Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Markandeya's rally appearing with art

कलाविष्कारांचे दर्शन घडवत निघाली मार्कंडेयांची मिरवणूक; रथोत्सवात ३० मंडळे सहभागी

प्रतिनिधी | Update - Aug 27, 2018, 11:23 AM IST

पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी रथोत्सव मिरवणूक उत्साहात पार पडली.

 • Markandeya's rally appearing with art

  सोलापूर- पद्मशाली समाजाचे कुलदैवत मार्कंडेय महामुनी रथोत्सव मिरवणूक उत्साहात पार पडली. मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पालखी व उत्सवमूर्ती रथात विराजमान झाल्यानंतर भक्तिमय वातावरणात सवाद्य मिरवणूक सुरू झाली. जय मार्कंडेयच्या जयघोषात तरुणाईचा मिरवणुकीत उत्साही सहभाग राहिला. सुमारे ३० मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली होती. झांज, नृत्यपथक, लेझीम, नाशिक ढोल, पारंपरिक वाद्य पथक, शक्तिप्रयोग आदींसह विविध कलाविष्कारांचे दर्शन घडवत उत्साही मिरवणूक निघाली. बहुतांश मंडळांनी संगीत डॉल्बी, डीजे लावला होता. त्याच्या तालावर तरुणाईने नृत्य सादर करत मिरवणुकीतील उत्साह वाढवला.


  नारळी पौर्णिमेनिमित्त मार्कंडेय रथोत्सव पूजा पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार शरद बनसोडे यांच्या शुभहस्ते झाली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांनी मंदिरात दर्शन घेतले. आमदार प्रशांत परिचारक, महापौर शोभा बनसोडे, नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले, आनंद चंदनशिवे, ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, सेक्रेटरी सुरेश फलमारी, शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी दशरथ गोप, सत्यनारायण बोल्ली, माजी महापौर जनार्दन कारमपुरी, नगरसेवक शशिकांत चिंची, विजया वड्डेपल्ली, देवेंद्र कोठे, काशीनाथ गड्डम, अशोक इंदापुरे, राकेश पुंजालसह समाज बांधव उपस्थित होते.


  सकाळी श्री. कोठे यांच्या हस्ते पद्मपताका चढवला. त्यानंतर पद्मशाली पुरोहित संघाने महापूजा केली. जानवे परिधान करून रक्षाबंधन सोहळा झाला. सुतापासून बनवलेल्या राख्या समाजबांधवांना बांधल्या. रथोत्सवाला सुरुवात झाली. मिरवणूक विजापूर वेस येथे आल्यानंतर मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.


  मिरवणूक मार्ग असा
  पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनींचा रथोत्सवास सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला. ही मिरवणूक सिद्धेश्वर पेठ, मार्कंडेय मंदिर, विजापूर वेस, जगदंबा चौक, पद्मशाली चौक, कुचननगर, दाजी पेठ, भद्रावती पेठ, जोडबसण्ण, मार्कंडेय चौक, राजेंद्र चौक, नेताजीनगर, जोडभावी पेठ, कन्ना चौक, उद्योग बँक, साखर पेठ, समाचार चौक, माणिक चौक, विजापूर वेसमार्गे मंदिरात सांगता झाली.

  रथोत्सवातील मार्कंडेय मूर्तीची ठिकठिकाणी पूजा
  अतिशय उमद्या खिलार बैलजोडीच्या बैलगाडीत सुमारे पंधरा फूट उंच स्तंभावर मार्कंडेय ऋषींची मूर्ती ठेवण्यात आली होती. मिरवणुक मार्गात चौका-चाकौत रथयात्रा थांबवून सुहासिनींनी या या स्थंभाला आणि मार्कंडेय मूर्तीला ओवाळून पूजा केली. लहान मुलांना उचलून या मार्कंडेय मुनींचरणी भक्तीभावाने ठेवले जात असल्याचे दिसून आले.


  विणलेली वस्त्रे अर्पण
  सकाळी साडेदहा वाजता निघणाऱ्या या रथोत्सवात मुख्य रथाच्या पुढे आरकाल कुटुंबीयांची वस्त्र विणण्याची सेवा सुरू होती. मिरवणुकीत सत्यम्मा आरकाल व शिवलिंग आरकाल यांनी विणलेली वस्त्रं रथातील उत्सवमूर्तीला अर्पण करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. वस्त्र अर्पण करून रथोत्सवाचा समारोप करण्यात येतो.


  अनेक भक्तांनी व संस्थांनी दहा-दहा फुटांचे भरगच्च हार ठिकठिकाणी या मार्कंडेय मूर्तीला अर्पण करत होते. संपूर्ण रथ फुलांच्या हारांनी लगडून गेला होता. रथोत्सवाच्या अग्रभागी हिरा नावाचा पांढरा शुभ्र अश्व सहभागी होता. ढोल-ताशाच्या निनादात पुढचे दोन्ही पाय उचलून त्याने केलेले नृत्य प्रमुख आकर्षण बनले होते.
  पद्मशाली चौकातून रथोत्सवाला खऱ्या अर्थाने जल्लोषाचा रंग चढला. दत्तनगरात माजी आमदार नरसय्या आडम यांनी रथोत्सवाचे स्वागत केले आणि तेथून अधिक जल्लोषात मिरवणूक पुढे निघाली.


  ही मंडळे सहभागी
  जे. पी. कंपनी, ओमसाई प्रतिष्ठान, महालक्ष्मी मित्र मंडळ, जोडभावी पेठ मार्कंडेय जन्मोत्सव मंडळ, ओम शिव डान्स ग्रुप, दत्तात्रय शक्ती लेझीम संघ, वाघ गर्जना मंडळाचा मुलींचे झांज पथक आदी मंडळांचा सहभाग मिरवणुकीत उत्साही राहिला.

Trending