आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहेरी आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, गळा घोटल्याचा प्रकार उघडकीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - माहेरी राहण्यासाठी आलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास चिकलठाणा परिसरात उघडकीस आली. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संगीता सुनील घोडके (२१, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) असे मृत महिलेचे नाव आहे. संगीताचा पती सुनील घोडके हा पसार झाला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. चिकलठाणा भागातील सावित्रीनगरात मागील सात ते आठ महिन्यांपूर्वी संगीता आई-वडिलांकडे राहायला आली होती. त्यानंतर सुनीलदेखील शिर्डीहून तिच्यासोबत आला होता. काही दिवस संगीताच्या आई-वडिलांच्या घरात राहिल्यावर दोघांनी शेजारीच एक खोली किरायाने घेतली होती. सुनील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. त्यांना एक अडीच वर्षांची मुलगी आहे. शनिवारी रात्री संगीता घरात एकटी असताना सुनील आला. मध्यरात्री त्याने घरगुती कारणातून बेदम मारहाण केली. यानंतर सुनीलने धूम ठोकली. रविवारी सकाळी संगीता अजून झोपेतून कशी उठली नाही. म्हणून तिची आई शांताबाई रोजेकर झोपेतून उठवण्यासाठी गेल्या. तेव्हा संगीताच्या तोंडातून फेस बाहेर आलेला होता. तिच्या डाव्या डोळ्याजवळ आणि पायाला ताजी जखम होती. याशिवाय तिच्या अंथरुणावर शौचदेखील दिसून आले. त्यामुळे तिला कुटुंबीयांनी तत्काळ घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर पोलिस नाईक भानुदास खिल्लारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, सुनील पसार असल्याने पोलिसांचा त्याच्यावर दाट संशय आहे. 

 

पोलिसांचा तपास सुरू 
चिकलठाणा येथील मूळच्या संगीताचा विवाह शिर्डीतील सुनील घोडकेसोबत झाला होता. सुनीलच्या त्रासाला कंटाळून ती आई-वडिलांकडे राहायला आली होती. पण सुनीलदेखील तिच्यापाठोपाठ औरंगाबादला आल्याने दोघेही गोडीने राहतील म्हणून रोजेकर कुटुंबीयांनी त्याला आश्रय दिला होता, असे निकटवर्तीयांनी सांगितले. दरम्यान, सुनीलला पकडल्यानंतरच मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...