आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

Mauli Movie Review : देवभाबड्या लोकांचा ‘माऊली’, तरुणाईसाठी अॅक्शनची मेजवानी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट

  माऊली

रेटिंग    2.5  स्टार  
कलावंत   रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, सयामी खेर
दिग्दर्शक   आदित्य सरपोतदार
 संगीत   अजय-अतुल
श्रेणी   मनोरंजनपट

 

दोन जुळे भाऊ, देवभाबडा समाज, चमत्कार आणि अॅक्शनची जंगी मेजवानी असा आहे आज प्रदर्शित झालेला रितेश देशमुख अभिनित माऊली चित्रपट. 2014 ला प्रदर्शित झालेल्या ‘लय भारी’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. पोलिस, गुंड आणि  विठूमाऊली भोवती फिरणारा हा चित्रपट आहे. आदित्य सरपोतदारने केलेले दिग्दर्शन चांगले झाले आहे. 

 

विठुमाऊलीच्या साक्षीने पंढरपूरात जन्माला आलेल्या दोन भावांची ही कहाणी आहे. दोघा जुळ्या भावांचे नाव माऊलीच. पण, स्वभाव परस्पर भिन्न.  आजवर याच थिमवर अनेक चित्रपट येऊन गेले असल्याने यात वेगळेपण जाणवत नाही. चित्रपटाची कथा फारशी दमदार नाही, पण सिनेमॅटोग्राफी, उत्तम अभिनय आणि जबरदस्त अॅक्शन दृष्यांमुळे  चित्रपट कंटाळवाणाही होत नाही. रितेशचा मराठीतील हा दूसराच चित्रपट आहे. मात्र, लय भारीपेक्षा यात काही वेगळेपण आहे असे जाणवत नाही.  हिंदी चित्रपटाप्रमाणे ग्लॅमर, अॅक्शनचा तडका असल्याने चित्रपट सहन होतो. कापूरगावातील सर्वात मोठा गब्बर गुंड आणि पोलिस अधिकारी माऊली यांच्यातील संघर्ष यात टिपण्यात आला आहे. अॅक्शन सिक्वेन्सवर बराच खर्च आणि काम केलेले आहे. 
तरुणाईला भावणारा हा चित्रपट सुजाण प्रेक्षक नाकारतील. कारण यात देववेडेपणा अन् चमत्कारावर कथानक फिरवण्यात आले आहे.  मराठी चित्रपटांत वास्तववादीपणाला विशेष पसंती दिली जाते.  ज्वलंत सामाजिक विषय, भावभावना हाताळताना हा मनोरंजनपट काळाच्या खूपच मागे वाटतो. असे असतानाही चित्रपटाची निर्मिती उत्तम झाली आहे. दोन वर्षांपुर्वी हर्षवर्धन कपूरसोबत झळकलेली सयामी खैर या चित्रपटात लक्ष वेधू शकली नाही. तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. पण, भूमिकेत ती समरसल्यासारखी वाटत नाही. चित्रपटातील गावगुंड अतिरंजित दाखवण्याचा प्रयत्न केला असला तरी तो पचत नाही.  


कथा ठिकठाक असली तरीही पटकथा फार ताकदीची नाही. कलावंतांची वेशभूषा  खटकणारी आहे. आजही महाराष्ट्रातील खेड्यांत तरुणी पंजाबी ड्रेस पलीकडे दिसत नाही. काही शिकणाऱ्या मुली जिन्सही घालतात, पण घागरा कुणीही घालताना दिसत नाही. चित्रपटातील भाषा नाटकी वाटते. सिनेमॅट्रिक लिबर्टीचा अतिवापर मराठी प्रेक्षकांना झेपणारा नाही. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे चित्रपट चालण्याचा एक काळ होता. आता ती ट्रिक मराठी प्रेक्षक स्विकारत नाहीत, हे दिग्दर्शक, निर्मात्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. रितेशचा चित्रपट, जबरदस्त अॅक्शन हेच काय ती जमेची बाजू आहे. यंदा चित्रपटाचे संगीतही फारसे आकर्षित करणारे नाही. 

 

कथा : 
पंढरपूरात विठुरायाचा साक्षीने दोन जुळी मुल जन्माला येतात. दोघांचे नाव आई माऊलीच ठेवते. एक अतिशय सालस आणि सज्जन तर दुसरा जशास तसा, शेरावर सव्वाशेर ठरणारा. पण, जगापूढे मात्र ते एक म्हणूनच वावरतात. एकजण पोलिस बनतो. कापूरगावात माऊलीची बदली होते. तिथे गावगुंड असलेल्या नानाशी त्याचा सामना होतो. सज्जन माऊलीचा त्याच्यापुढे निभाव लागणे कठीण असते. मग, डॅशिंग माऊली येतो. अन् गुंडांना चारीखाने चित करतो. पण, यामुळे एकदा पोलिस असलेल्या माऊलीच्या जीवावर बेतते. अन् त्याला वाचवताना मारामारीत डॅशिंग माऊलीचा मृत्यू होतो. पोलिस माऊली नानाच्या गुंडगिरीपुढे गुडघे टेकतो. मग, मात्र चित्रपटात चमत्कार घडतो अन् संपूर्ण काहाणी निराळेच वळण घेते.

 

दिग्दर्शन : 

आदित्य सरपोतदार उत्तम दिग्दर्शक आहेत, यात शंका नाही. क्षितीज पटवर्धन लिखीत या कहाणीला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. क्षितीजने यापुर्वी लिहीलेल्या क्लासमेटस या महाविद्यालयीन दोस्तांची कहाणीही आदित्यनेच दिग्दर्शित केली होती. मात्र, क्षितीजच्या या चित्रपटाची कथा मराठीला मागे घेऊन जाणारी वाटते. डबल सीट, फास्टर फेणे सारख्या उत्तम चित्रपटांचे लेखन केल्यानंतर त्यांच्याकडून अशा कहाणीच्या लिखाणाची अपेक्षा निराश करणारी आहे. पण, तरीही दिग्दर्शकाने कहाणीला न्याय देत व्यवसायिक मसाला मनोरंजनपट बनवण्याचे कौशल्य साधले आहे.

 

अभिनय : 

रितेशने निभावलेला माऊली, लयभारीप्रमाणेच आहे. अभिनय चांगला झाला आहे तर अॅक्शन दृष्यातही तो चांगला दिसला आहे. चित्रपटातील अॅक्शन पाहताना साऊथचा मारधाडपट पाहत असल्याचा भासही होतो. जितेंद्र जोशीने निभावलेला नाना चांगला आहे. मात्र, अभिनयातील तोच तो अतिरंजितपणा खटकतो. डोळे वाजवीपेक्षा जास्त मोठे करुन केलेला अभिनय नाटकी वाटतो. तर सयामी खेरकडून असलेली अपेक्षा फोल ठरते. खरे तर ‘मिर्झिया’ चित्रपटातून तिने पर्दापण केले, तो चित्रपट साफ आपटला. तरीही तिचे कौतुक झाले होते. मात्र, तिच्या कौतुकाचे रुपांतर काम मिळण्यात काही झाले नाही. या मराठी चित्रपटात तिला संधी मिळाली होती अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर करण्याची, पण ती संधी दवडल्यासारखे वाटते.

 

संगीत :

लय भारीप्रमाणेच माऊलीचे संगीतही मराठीतील आघाडीची संगीतकार जोडी अजय अतुलने केले आहे. मात्र, त्यांची जादू पुन्हा साधता आलेली नाही. चित्रपटातील गाणी लक्ष वेधत नाहीत. 

 

0