आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिघाडीमुळे मराठवाड्याची मंत्रिमंडळात आघाडी, विरोधामुळे सत्तार ‘राज्यमंत्री’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीचे तीन, काँग्रेसचे दोन तर शिवसेनेच्या दोघांना मंत्रिमंडळात स्थान
  • औरंगाबादच्या विरोधामुळेच सत्तार यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकले नसेल
  • शेवटी सत्ता महत्त्वाची मानून अशोक चव्हाण राजी

दीपक पटवे 

औरंगाबाद - तीन पक्षांच्या सरकारमुळे मराठवाड्याचा फायदा झाला आहे. सत्ताधारी तीन पक्षांचे मिळून एकूण ३२ आमदार मराठवाड्यात आहेत. त्यातल्या तब्बल सात जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. सर्वाधिक औदार्य राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवले आहे. आठपैकी तीन जणांना मंत्री करण्यात आले आहे. मागच्या सरकारच्या काळात भाजपने चार आणि शिवसेनेने एक मंत्रिपद मराठवाड्याला दिले होते. नव्या मंत्र्यांमध्ये अब्दुल सत्तार मंत्री तर झाले, पण त्यांना राज्यमंत्री पदावर समाधान मानावे लागले आहे. याउलट अनपेक्षितपणे पैठणचे संदिपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. भाजपमध्ये जाता जाता अचानक दरवाजे बंद झाल्यामुळे सत्तार यांची काही दिवस कोंडी झाली होती. पण शिवसेनेने त्यांच्यासाठी दरवाजे उघडले आणि नंतर तर शिवसेनेचीच सत्ता आली.आपण कॅबिनेट मंत्री होणार, असे सत्तार निवडणुकीच्या वेळीच सांगत होते. ते स्वाभाविकही होते. कारण आधी ते कॅबिनेट मंत्री झाले होते. मात्र, अचानक राज्यमंत्री कसे? असा प्रश्न शपथविधीच्या वेळी सर्वांनाच पडला होता. भाजपमधील स्थानिक विरोधामुळे त्यांना भाजप प्रवेश करता आला नाही आणि आता स्थानिक म्हणजे औरंगाबादच्या विरोधामुळेच कॅबिनेटमध्ये स्थान मिळू शकले नसेल हे उघड आहे. सत्तार काँग्रेसमध्ये होते तेव्हापासून शिवसेनेच्या औरंगाबाद जिल्ह्यातील नेते आणि त्यांच्यामधून विस्तव जात नव्हता. तरीही उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेत घेतले. आता ते कॅबिनेटमध्ये गेले तर थेट पालकमंत्री म्हणून डोक्यावर येऊन बसतील आणि आपण सांगू तसे निर्णय घेणार नाहीत ही भीती सेनेतील औरंगाबादच्या नेत्यांच्या मनात असेल. त्यामुळेच सत्तार यांची कॅबिनेटमधून राज्यमंत्रिपदावर घसरगुंडी झाली असण्याची शक्यता आहे. भुमरे यांचे मंत्रिपद म्हणजे कार्यकर्त्याला सांभाळणाऱ्या शिवसैनिकाला पक्षाने दिलेला न्याय आहे, असे वर्णन त्यांना ओळखणारे जिल्ह्यातील अन्य पक्षाचे नेतेही करीत आहेत. 
 मला भलेही बिनखात्याचे करा, पण मंत्री करा, असे भुमरे सांगत होते, असेही काही राजकारणी आज एकमेकांना सांगत होते. आता त्यांच्याकडे कोणते खाते येते आणि पालकमंत्रिपद कोणाला मिळते यावर पुढचे खेळ अवलंबून आहेत. धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांना कॅबिनेटमध्ये स्थान असेल हे अपेक्षितही होते. त्यांच्या अनुभव लक्षात घेता ते पक्षाला नाकारता येण्यासारखे नव्हतेच. पण उदगीरच्या संजय बनसोडेंना स्थान मिळणे हे थोडे आश्चर्याचेच म्हणायला हवे. अजित पवारांचे खास कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. अजित पवारांच्या शपथविधीनंतर त्यांना शिवसैनिकांनी विमानतळावरून धरून हाॅटेलमध्ये आणले होते हे महाराष्ट्रातील जनतेला आठवत असेल. अनुसूचित जातीतील तो एक चेहरा आहे. त्यामुळे की अजित पवारांनी आग्रह केल्यामुळे त्यांना ही संधी मिळाली, हे कळायला मात्र थोडा काळ जाऊ द्यावा लागेल. शेवटी सत्ता महत्त्वाची मानून अशोक चव्हाण राजी

अमित देशमुख आणि अशोक चव्हाण या मराठवाड्यातील दोघांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले आहे. अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री असूनही मंत्रिपदावर जायला तयार झाले. शेवटी सत्ता महत्त्वाची. वडील शंकरराव चव्हाण यांच्याबाबतीतही तेच घडले होते. हा विचार अशोकरावांनी केला असेल. अमित देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यात तसे काही सख्य राहिलेले नाही. शिवाय, अमित देशमुख पक्ष सोडणार आहेत, अशा वावड्या  निवडणूक काळात उठल्या होत्याच. त्यामुळे अमित यांनाही खुश ठेवणे आवश्यक होते. संभाजीराव निलंगेकरांच्या मंत्रिपदाच्या काळातील प्रभावाची आणि आक्रमकतेची तुलना अमित यांच्याशी यापुढे होत राहणार आहे. त्याच मापात अमित यांचा प्रभाव तोलला जाण्याची शक्यता आहे. निदान लातूरकर तरी तेच करतील, हे उघड आहे. त्यात अमित उत्तीर्ण होतील का, याचेही उत्तर लवकरच मिळणार आहे.