आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद : आताच सरकार असाे वा आधीचं. त्याची एक प्रकारची भीती वाटत असते ही परिस्थिती आताची नाहीच. अगदी तुकाेबांच्या काळापासून चालत आलेली आहे. आमची तक्रार आजच्या लाेकांबद्दल नाहीच. कुत्रा असला की, ताे भुंकणारच. आमची तक्रार आधीच्या अगदी पूर्वीपासून आलेल्या पिढीच्या आणि त्या परंपरेतील लाेकांबद्दल आहे. त्यांनी जर अशी परिस्थिती त्याचवेळी थांबवली असती तर आज देशात ही परिस्थिती उद्भवली नसती. असा संवाद किरण येले यांनी साधला. परिसंवादातील सगळ्याच कथाकारांनी आपली कथा उलगडताना देशातील सद्यस्थिती, राजकीय वर्तन आणि त्याला येणारी प्रतिक्रिया यावर तीव्र भाष्य केले.
साहित्य संमेलनातील लक्षवेधी कथालेखकांशी संवाद या मुलाखतवजा परिसंवादात ते बाेलत हाेते. दत्ता घाेलप आणि राम जगताप यांनी कथाकारांना बाेलते केले. यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षण व्यवस्था, नागरिकत्त्व कायदा यासह अनेक विषयांना कथाकारांनी हात घातला.
मंडप सरकारचा विराेधही सरकारचा
साहित्य संमेलनाला सरकारकडून अनुदान मिळतं. त्याच संमेलनात विचारवंताना सरकारच्या विराेधात बाेलायचं असतं. म्हणजे मंडप सरकारचा आणि विराेधही सरकारचा. अशा गमतीजमतीची उत्तरं जाेपर्यंत सापडत नाहती ताेपर्यंत कथा येतच राहतील. असे संजय कळमकरांनी नाेंदवले. यावर येले म्हणाले की, सरकारचा पैसा म्हणजे आमचाच पैसा असताे. माेठ्यांना प्रश्न विचारायचे गरिबांना काय विचारायचं? प्रश्न विचारलेच पाहिजे. ती जबाबदारी आपलीच आहे. याबराेबरच शिक्षणातील विनाेद आता संपला असल्याचेही कळमकर म्हणाले.
किरण येले : सुचेल ते बोलावे, लिहावे
पुढच्या काळाचं ज्यांनी लिहिलं, ते टिकले. ज्यांनी विद्राेह लिहिला, प्रश्न मांडले, दाेष काढले त्यामुळेच आज चर्चा करताे आहेत. त्यामुळे जे सुचेल आणि जे बाेलावं वाटेल ते लिहिलं पाहिजे. आपलं साहित्य आत्मिक, आंतरिक गाेष्टी मांडतं. पाश्चात्त्य देशांत शाेध लागले. आपली आत्मिक प्रगती झाली. अनेक जण जे बाेलायचंय ते बाेलत नाही. त्यांना सांगता येत नाहीये. हा माेठा धाेका आहे. हे स्त्रीयांच्या बाबतीत तर अधिक घडते. त्यांना सांगायला जागाच नाही. एका कथेसंर्दभात एका बाईचा फाेन आल्यावर ती म्हणाली किरण येलेंशी बाेलायचं आहे. तीला विश्वास बसेना की, मीच येले आहे. ती म्हणाली की, त्या किरण येले नाहीत का? मला माहिती आहे. पुरुष अशीच उत्तरं देताे... हे त्या बाईचं वाक्य हादरवून टाकणारं हाेतं. स्त्रीयांच्या बाबतीत दिसलं ते मांडत राहिलाे.
बालाजी सुतार : नको ते मन की बात करतात
माझ्या दोन शतकांच्या सांध्यावरच्या नाेंदीमध्ये ८ कथा आहेत. संदर्भा-संदर्भाने त्या चित्रीत झाल्या आहेत. पण मला माणसाची गाेष्ट जाणवत नाही. ती तुकड्या-तुकड्यांत दिसते. या २५ वर्षांत तुकडे करण्याची प्रक्रिया वाढली आहे. सतत येणाऱ्या बधीर कंटाळ्यावर आजचा उपाय म्हणजे दाेन जीबी डेटा पॅक. कथेतून प्रत्येक गाेष्टीवर उत्तर शाेधता येईल असे नाही. नैराश्याच्या भावनेतून कधी कंटाळा येताे. जीरवता येताे, पण पेलवत नाही. म्हणून ती बधीरता पेहरून घ्यावी लागते. अस्वस्थतेला वाट करून द्यायला हवी. लाेकांनी बाेलायला हवं. ज्यांनी अजिबात बाेलायला नकाे ते मन की बात करतात हे लक्षात घ्यायला हवं.
किरण गुरव : वास्तवाला कल्पनेचा पारा लावला की, भावविश्व उभं करू शकताे. अनुभवातून कथा येत राहते. भाषा हे संवादाचं माध्यम आहे. इतर माध्यमं जेव्हा बंद हाेतात तेव्हा लिहावंच लागतं.
आसाराम लाेमटे : आकांत टिपायलाच हवा
आपण जर प्रश्नच विचारणार नसू तर कुतूहल मेलेलं आहे असं समजावं. कलेचं फूल जर राजाच्या खिडकीवरच उमलणार असेल तर आम्हाला धाेका आहे. असं पाशच्या कवितेतून आलं आहे. लेखकाने प्रश्नच विचारले नाहीत तर मेणासारखं गाेठलेपण येईल. काेणतीही व्यवस्था निगरगट्टच असते. आता परिसरनिष्ठा दूर गेली आहे. त्यातील माणसाच्या मनाची उलथापालथ कथांमधून यायलाच हवी. पण, आता सत्ता महत्त्वाची ठरते. त्यात हाेरपळणाऱ्यांचा आकांत टीपला पाहिजे. नवसरंजामदार भिन्न-भिन्न वर्तुळातून आले आहेत. चांगलं लेखन हे वेदनांची कळ मारणारं असतं. सध्या सांस्कृतिक उलथापालथ हाेत आहे. काेणताही काळ आव्हानात्मक असताे लेखक ताे समजावून घेत असताे. अनेकांच्या जगण्याचा कपाळमाेक्ष हाेत आहे. त्यांच्या बाजूने बाेलत राहिलं पाहिजे.
संजय कळमकर : राजकारण बनले रंजन
नागरिकत्व कायद्यासंदर्भात माेर्चे निघतात. माेर्चातील माणसाला विचारावं का आलास. ताे म्हणताे की, नेत्यानं बाेलवलं आम्ही आलाे. नेता चांगला असेल तरच झुंड चांगली असते. राजकारण हा विकासाचा कमी आणि मनाेरंजनाचा विषय अधिक झाला आहे. गेल्य महिनाभर लाेकांनी मालिका कमी आणि बातम्या अधिक बघितल्या आहेत. ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या करायचं थांबतील त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुढारी आत्महत्या करायला लागतील. कारण पुढाऱ्यांचे मळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर फुलतात. अशी विसंगती दिसत जाते आणि तीच माझ्या कथांमधून मांडत जाताे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.