आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरांना चिकटून आहेत विद्युत तारा, कपडे वाळत घालण्यासाठी छतावर गेलेल्या विवाहितेचा शॉक लागून दुर्दैवी अंत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर (नाशिक) - सातपूर राधाकृष्णनगरला विजेचा शॉक लागून २२ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवाार (दि. ५) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या महिलेचा ११ महिन्यांपूर्वीच विवाह झाला हाेता. या घटनेने सातपूर परिसरात सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे. 


पाेलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी, अर्चना गोरख फापाळे (२२, रा. भैरवकुंज अपार्टमेंट, राधाकृष्णनगर) या मंगळवारी (दि. ५) सकाळी साडेअकराच्या सुमारास कपडे वाळत घालण्यासाठी घराच्या गच्चीवर गेल्या होत्या. साडी वाळत घालत असताना अचानक शॉक लागून त्या जमिनीवर कोसळल्या. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. 

 

दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी गच्चीवर अडकलेली पतंग काढताना योगेश अमृत पाटील (९, रा. शिवाजीनगर) या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. तर गेल्या चार वर्षांत सातपूर भागात चार जणांना प्राणास मुकावे लागले असून अनेकांना अपंगत्व आले आहे. याची दखल घेत महिनाभरापूर्वी विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात पाहणी दौरा करत विद्युत तारा भूमिगत करण्याचे आश्वासन दिले होते. 

 

दरम्यान, घटनास्थळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता अजितकुमार पिंगळे, हेमंत बनसोड, सातपूर सभापती योगेश शेवरे, विक्रम नागरे, गणेश बोलकर, स्वप्नील पाटील, आदींसह सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली. 

 

लोकप्रतिनिधींबाबत नागरिकांची नाराजी 

निवडणूक डोऴ्यासमोर ठेवून आमदार निधीतून कोट्यवधी रुपये मंजूर करत विद्युततारा भूमिगत करणार असल्याचे केवळ आजपर्यंत आश्वासन मिळत आहे. प्रत्यक्षात मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही का होत नाही. अजून किती बळी घेणार, भूमिगत तारा काम कधी सुरू होणार असा सवाल नागरिक विशेषतः महिलावर्ग विचारत होता. 


 

बातम्या आणखी आहेत...