आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह ठरला एकाशी, लग्न दुसऱ्याशी; लग्न लावून जोडपे पोलिस ठाण्यात झाले हजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहकर - सोयरिक जुळल्यानंतर लग्नाला अवघे काही दिवस बाकी असतानाच उपवर तरुणीने प्रियकरा सोबत पलायन केले. त्यानंतर तिकडेच लग्न करून दोघेही प्रियकर-प्रेयसी दहा दिवसांनी पोलिस ठाण्यात हजर झाले. आम्ही लग्नाच्या बेडीत अडकल्याचा जबाब दोघांनीही पोलिसांकडे नोंदवला आहे. या दरम्यान, विवाह एकाशी ठरला आणि लग्न दुसऱ्यासोबतच केल्याची चर्चा अंत्री देशमुख येथील परिसरामध्ये चांगलीच रंगली आहे. 


पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, मेहरक तालुक्यामधील अंत्री देशमुख येथील एका युवतीचा विवाह रिसोड येथील तरुणासोबत सामाजिक रीतिरिवाजानुसार ठरलेला होता. लग्न काही दिवसांवरच येऊन ठेपले असताना त्या तरुणीच्या मनात काही औरच शिजत होते. लग्न ६ जून रोजी होणार होते. लग्नाच्या खरेदीच्या निमित्ताने आपण यातून बाहेर पडू असा विचार तिच्या मनात आला आणि ती याच्या संधीच्या शोधातच होती. खरेदीच्या निमित्ताने सकाळी साडेदहा वाजता ती नवरी मुलगी लग्नाच्या मेकअपचे साहित्य आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडली. मात्र ती घरी परतलीच नाही. त्यामुळे नातेवाइक चिंतीत झाले. सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही  अखेर मुलीच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शोधकार्य सुरू केले. दरम्यान, ही मुलगी देऊळगाव घुबे येथील प्रियकरा सोबत मुंबईला गेल्याची माहिती पोलिसांना समजली. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून दोघांचाही छडा लावला. दोन दिवस मुंबईला राहिल्यानंतर दोघेही शेगावला परतले. ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनात तपास करणारे पोहेकॉ रामेश्वर कोरडे यांनी तरुणाशी संपर्क केला असता त्याने आम्ही लग्न केले असून पोलिस ठाण्यात हजर होतो, असे सांगितले. पोलिसांनी दोघांच्याही आई-वडिलांना बोलावून घेतले. मुलगी सज्ञान असल्याने घरच्यांचा विरोध मावळला.

बातम्या आणखी आहेत...