आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद : साहित्य संमेलनातील ग्रंथदालनाचे उद्घाटन होण्यापूर्वीच पायरेटेड पुस्तक विक्रीचा प्रकार उघडकीस आला आहे. नऊ नामवंत प्रकाशन संस्थांची सुमारे ५० हजार रुपये किमतीची पुस्तके नगण्य दरात विकली जात होती. संमेलनाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि. १०) सकाळी संमेलनस्थळी कचोरीच्या स्टॉलवरून हा प्रकार सुरू होता.
ग्रंथाली प्रकाशनचे सुदेश हिंगलाजपूरकर यांनी इतर प्रकाशन संस्थांच्या प्रतिनिधींनाही याची मािहती दिली. या वेळी सर्वांनीच संबंधित विक्रेत्याला धारेवर धरले. सर्व पुस्तके त्या त्या संस्थांनी ताब्यात घेतली. हिंगलाजपूरकर यांनी संबंधित विक्रेत्याला उरलेल्या पुस्तकांसह नियोजन समितीच्या कार्यालयात आणले. या वेळी नियोजन समितीतील सदस्य ग्रंथदिंडीत असल्याने कार्यालयात कोणीच उपलब्ध नव्हते. यामुळे त्यांना समितीच्या सदस्यांची प्रतीक्षा करत थांबावे लागले. विक्रेता त्या दरम्यान पसार झाला. हिंगलाजकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला शोधले मात्र, तो सापडला नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
४० वर्षांपूर्वीची प्रकाशने
पायरेटेड पुस्तकांमध्ये ग्रंथाली प्रकाशनाची 'कोल्हाट्याचं पोर', 'बलूत', 'आमचा बाप आणि आज' अशी एकापेक्षा एक सरस पुस्तके होती. यातील काही पुस्तकांचे प्रकाशन ४० वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे मूळ किमतीपेक्षा किती तरी मोठा आकडा पुस्तकावर छापून डिस्काउंटच्या नावावर कमी दरात ती विकली जात होती.
ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर यांनी संबंधित स्टॉलधारकाला कार्यालयात आणून त्याला जाब विचारला.
तक्रार दाखल करणार
पायरेटेड पुस्तकांमुळे प्रकाशकांचे आतापर्यंत न मोजता येणारे नुकसान झाले आहे. हा किळसवाणा प्रकार कोठे तरी थांबायलाच हवा. याची पोलिसांत तक्रार करणार आहे. - सुदेश हिंगलाजपूरकर, विश्वस्त, ग्रंथाली
अशी होते पायरसी
पायरेटेड पुस्तकांमध्ये सर्व बांधणी, छपाई जशीच्या तशी होती. मात्र, कागदात फरक होता. पायरेटेड पुस्तकांवर मागच्या बाजूला किंमत छापली होती. सर्वच पुस्तके प्लास्टिक कोटेड होती. मुखपृष्ठांचा रंगही फिकट होता.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या संमेलनाध्यक्षपदावरील आक्षेपाचे पडसाद ग्रंथप्रदर्शनातही उमटले.
अखिल भारतीय साहित्य संमेलनातील मुंबई तरुण भारत, हिंदुस्तान प्रकाशन संस्थेच्या ग्रंथविक्री स्टॉलवर सकाळी ग्रंथदिंडी संमेलनस्थळी आलेली असता वादविवाद झाला. या स्टॉलवर संमेलनाध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यावरील पुस्तिका मोफत दिली जात असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक पी. व्ही. माने यांनी पुस्तिकेतील मजकुराविषयी स्टॉलवरील उपस्थितांची चौकशी केली. त्या वेळी स्टॉलवरील सोमेश कोलगे आणि पोलिसांमध्ये वाद झाला.
ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सुरू असतानाच 'मुंबई तरुण भारत' नावाने ग्रंथविक्री करणाऱ्या स्टॉलवर पोलिसांचे पथक दाखल झाले. हातात डायरी घेऊन आलेले पीएसआय माने यांनी मुंबई तरुण भारतचे पत्रकार सोमेश कोलगे यांची चौकशी सुरू केली. यावरून स्टॉलवरील उपस्थित व पोलिसांमध्ये वादाला सुरुवात झाली. यानंतर कोलगे व माने यांनी एकमेकांवर आक्षेप घेत मोबाइलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले. पुस्तक विक्री करणे गुन्हा आहे का, अशी विचारणा कोलगे यांनी केली, तर आपण केवळ आपले कर्तव्य करत असून आपण हस्तक्षेप करताय, असे माने यांचे म्हणणे होते. दोघांत बाचाबाची सुरू असताना साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले आणि दादा गोरे यांच्यासह सर्व मान्यवर स्टॉलच्या समोरून गेले. त्यानंतर माने यांनी पोलिस उपअधीक्षक मोतीचंद्र राठोड यांना फोनवरून घडला प्रकार सांगितला. थोड्या वेळाने राठोड यांनीही स्टॉलवरील उपस्थितांची चौकशी केली. या वेळी तरुण भारत स्टॉलवर प्रदीप गुरव, महेश पुराणिक, प्रथमेश तांडेल, केतन वैद्य, शिरीष सोनवणे, अजय राठोड आदी पत्रकारांची उपस्थिती होती.
पोलिस गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देत होते
पुस्तक विक्री आणि साहित्य संमेलनाचे रिपोर्टिंग करण्यासाठी आम्ही मुंबईहून आलो आहोत. पोलिस मात्र अचानक स्टॉलवर आले अन् अटक केल्याप्रमाणे आमच्या दंडाला धरून नेत होते. त्यामुळे आम्ही त्यांना जाब विचारला. पत्रकार असताना आम्हाला पोलिस गुन्हेगारांप्रमाणे वागणूक देत होते. -सोमेश कोलगे, मुंबई तरुण भारतचे पत्रकार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.