आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन होती म्हणून रोखलेला बालविवाह वय पूर्ण झाल्यानंतर थाटामाटात

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • उमरगा तालुक्यातील एकुरगा येथील अनोखा विवाह
  • बालविवाह समिती, जिजाऊ ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महिला समुपदेशकाचा पुढाकार

उमरगा - जिल्हा बालविवाह समिती, जिजाऊ ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महिला समुपदेशकाने २४ मे २०१९ रोजी होणारा नियोजित बालविवाह २१ मे रोजी रोखला. कुटुंबातील सदस्यांचे समुपदेशन करण्यात आले. आता मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतर तिचा विवाह सोमवारी (दि.२) मुलाशी थाटात पार पडला. तालुक्यातील एकुरगा येथील या विवाहासाठी दोन्ही वेळा सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतला.चार दिवस अगोदर बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा बाल विवाह प्रतिबंध समिती सदस्य सचिन बिद्री यांना प्राप्त होताच त्यांनी तत्कालीन अपर जिल्हाधिकारी पराग सोमण, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अशोक सावंत यांच्यासह पोलिसांना माहिती देऊन २१ मे रोजी बालविवाह प्रतिबंध समिती, जिजाऊ ब्रिगेड, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांनी एकुरगा गावात जाऊन आई-वडील व नातेवाइकांना एकत्र बोलावून त्यांचे समुपदेशन करून मुलीचे वय अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्यात यावा, शिवाय त्या लग्न सोहळ्यास आम्हीही उपस्थित राहू, असे सांगून कुटुंबाचे मनपरिवर्तन करण्यात आले होते. कायद्यातील तरतुदीनुसार त्या मुलीचे अठरा वर्षे पूर्ण होताच सोमवारी मोठ्या उत्साहात मुलीचा विवाह करण्यात आला. लग्न सोहळ्यास जिल्हा बाल विवाह प्रतिबंध समिती सदस्य सचिन बिद्री, महिला समुपदेशक राऊ भोसले, दक्षता कमिटी सदस्य सरोजा सूर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चना अंबुरे, तालुकाध्यक्षा रेखा पवार, सचिव मंजूषा चव्हाण, सोनल पट्टेवार, कल्पना कांबळे, नगरसेवक गोविंद घोडके यांच्यासह वऱ्हाडी मंडळींनी उपस्थित राहून नवदांपत्यांना पुढील सांसारिक आयुष्यासाठी आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्यांनी मुलीच्या आईला रोख स्वरूपात आर्थिक मदत देऊ केली. गावच्या महिला सरपंच विद्या पाटील, पोलिस पाटील महेशंकर पाटील उपस्थित होते. रोखलेला बालविवाह आणि मुलीचे अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर विवाह सोहळा संपन्न होणे, यासाठी बालविवाह प्रतिबंध समिती, जिजाऊ ब्रिगेड व महिला समुपदेशक यांनी बालविवाह रोखण्यापासून ते मुलीच्या विवाह संपन्न होण्यापर्यंत सक्रिय सहभाग दिसून आल्याने एकुरगा गावासह तालुक्यात बालविवाह बाबत जनजागृती निर्माण होण्यास मदत झाली आहे.योजना आवश्यक

एखादा बालविवाह रोखल्यावर, समुपदेशनासोबत परिवाराच्या अडचणी समजून साहाय्य आणि सहकार्य महत्त्वाचे आहे. विविध अडचणींमुळे होणाऱ्या बालविवाहाचे समूळ उच्चाटन होण्यासाठी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना समाजातल्या प्रत्येक वर्गात काटेकोरपणे राबविणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...