिमसेन जोशी, कुमार गंधर्व, वसंतराव देशपांडे या सर्वच पात्रांचे अभिनय उत्तम झाले आहेत. पुलंच्या पुस्तकातून सर्वांना परिचत असलेला गण्याही छोट्याच भूमिकेत दाद मिळवतो. 
 
संगीत : (३/५)
चित्रपटात संगीताही बाजूही दमदार झाली आहे. मोजकेच पण चपखल संगीत यात आहे. कानडा राजा पंढरीचा ….. आणि त्यानंतरची आखणी एक शास्त्रीय बंदिश म्हणजे रसदार मेजवानीच आहे. 
 
रोशनी शिंपी