आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधिमंडळात आमदारांचे तोंडावर बाेट; प्रश्न न विचारण्याचा ‘अर्थ’ तरी काय ? दुष्काळग्रस्त मराठवाड्यातले सर्व प्रश्न सुटले आहेत काय?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दुष्काळ, बेरोजगारी व मागासलेपणामुळे पिचलेल्या मराठवाड्यातील सर्व प्रश्न संपले आहेत काय, असा प्रश्न नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. याचे कारण म्हणजे काही अपवाद वगळता या विभागातील सर्वपक्षीय आमदारांनी आपल्या भागातील प्रश्न सभागृहात मांडण्याची तसदीही घेतल्याचे दिसले नाही. सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे दुष्काळाबाबत पहिल्या दिवशीच्या चर्चेला उपस्थित राहण्याची गरजही या आमदारांना वाटली नसल्याचे दिसून आले. दाेन आठवड्यांच्या या अधिवेशनात मराठवाड्यातील फारच कमी आमदार पूर्णवेळ सभागृहात दिसले. जे आले त्यांनी या भागातील प्रश्न मांडण्याएेवजी मुंबई-काेकणातील समस्यांना वाचा फाेडण्यात धन्यता मानली. याउलट मराठवाड्याबाहेरील आमदारांनी मात्र या भागातील प्रश्नांच्या आधारे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरल्याचे दिसले.  विधिमंडळात प्रश्न मांडून आपल्या भागातील समस्या साेडवून घेण्यासाठी आमदारांनी आग्रही राहणे अपेक्षित असते. मात्र, या अधिवेशनात तारांकित प्रश्न, लक्षवेधी, आैचित्याच्या मुद्द्यात मराठवाडा क्वचितच दिसला.

 

तारांकितमध्ये मोजकेच प्रश्न : स्थानिक आमदारांना बाहेरच्या समस्यांचा कळवळा

अवघे २१ तारांकित प्रश्न

> प्रत्येक आमदाराला त्या दिवसांसाठी नेमून दिलेल्या खात्यासंदर्भात ३ तारांकित प्रश्न विचारता येतात. 
> विधानसभेचे सचिव जितेंद्र भोळे यांनी २४ एप्रिल रोजी तारांकित प्रश्न विचारण्यासाठी सूचना जारी केली होती. 
> ९ मेपासून ऑनलाइन पद्धतीने प्रश्न स्वीकारण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात २९६ प्रश्न विचारण्यात आले. 
> यात मराठवाड्याचे केवळ २१ तारांकित प्रश्न हाेते.  मुंबई, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांचा मात्र भडिमार हाेता.


या आमदारांनी मांंडले प्रश्न : कळमनुरीचे संतोष टारफे, हिंगोलीचे तानाजी मुटकुळे, देगलूरचे सुभाष साबणे, परभणीचे राहुल पाटील, आष्टीचे भीमराव धोंडेंचे तारांकित प्रश्न हाेतेे. राहुल मोटे (परंडा), अमित देशमुख (लातूर), ज्ञानराज चौगुले (उमरगा) यांची उपस्थिती. अर्थात यापैकी बऱ्याचशा प्रश्नांवर चर्चा झालीच नाही.

 

बाहेरच्या आमदारांना आपली ‘काळजी’
जयंत पाटील (सांगली) यांनी पैठणच्या शेतकरी पीक विम्याचा, अबू आझमी यांनी परभणी जिल्ह्यातील शिक्षण संस्थेतील अपहाराचा, नगर जिल्ह्यातील वैभव पिचड, दत्तात्रय भरणेंनी गंगाखेड कारखान्याचा, अतुल भातखळकर यांनी नळदुर्गमध्ये नदीपात्रात बोट उलटल्याबद्दल, तर सुनील प्रभू यांनी औरंगाबादच्या तिसगाव येथील शासकीय जमिनीच्या अवैध विक्रीचा मुद्दा सभागृहात मांडला हाेता.

 

माहिती व हितसंबंधांचा खेळ
नियमाप्रमाणे कोणताही आमदार कोणत्याही मतदारसंघातली माहिती सभागृहात विचारू शकतो. पण प्रत्येक आमदाराला आपल्या मतदारसंघातील भानगडीच्या प्रश्नांविषयी माहिती हवी असते. हे करतानाच ठेकेदार, स्थानिक नेता, सरकारी अधिकारी यांच्याशी हितसंबंधही जोपासायचे असतात. यामुळे ते इतर मतदारसंघातील आमदाराला आपल्या मतदारसंघातील प्रश्न टाकण्यास तयार करतात. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याचे प्रकार घडले होते. विधिमंडळातही असे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-डॉ. कुमार सप्तर्षी, माजी आमदार

बातम्या आणखी आहेत...