आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अ.भा. मराठी साहित्य संमेलन, 'धर्म, जातिभेद करणं अमानुषपणाचं लक्षण' - संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटाे यांचे चाेख उत्तर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत गोरोबाकाका साहित्य नगरीत सुरू झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती होती - Divya Marathi
संत गोरोबाकाका साहित्य नगरीत सुरू झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने रसिकांची उपस्थिती होती

उस्मानाबाद : या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवडच अनपेक्षितपणे झाली, त्यामुळे माझ्या निवडीवर अनपेक्षितपणे टीका हाेत असेल त्यावरही मी व्यक्त व्हायलाच हवं. धर्म, जात, वंश हे विषय घेउन ही टीका हाेत असेल तर प्रश्न जीवन-मरणाचा हाेता. पण माझी भीतीच मला साेडून गेेली आहे. टीका वा निषेध करणाऱ्यांना जे करायचं ते करू द्या. आपण आपलं काम करू. शेवटी मी देखील आंदाेलनातूनच आलाे आहे, घाबरू काेणाला आणि कशासाठी. धर्म, जाती, पंथावरून भेद करणं हे अमानुषपणाचं लक्षण आहे, असे चाेख उत्तर ९३व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटाे यांनी विराेध करणाऱ्यांना दिले. यासह जगण्यासाठी समग्र साहित्यच कारणीभूत असल्याच्या मुद्द्यांना त्यांनी हात घातला.

आपल्या ४० मिनीटांच्या भाषणात दिब्रिटाे यांनी साहित्याच्या प्रयाेजनापासून ते आपलाच आपल्याशी तुटलेल्या संवादापर्यंतच्या विषयांवर भाष्य केले. त्याची सुरुवात मात्र त्यांनी विराेधकांच्या खरपूस समाचाराने केली. ख्रिश्चन धर्मगुरु असलेल्या दिब्रिटाे यांना अध्यक्षपदी बसविल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांसह ब्राह्मण महासंघाने त्याला तीव्र विराेध केला हाेता. मात्र यावर दिब्रिटाे उत्तर देताना म्हणाले की,सगळं जगच आपले भाऊ बहिण आहेत. मी येशूचा उपासक आहे आणि येशू सांगतात ते त्यांना या लाेकांना क्षमा कर, ते काय करत आहेत त्यांना कळत नाहीये. मी संत सहप्रवासात वाढलाे आहे. त्यामुळेच हे संस्कार माझ्यावर झाले आहेत. जाे मराठी आहे त्याला संतांची गाेडी लागलीच पाहिजे. तेच खरे दिशादर्शक आहेत. संतसहवासच आध्यात्मिक पाेषण करताे. तुकाेबा माझे लाडके आहेत.. कारण ते स्पष्टवक्ते हाेते तर दुसरीकडे त्यांचे काळीज करुणेचे हाेते. त्यांचा हा विचार कुठून कुठे जाताे हे लक्षात घेतलं पाहिजे.

मी पुन्हा येईन...

साहित्य आणि पर्यावरणाचं अत्यंत जवळचं नातं आहे. विविध आक्रमणं आपल्यावरच नाही तर वसुंधरेवरही हाेत आहेत. साहित्यिकांने देखील पर्यावरणाच्या वा लढाईत हिरीरीने उतरलं पाहिजे. जगण्याचं अत्यंत व्यवहारीकरण झालं आहे. त्याला चार कारणं आहेत. परमेश्वरशी, निसर्गाशी, सत्याशी आणि आपला एकमेकांशी तुटलेला संवाद पुन्हा सुरू करावा. रामदासांनी तेव्हाच म्हटलं आहे की, चिंता करताे विश्वाची. या सगळ्याच गाेष्टींचा विचार करून आपण चिंता करूया विश्वाची आणि करूया उत्तम काम. असे म्हणत दिब्रिटाे यांनी 'मी पुन्हा येईन' अशी काेपरखळी मारत निराेप घेतला.

फडणवीस सरकारने साडे सहा हजार वाचनालये बंद केली..?

महानोर म्हणाले, यशवंतराव चव्हाण कायम साहित्य संमेलनाच्या मंचावर असायचे. त्यांना एकदा मंचावर घेतले गेले नाही. त्यावेळी ते म्हणाले होते, ' शब्दांनी मला उभे केले, त्यामुळे मी या संमेलनात येणारच. मग मंचावर बसवले की नाही हे महत्त्वाचे नाही.' यासंदर्भात बोलताना महानोर म्हणाले, ' एरव्ही पुढारी येतात बसतात, फोटो काढून निघून जातात. हे वाईट आहे. रोजगार हमी पेक्षा कमी पैसे ग्रंथालयातील सेवकांना मिळतात. विशेष म्हणजे, मागील चार वर्षात १२ हजार वाचनालयांपैकी साडे सहा हजार वाचनालये बंद केले आहेत.

राजकारण -साहित्य एकमेकांसोबत असावे

महानोर मह्णाले, राजकारण आणि साहित्य एकमेकांसोबत काम करणारे असावेत. अर्ज भरून मत मागणे ही नामुष्की साहित्यिकांच्या वाट्याला येत होती. पण महामंडळाने मागील दोन वर्षांपासून अविरोध अन् एकमताने अध्यक्षांची निवड करण्याची प्रथा सुरू केली आहे. हे पाऊल उत्तम आहे. साहित्याचा निकष लावून केलेली निवड हाच सन्मान असतो.

प्रत्येकाने काही भूमिका घेतली पाहिजे : दिब्रिटो

आणीबाणीच्या काळात मी साधनामध्ये काही पत्र लिहीत होतो. तेव्हा पोलिसांनी माझा शोध घेतला. मी स्वतः सांगितलं की हो पत्र मी लिहीत होतो. आपण भूमिका घेतली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने काही भूमिका घेतली पाहिजे. आणीबाणी 18 महिने पुरली. आणीबाणी गेली आणि देश पुन्हा स्वतंत्र झाला.