आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेवा चित्रपट महाेत्सवात मराठी चित्रपटांची मेजवानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - विन्सन वर्ल्डतर्फे २८ ते ३० जूनदरम्यान बाराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात २० दर्जेदार मराठी चित्रपट आणि ४ लघुपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या महोत्सवादरम्यान आरोन, पाणी, मिरांडा हाऊस, मुळशी पॅटर्न, कागर, गढूळ, म्होरक्या, वेडिंगचा सिनेमा, सूरसपाटा, अहिल्या, चुंबक, होडी, डोंबिवली रिटर्न, खटला-बिटला, दिठी, इमेगो, बस्ता, भोंगा या चित्रपटांसह काही नवीन चित्रपटांची मेजवानी या महोत्सवात असणार आहे.


पणजीच्या कला अकादमीत २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता दीनानाथ मंगेशकर सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी तीन तासांचा विशेष कार्यक्रम मराठी वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे. यात गोमचिम गौरव पुरस्कार सोहळाही होणार आहे. अमेय वाघ आणि पुष्कराज चिरपुटकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. या वेळी मानसी नाईक, पुष्कर जोग, संस्कृती बालगुडे, आशिष पाटील, पूजा सावंत आणि शुभंकर तावडे हे कलाकार नृत्य सादर करणार आहेत.


कार्यशाळेचेही आयाेजन : या महोत्सवातील चित्रपट कला अकादमी, मॅकेनिझ पॅलेस आणि आयनॉक्समध्ये दाखवण्यात येतील. चित्रपटांबरोबरच विविध विषयांवर कार्यशाळेचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. संगीत रंगभूमी कशी घडली व संगीताचे योगदान या विषयावर कार्यशाळा होणार आहे.


आठ जणांचा विशेष पुरस्काराने होणार गौरव
या गौरव सोहळ्यावेळी आठ जणांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, यासाठी प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई आणि कृतज्ञता पुरस्कार जाहीर झालेल्या सुमित्रा भावे यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती असणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचीदेखील विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती गोमचिमचे संचालक संजय शेट्ये आणि विन्सन वर्ल्डचे ज्ञानेश मोघे यांनी दिली.