आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थरारक अनुभूती देणारा भयपट 'काळ’चा ट्रेलर रिलीज, या तारखेला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर लेखक आणि दिग्दर्शक डी संदीप यांचा बहुप्रतीक्षित हॉरर मराठी चित्रपट 'काळ'चा ट्रेलर आणि पोस्टर अलीकडेच प्रदर्शित करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी वाट चोखाळणारा हॉरर चित्रपट म्हणून ‘काळ’कडे पाहिले जात असताना त्याच्या ट्रेलरने या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढविली आहे. या ट्रेलरमधून युवकांचा एक चमू काही अद्भुत आणि अगम्य अशा गोष्टींच्या शोधात असताना कुठल्यातरी गूढ संकटात सापडल्याचे स्पष्टपणे समोर येते. या गूढतेचा शोध आता प्रेक्षकांना घ्यायचा आहे, २४ जानेवारी रोजी!

कोकणातील आडोशाच्या एका बंगल्यात रात्रीच्या किर्र अंधारात या युवकांची झोप गूढ अशा घटनांमुळे उडून जाते. एरव्ही गूढ आणि अद्भुत अशा गोष्टींची उकल करण्यात वाकबगार असल्याच्या फुशारक्या करणारे हे तरुण त्यांच्यावर तशी वेळ आली की मात्र घाबरून जातात. ‘एकदा तुम्ही आत आलात की बाहेरचे रस्ते बंद’ असे शब्द ट्रेलरमध्ये पडद्यावर उमटतात आणि प्रेक्षकांमध्येही घबराट पसरते. चित्रपटाचे पोस्टरसुद्धा अगदी वेगळे आणि चित्रपटाची पोत स्पष्ट करणारे आहे. ‘सुरुवात अंताची’ असे दोन शब्द या काळपट पार्श्वभूमीच्या पडद्यावर उठून दिसतात. पोस्टरमधील त्याच पडद्यावर चार सावल्यारुपी प्रतिमा आहेत. त्याबाजूला एका टॉर्चचा स्वच्छ प्रकाशझोत पडला आहे. या सर्वांतून चित्रपटाबद्दलची एक ठोस प्रतिमा निर्माण होते आणि तो पाहायलाच हवा, अशी खुणगाठ प्रेक्षक बांधतो.  ‘काळ’ संपूर्ण महाराष्ट्रात २४ जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. मराठीमध्ये अनेक हॉरर चित्रपट तयार झाले आहेत, पण 'काळ'च्या सादरीकरणाची पठडी वेगळी आहे आणि त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शनच्या हेमंत रूपारेल आणि रणजीत ठाकूर, नितीन वैद्य प्रॉडक्शन्सचे नितिन वैद्य, कांतीलाल प्रॉडक्शन्सचे डी संदीप आणि प्रवीण खरात व अनुज अडवाणी यांची आहे. सतीश गेजगे, संकेत विश्वासराव, श्रेयस बेहेरे, राजकुमार जरांगे, वैभवी चव्हाण आणि गायत्री चिघलीकर यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणे दिग्दर्शक डी संदीप यांच्यासाठी एवढे सोपे नव्हते. पण त्यांनी 'काळ' या चित्रपटाचा दृढनिश्चय केला होता आणि आयुष्यातील अनुभवांच्या माध्यमातून चित्रपट पूर्ण करण्याचे त्यांनी ठरवले होते. 'काळ'चे लेखक आणि दिग्दर्शक डी संदीप म्हणाले, “हॉलिवूडमधील या प्रकारच्या म्हणजे हॉरर चित्रपटांनी मी माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये खूपच प्रभावित झालो होतो. त्यासाठी आवश्यक ते संशोधन केल्यानंतर आता प्रेक्षकांना भावेल असा 'काळ' घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपट रसिकांचा या प्रकारच्या चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. शिवाय आणखीही हॉरर मराठी चित्रपटांची निर्मिती मराठीमध्ये होण्यासाठी निर्मात्यांना त्यामुळे प्रेरणा मिळेल. आम्ही यापूर्वी दाखल केलेल्या टीझरला रसिकांनी फार मोठा प्रतिसाद दिला आणि चित्रपटाची प्रतीक्षा करत असल्याची प्रतिक्रिया नोंदविली. आता प्रदर्शित झालेल्या ट्रेलर आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांची या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक वाढणार आहे."