आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेंडूची फुले अभियान उत्पादकांसाठी वरदान; दसऱ्याला १७ दिवसांत ५ हजार शेतकऱ्यांना फायदा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संताेष काळे 

औरंगाबाद - दिवाळीला झेंडूच्या फुलांची मोठी खरेदी होते. पण भाव घसरल्यामुळे कवडीमोल दराने झेंडू विकावा लागतो, परिणामी फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नाही. त्यामुळे अल्पभूधारक झेंडू उत्पादक बळीराजाच्या मदतीला आता झेंडू अभियान धावून आले आहे. राज्यभर एकाच दराने झेंडू खरेदी करण्याचे अभियान यंदाच्या दिवाळीत राज्यभर राबवले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील साडेतीन हजार झेंडू उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. 

दसरा - दिवाळी या सणांना झेंडूच्या फुलांची माेठ्या प्रमाणावर खरेदी हाेते. उत्पादन खर्च खूप असला तरी फूल उत्पादक शेतकरी माेठ्या आशेने या फुलांची लागवड करतात, परंतु बऱ्याचदा बाजारात फुलांना रास्त भाव न मिळाल्याने पाच रुपये, दहा रुपये अशी कवडीमाेल किंमत पदरात पाडून शेतकरी या फुलांची विक्री करतात. बऱ्याचदा ती फेकून देण्याची वेळही त्यांच्यावर येते. शेतकऱ्यांची ही व्यथा समजावून घेत परभणी जिल्ह्यातील पुंगळा येथील अण्णासाहेब जगताप यांनी फूल उत्पादक शेतकऱ्यांना याेग्य भाव मिळावा, यासाठी झेंडूची फुले अभियान हाती घेतले. मागील वर्षी सुरू झालेले हे अनाेखे अभियान आता एका चळवळीच्या रूपाने राज्यात विस्तारू लागले आहे. जगताप म्हणाले की, फूल उत्पादक शेतकऱ्यांचा ५० रुपये उत्पादन खर्च व त्यात २५ रुपये मिसळला तर त्याला किमान २० रुपये मिळतील. त्यामुळे झेंडूच्या फुलांसाठी किमान ५० रुपये भाव निश्चित केला. त्यासाठी ग्राहकांमध्ये माेठ्या प्रमाणावर जागृती केली. त्याचा फायदा गेल्यावर्षी ग्राहकांनी जवळपास दाेन लाख रुपयांची फुलांची खरेदी केल्याने दाेन ते तीन हजार शेतकऱ्यांना फायदा झाला.

यंदा निवडणुकीमुळे फारसा प्रसार करता आला नाही, पण ५० रुपये किमतीमुळे सजग झालेल्या ग्राहकांनी यंदाच्या दसऱ्याला त्याच भावाने झेंडू खरेदी केल्याचे दूरध्वनी करून तसेच फाेटाे पाठवून कळवले. त्यामुळे यंदाच्या दिवाळीलाही झेंडूच्या फुलांची निश्चित दराने खरेदी हाेऊन त्याचा पाच हजार शेतकऱ्यांना फायदा हाेऊ शकेल, असा विश्वास व्यक्त केला. झेंडूची फुले अभियान सध्या परभणी, हिंगाेली, वसमत, नांदेड, जालना, पुणे, नाशिक, काेल्हापूर येथे राबवण्यात येत आहे.

मराठवाड्यात ४ हजार एकरांत लागवड :
मराठवाड्यात अंदाजे चार हजार एकरांत झेंडूची लागवड हाेते. हिंगाेली तालुक्यातील शेंद्रा येथे सर्वात जास्त २ ते २५०० एकरांत झेंडूची लागवड हाेते. त्याखालाेखाल जिंतूर (ता. वसमत) व नांदेड भागात लागवड हाेते.
 

साेशल मीडियावर ८० ग्रुप
प्रत्येक जिल्ह्यात झेंडूच्या फुलांचे ग्रुप तयार झाले. त्यात शेतकऱ्यांचे मोबाइल नंबर आहे. व्हाॅट्सअॅपवर  ८० ग्रुप आहेत. अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, लाेकप्रतिनिधी, नागरिकांना झेंडूची फुले ५० रुपयानेच खरेदी करण्याचे आवाहन केले. ठरलेल्या भावाने केलेल्या खरेदीचे फाेटाे ग्रुपवर टाकले जातात, फेसबुकवरही पाेस्ट स्वीकारल्या जातात.

दसऱ्याला १७ दिवसांत ५ हजार शेतकऱ्यांना फायदा
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या झेंडूला साेन्याचा भाव मिळवून देण्यासाठी गेल्या वर्षी दसऱ्याला झेंडूची फुले अभियान सुरू झाले. प्रसारासाठी दसरा ते दिवाळीचे फक्त १७ दिवस हातात हाेते. झेंडू खरेदी करणार तर किमान ५० रुपये भाव देऊनच हा निश्चय ग्राहक जागृतीतून करण्यात आला. 

बातम्या आणखी आहेत...