आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पाण्यासाठी मराठवाडा पोरका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी -  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांनी तत्कालीन परिस्थितीत मराठवाड्याला कधीही पाणी कमी पडू दिले नाही. मात्र, आता याउलट परिस्थिती सरकारने निर्माण केली आहे. वरच्या भागातील पाणी जायकवाडीत सोडले जात नाही. अप्पर पैनगंगेची अशीच अवस्था झाली आहे. पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम राज्यातील भाजप सरकारने चालवले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सोमवारी (दि. २९) येथे केली.  

 
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त येथील  ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा झाली. त्या वेळी खा. चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर कडाडून टीका करताना केवळ ३० टक्के मत असलेले भाजप व सेना सत्तेत आहे, तर ७० टक्के मतांचे विभाजन विविध पक्षांमध्ये झालेले आहे. त्याचा परिणाम जनतेला अनेक विपरीत धोरणांना तोंड देण्यात होऊ लागला आहे. या सर्वांनी एकत्र येऊन भाजप सरकारला पायउतार करण्याची गरज आहे, असे आवाहन खा.चव्हाण यांनी या वेळी केले.  


खा. चव्हाण म्हणाले,  जातीयता निर्माण करणारे हे सरकार मतपेट्या भरण्याचे काम करीत आहे. शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे जिव्हाळयाचे प्रश्न न सोडवता सरकार  जनतेला महागाईत लोटण्याचेच काम करीत आहे.   पाण्याच्या प्रश्नावर आतापासूनच मराठवाडा वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या अमेरिकेत तर मंत्री संभाजी पाटील रात्रीच्यावेळी दुष्काळाची पाहणी करीत आहेत, असा टोला खा. चव्हाण यांनी लगावला.  
 या वेळी खा.  राजीव सातव, आ. विजय वडेट्टीवार यांनीही राज्य सरकारवर टीका केली.  व्यासपीठावर महापौर मीना वरपुडकर, माजी खा.तुकाराम रेंगे, प्रकाश सोनवणे, बी.आर.कदम, तौफिक मुलानी, आ.वजाहत मिर्झा, माजी आ.सुरेश देशमुख, जयश्री खोबे, रविराज देशमुख आदी उपस्थित होते.  

 

सभेला स्वच्छता कामगार 
महापालिकेवर सत्ता असलेल्या काँग्रेसने सभेची सकाळची वेळ लक्षात घेऊन गर्दी होते की नाही, या साशंकतेने महापालिकेतील स्वच्छता कामगारांना या सभेसाठी हजर राहणे सक्तीचे केले होते. त्यामुळे सभेत महिला कामगार झाडूंसह उपस्थित होत्या. सभेनंतर  ऑटोरिक्षातून या महिला कामगार परतत होत्या. त्यांच्यासाठी ऑटोरिक्षांचीही व्यवस्था करण्यात आली होती.

 

एमआयएमविरोधात तीव्र टीका  
काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत एमआयएमवर सर्वच नेते मंडळींनी कडाडून टीका केली.. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आ. वडेट्टीवार, आ.वजाहद मिर्झा यांनी एमआयएमचे नाव न घेता हैदराबादचे पार्सल परत पाठवा असे आवाहन केले. वडेट्टीवर यांनी तर हैदराबादवाला हा भाजपचा दलाल आहे, असे नमूद करताना एमआयएमला जाती-धर्माचे काही देणे-घेणे नाही केवळ पैसे घेऊन मतांचे विभाजन करण्याचे काम एमआयएमने सुरू केले आहे, अशी टीका केली. खा.चव्हाण यांनीही एमआयएमपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

बातम्या आणखी आहेत...