आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

700 वर्षांनंतर उस्मानाबादेत साहित्याचा जागर 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा ही संतांची भूमी. संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरोबा काकांसह अनेक संत कवींनी आपल्या अभंग रचनेतून प्रबोधनाचा जागर केला आणि ज्ञानज्योत प्रफुल्लित केली. १३ व्या शतकामध्ये उस्मानाबादच्या तेर नगरीमध्ये म्हणजे संत गोरोबा काकांच्या गावी अखिल मराठी संतांचं संमेलन भरलं होतं. आता पुन्हा याच भूमीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सुमारे ७०० वर्षांनंतर व्यापक अर्थाने मराठी साहित्याचा जागर होतोय. अर्थातच त्यामुळे उस्मानाबादकरांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. 


उस्मानाबाद हा तसा आर्थिकदृष्ट्या मागासललेला जिल्हा. निसर्गानं अवकृपा केल्यानं उद्योग-व्यापारात गती नाही, बाजारपेठेत कायम मंदी दिसते. तरुणांच्या हाताला रोजगार नसल्यामुळे चेहऱ्यावर नैराश्याच्या छटा दिसतात. हे वास्तव असलं तरी आपला सांस्कृतिक, साहित्यिक वारसा मागास नसून तो अधिक समृद्ध, संपन्न असा आहे, याचं नव्या पिढीला स्मरण व्हावं, यासाठी पुन्हा-पुन्हा साहित्य संमेलनासारख्या सांस्कृतिक उत्सवाची मागणी रेटून नेली जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या निमित्तानं जिल्ह्याला समृद्ध अशा सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडलं. उस्मानाबादला इतक्या भव्यदिव्य स्वरूपाचं, महागडं मराठी साहित्य संमेलन व्हावं, या मागणीवर खरं तर सबंध उस्मानाबादकरांचं अनेक दिवस एकमत नव्हतं, हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यासाठी निसर्गानं जिल्ह्याच्या माथी मारलेला दुष्काळ हे मुख्य कारण असून, संमेलनासाठी निधी कसा आणि कोठून उभा करायचा, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत होता. त्याचं उत्तर मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या भाषणातूनच १६ जुलै रोजी उस्मानाबादकरांना मिळाले आणि महागडं संमेलन ही अ.भा.मराठी साहित्य संमेलनाची प्रतिमा गैर असल्याचं सगळ्यांच्या ध्यानात आलं.


ठाले-पाटील यांच्या म्हणण्यानुसार, साहित्य संमेलनाचा थाट किंवा त्याची भव्यदिव्यता खर्चावर आधारित नसून मानसिकतेवर अवलंबून आहे. संमेलन घेण्याची प्रबळ इच्छा आणि त्यासाठीची धडपड महत्त्वाची आहे. पिंपरी-चिंचवडच्या प्रचंड महागड्या साहित्य संमेलनानंतर इतके भव्य संमेलन पुन्हा कोठे होईल का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी उत्तर देताना आपापल्या ऐपतीनुसार संमेलनं भरवली जातील, पिठलं-भाकरीवरही संमेलन होऊ शकतं, अशा शब्दांत संमेलनाची महागडी संकल्पना खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागातही साहित्य संमेलन होऊ शकते, असा विश्वास दुणावला. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेनं साहित्य संमेलनासाठी ९ वर्षांपासून पाठपुरावा केलेला आहे. कधी दुष्काळग्रस्त म्हणून, तर कधी मागणीत जोर कमी पडला म्हणून उस्मानाबादकरांच्या पदरी नैराश्य पडत गेलं. ९३ व्या मराठी साहित्य संमेलनासाठी दावेदारी करतानाही उस्मानाबादकरांसमोर दुष्काळाचे कारण आलेच. मात्र, 'दुष्काळातही माणसं वास्तव्य करतातच ना, म्हणून आम्ही कुठलेही उत्सव साजरे करायचेच नाहीत का?' असं संतापवजा उत्तर येताच संमेलनाच्या मागणीतली नाशिकची स्पर्धा कमी झाली आणि या वेळी उस्मानाबादकरांना साहित्याचा उत्सव भरवण्याची संधी प्राप्त झाली. 


साहित्य महामंडळाच्या सर्वच १९ सदस्यांची उस्मानाबादला संमेलन देण्याबाबत सहमती मिळाली. नगरपालिकेनेही संमेलनाच्या मागणीला पाठबळ दिले. जिल्ह्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा संमेलनासाठी आग्रह आहे, त्यावरून संमेलन अत्यंत यशस्वी होईल, यात शंका नाही. दीड वर्षापूर्वी उस्मानाबादला अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन पार पडले. दुष्काळाची दाहकता होतीच. मात्र, उस्मानाबादकरांनी संमेलन अभूतपूर्व यशस्वी करून मागासलेपणाची मानसिकता अवास्तव असल्याचं दाखवून दिलं. भौतिक सुख-सुविधा म्हणजे संमेलन, पैशांची उधळपट्टी म्हणजे संमेलन, थाट-माट म्हणजे संमेलन, ही मानसिकता गैर असल्याचं या संमेलनातून स्पष्ट झालं होतं. 


उस्मानाबादला ऐतिहासिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीचे अनेक कंगोरे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान म्हणून तुळजाभवानी मातेचे शक्तिस्थान, तर संत साहित्याचे परीक्षक म्हणून लौकिक असलेले संत गोरोबा काकांचे पीठ आहे. दुष्काळात पिचणाऱ्यांच्या समस्या आहेत, तर दुष्काळातही शेतीचं गाणं गाणाऱ्या बळीराजाच्या यशोगाथाही आहेत. येणाऱ्या मराठी साहित्य संमेलनातून या सगळ्यांचा उहापोह होईल आणि जिल्ह्याचा समृद्ध सांस्कृतिक इतिहास नव्या पिढीला अवगत होईल, याची खात्री आहे. 


उस्मानाबादचा साहित्याशी संबंधही जुनाच आहे. अगदी १३ व्या शतकातील संत कवी गोरोबा काकांच्या काळापासून. संत कवी गोरोबा काकांच्या उपस्थितीत मराठी संतकवींचे भव्य संमेलन तेरनगरीमध्ये भरले होते, असा संदर्भ संत साहित्यात आढळतो. संत गोरोबा काकांच्या साहित्याचे अभ्यासक प्रा. दीपक खरात यांच्या अभ्यासानुसार, विविध संतांच्या वाङ्मयातून तेरनगरीमध्ये १३ व्या शतकात एेतिहासिक संत संमेलन भरल्याचा संदर्भ आढळतो. मात्र, त्याची निश्चित तारीख नमूद नाही. प्रा. खरात म्हणतात, 'ज्येष्ठ संत गोरोबा काकांच्या निवासस्थानी किंवा तेरच्या प्राचीन त्रिविक्रम मंदिरात संमेलन भरले असावे. गोरोबा काकांच्या चरित्रातही तसा संदर्भ आहे. त्या काळी साहित्य संमेलन असे शीर्षक नसले तरी संतांच्या अभंग रचना हे साहित्याचेच अंग आहे. त्यामुळे संत संमेलनाला वर्तमानात साहित्य संमेलन म्हटले तर वावगे ठरणार नाही. साहित्य संमेलनाच्या मागणीसाठी जोर वाढत असताना भौगोलिक परिस्थिती, राजकीय वजन आणि पर्याप्त साधनांचा विचार केला जातो. देशभरातून येणाऱ्या मराठी रसिक-साहित्यिकांचे यथोचित आदरातिथ्य निश्चित होईल. त्यात थाटमाटाचा बडेजाव नसला तरी आपुलकीचा गोडवा असेल, यात शंका नाही.

 
चंद्रसेन देशमुख ब्युरो चीफ, उस्मानाबाद 
chandrasenndtv@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...