आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतीच्या पावसाने मराठवाडा चिंब, जायकवाडीचे मुख्य दहा गेट चौथ्यांदा अर्धा फूट उघडले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : परतीच्या पावसाने पुन्हा एकदा मराठवाडा चिंब न्हाऊन निघाला. रविवारी नांदेड, परभणी, हिंगाेली, जालना, औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जाेरदार पाऊस झाला. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणी साठा पुन्हा एकदा शंभर टक्क्यांवर पाेहाेचलण्याने धरणाचे मुख्य दहा दरवाजे रविवारी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले. जायकवाडीत कमी अधिक आवक सुरूच आहे.

आज रविवारी सकाळी धरणाच्या मुख्य २७ गेट पैकी दहा गेट अर्धा फूट उघडून ५२४२ क्युसेक सह जलविद्युत केंद्रामधून १५८९ क्युसेक असा एकूण ६८२९क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात केला जात आहे. जायकवाडीतून आज चौथ्यांदा पाणी सोडले जात असून धरणावरील आठ बंधारे यापूर्वीच तुडूंब भरले असून मराठवाड्याला मोठा दिलासा मिळाला असल्याचे अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

रविवारी दुपारनंतर नांदेड, जालना, परभणी, औरंगाबाद, बीड, हिंगाेली जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत जाेरदार पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लाेड तालुक्यातील निल्लाेड, औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात दुपारी जाेरदार वृष्टी झाली. यंदा जायकवाडी धरण मार्चमध्येच मृत साठ्यावर आल्याने व त्यातच पावसाच्या सुरुवातीलाच पाऊस न झाल्याने मराठवाड्याला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यात नाशिक भागातील पावसाने जायकवाडीचा पाणीसाठा झपाट्याने वाढत थेट शंभर टक्क्यांवर येत आज चौथ्यांदा पाणी सोडावे लागले. या विसर्गामुळे गाेदावरी पुन्हा एकदा फुगली आहे.

या गेटमधून विसर्ग
गेट क्र.१०,२७,१६,२१,१४,२३,१२,२५,११,२६ हे अर्धा फूट उंचीने उघडून ५२४० क्युसेक विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे.
सध्या सांडव्यांतून ५२४० व जलविद्युतकेंद्रामधून १५८९ क्युसेक असा एकूण ६८२९ क्युसेक इतका विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे

या धरणांतून आवक सुरू
नांदूर मधमेश्वर १११९२ क्युसेक, नागमठाण १४४०, भंडारदरा ८१४, निळवंडे ७००, ओझर वेअर १४७६, भावली २६, दारणा २५०, गंगापूर २८५, कडवा २१२ आणि अळंदीतून ३० क्युसेकने आवक सुरू आहे.

डाव्या, उजव्या कालव्यातून विसर्ग
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झाला असताना धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. तथापि, धरणाच्या चाऱ्यांतून पाणी सोडण्याची मागणी संत एकनाथ सचिन घायाळ शुगरचे चेअरमन सचिन घायाळ यांनी केली आहे.