दिव्य मराठी सर्व्हे / ८३ % विद्यार्थ्यांना माहीत नाहीत हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे सेनानी; औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबादेतील ५०० विद्यार्थ्यांचा सर्व्हे

 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान उघड; ३८ % विद्यार्थ्यांचे म्हणणे गोपाळ आगरकर होते सेनानी

मंदार जोशी/दिव्य मराठी चम

Sep 17,2019 08:08:00 AM IST

मराठवाडा - निझामाच्या जुलमी सत्तेविरोधात लढताना मराठवाड्यातील अनेकांना हौतात्म्य आले. १७ सप्टेंबर १९४८ ला निझामी राजवटीचा अस्त झाला. ७१ वर्षांपूर्वी लढल्या गेलेल्या या लढ्याला आज ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठवाड्याच्या मातीतील या लढ्याबद्दल तरुण पिढी मात्र अनभिज्ञ आहे. ‘दिव्य मराठी’ने औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील ५०० विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला. यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ६८%विद्यार्थ्यांना या लढ्याविषयी माहितीच नाही तर केवळ १७ % विद्यार्थ्यांना हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे स्वातंत्र्यसेनानी कोण होते याची माहिती आहे. धक्कादायक म्हणजे, ७५% विद्यार्थ्यांना पाचही प्रश्नांची खरी उत्तरे देता आली नाही.

असा केला सर्व्हे
हैदराबाद मुक्ती संदर्भातील पाच बहुपर्यायी प्रश्न असलेला एक फॉर्म विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यावर त्यांचे नाव, महाविद्यालय, वय, मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी अशी माहिती नमूद करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरुन दिल्यानंतर त्यांना बरोबर उत्तरांची माहिती देण्यात आली.
बीड, जालना, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यातून प्रत्येकी १०० तर औरंगाबाद शहरातून २०० तरुणांना या सर्व्हेत सहभागी करुन घेण्यात आले. यात एकूण आठ महाविद्यालये आणि विद्यापीठातील काही विभागांचा सहभाग होता.


लढ्याविषयी अस्मिताच नाही
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही निझामाच्या अधिपत्याखालील हैदराबाद व मराठवाडा तब्बल १३ महिन्यांनंतर भारताचा भाग झाला. मराठवाड्याच्या मातीतील हा सर्वात मोठा लढा होता. निजाम सैन्याचा भाग असलेल्या रझाकारांच्या अमानुष अत्याचाराला अनेक जण बळी पडले मात्र असे असूनही याची माहिती मराठवाड्यातील आजच्या पिढीतील तरुणांना नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

ही दुर्दैवाची बाब
या मुक्तिसंग्रामातील सेनानी हे फक्त स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्ते नव्हते, तर अनेक सामाजिक चळवळींशीदेखील त्यांचा सहभाग होता. आजच्या तरुण पिढीला या सेनानींची माहिती नाही ही दुर्दैवाची बाबा आहे. स्वातंत्र्य रामानंद तीर्थ विद्यापीठात या संग्रामावर एक स्वतंत्र पेपर आहे. मराठवाडा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तो नाही. शालेय स्तरावर देखील यावर परीक्षा आणि माहीती देणे गरजचे आहे.
प्राचार्य शरद अदवंत, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्र.

हैदराबाद मुक्तिसंग्राम काय आहे ?
0८ % भारतीय स्वातंत्र्याचा लढा
१२ % महाराष्ट्राचा स्वातंत्र्यलढा

६४ % निझामापासून हैदराबादची मुक्तता

१६ % आदिलशहापासून मराठवाड्याची मुक्तता

उत्तर : निझामापासून हैदराबादची मुक्तता

मराठवाडा कधी मुक्त झाला?

१३ % १५ ऑगस्ट १९४७

०५ % ९ सप्टेंबर १९४९

०४ % २६ जानेवारी १९४९

७८ % १७ सप्टेंबर १९४८

हे हैदराबाद मुक्ती संग्राम सेनानी होते?
२२ % लोकमान्य टिळक

३८% गोपाळ गणेश आगरकर

२३ % स्वामी दयानंद सरस्वती

१७ % स्वामी रामानंद तीर्थ

उत्तर : स्वामी रामानंद तीर्थ

पोलिस अॅक्शन घेण्याचे आदेश कुणी दिले?

३२ % जवाहरलाल नेहरू

१७% महात्मा गांधी

२९ % वल्लभभाई पटेल

२२ % मीर उस्मान अली

उत्तर : वल्लभभाई पटेल

निझाम स्टेटची राजधानी कोणती ?

३६ % हैदराबाद

१२% निझामाबाद

१८ % सिकंदराबाद

३४ % औरंगाबाद

उत्तर : हैदराबाद

X
COMMENT