आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Marathwada Mukti Sangam Day Special: Sher e Hyderabad; Nizam To Be Scared To Baba Saheb Marathwada Mukti Sangam Day Special: Sher e Hyderabad; Nizam Scared To BabaSaheb

मराठवाडा मु्क्तीसंग्राम दिन विशेष : शेर-ए-हैदराबाद; बाबासाहेबांना घाबरायचा निझाम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रा. गो. ऊर्फ बाबासाहेब परांजपे आपल्या कार्यकर्त्यांसोबत. - Divya Marathi
रा. गो. ऊर्फ बाबासाहेब परांजपे आपल्या कार्यकर्त्यांसोबत.

निझामाच्या जुलमी राजवटीतून तसेच गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी मराठवाड्याला मोठा संघर्ष करावा लागला. त्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडे होते. त्यांचे ज्येष्ठ सहकारी रा .गो. ऊर्फ बाबासाहेब परांजपे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ते गांधीवादी पण जहाल क्रांतिकारी होते. मराठवाड्यातील लोक त्यांना ‘शेर–ए- हैदराबाद’ या नावाने संबोधत होते. त्यांना स्वत: निझाम घाबरायचा. त्याने बाबासाहेबांना पकडून समोर उभा करणाऱ्यासाठी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. निझामाचे अधिकारी म्हणायचे ‘बाबासाहेब का भाषण सुनने से मुर्दे भी जिंदा होते है’ हैदराबाद सारख्या मोठ्या, संपन्न संस्थानावर राज्य करत असलेली जुलमी आणि धर्मांध सत्ता १७ सप्टेंबर १९४८ रोजी इतिहासजमा झाली. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याला पूर्णता आली. १० वर्षे हा लढा चालला. जनता महात्मा गांधींच्या मार्गाने सत्याग्रही लढा देत होती. अनेक निशस्त्र सत्याग्रहींना तुरुंगवास झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांना या लढ्यात कम्युनिस्ट, आर्य समाजी, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच वेगवेगळ्या संघटनांचे समर्थन होते. बाबासाहेब परांजपे हे त्यांचे निकटचे सहकारी होते. शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसोबत त्यांनी प्रचंड निष्ठेने हे कार्य समोर नेले. निझाम आणि रझाकारांच्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारला. मुक्ती लढ्यात भाग घेणाऱ्यांसाठी प्रशिक्षण कॅम्प उभारले. शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी संपर्क साधला. ते स्वत: हात बॉम्ब तयार करायचे. त्यांच्या सहवासात अनेक कार्यकर्ते तयार झाले. ते जहाल क्रांतिकारी होते पण त्यांचे मन सात्विक आणि विवेकी होते. निष्पाप मुस्लिम जनतेवर हल्ले होऊ नयेत, यावर त्यांचा कटाक्ष असायचा. पण जुलमी रझाकार आणि निझामाला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी त्यांनी प्रखर राष्ट्रवादाच्या प्रभावी वक्तृत्वाने तरुणांच्या मनात अंगार फुलवले. आत्मसमर्पण करणाऱ्या तरुणांचे जाळे उभे केले. हे पाहून स्वत: निझाम त्यांना घाबरू लागला. त्यांच्यावर निझामाने  ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पण बाबासाहेबांचे कार्य सुरूच राहिले, ते सापडले नाहीच. 

अधिकाऱ्यांवरही जरब
निझामाचे अधिकारी म्हणायचे ‘बाबासाहेब का भाषण सुनने से मुर्देभी जिंदा होते है’ असा हा धुरंधर सेनानी हैदराबाद मुक्ती संग्रामातील अजोड क्रांतिकारी होता. अंबाजोगाई येथील ग्राम भारती शिक्षण संस्थेच्या वतीने प्रकाशित सुहास काटे लिखित ‘पू. रा. गो. तथा बाबासाहेब परांजपे व्यक्तिमत्व व कार्य’ या पुस्तकाच्या रूपाने बाबासाहेबांचे कार्य प्रथमच समाजासमोर आले आहे. यात त्यांच्या जीवन प्रवासावर विस्तृत प्रकाश टाकण्यात आला आहे. ़

मराठवाड्याचा सर्वांगीण ध्यास बाबासाहेबांनी घेतला होता. जनतेला हक्काची जाणिव करूण देणारा दलित मित्र, विचारवंत लोकशाही मूल्यांचा पुरस्कर्ता, सच्चा समाजसेवक, जहाल क्रांतिकारी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. मराठवाड्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांनी केलेली कामगिरी मोठी आहे. 

अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेसोबत पीपल्स कॉलेज नांदेड, उद्यगिरी महाविद्यालय उदगीर, यांच्या कार्यकारिणीवर ते कार्यरत होते. लातूर येथील दयानंद आणि बसवेश्वर महाविद्यालय तसेच पुरणमल लाहोटी तंत्र निकेतनच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. परभणी येथे झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
 

स्मृतींचे जतन
लातूर आणि अंबाजोगाई या दोन्ही ठिकाणी त्यांचे वास्तव्य राहिले. योगेश्वरी शिक्षण संस्थेने महाविद्यालय परिसरात त्यांचा पुतळा उभारला आहे. येथेच त्यांच्या नावाने एक शारीरिक शिक्षण महाविद्यालय तसेच निवासी अपंग विद्यालय आहे. शिवाय एका प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. लातूर येथेही एक फाउंडेशन तसेच वाचनालय कार्यरत आहे. लातूर नगर परिषदेने एका रस्त्याला त्यांचे नाव दिले आहे.  नळदुर्ग येथेही त्यांच्या नावाने लोकवाचनालय सुरू करण्यात आले आहे. अशा सेवाभावी संस्थेच्या कार्यातून त्यांची आठवण जपली आहे.