विवाहितेची आत्महत्या नव्हे तर खूनच, वडिलांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप
कळंब पोलिसांसह डॉक्टरांच्या भूमिकेवरही व्यक्त केला संशय
-
यवतमाळ - स्वाती भोयर हिने आत्महत्या केली नसूच तीचा खूनच करण्यात आल्याचा आरोप वडील माणिकराव गोरे यांनी केला असून शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि कळंब पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी ७ फेब्रुवारी रोजी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
यवतमाळ येथील स्वाती भोयर आपल्या दोन मुलांसह पती सुधीर भोयर यांच्या बहिणीकडे कळंबला कार्यक्रमानिमित्त गेली होती. त्या ठिकाणी पती सुधीर भोयर देखील हजर होते. अशातच १९ जानेवारीला रात्रीच्या सुमारास त्याच ठिकाणी स्वातीचा मृत्यू झाला. स्वाती हिने गळफास घेवून आत्महत्या केल्याचा दावा पती सुधीर भोयर यांच्या बहिणींसह नवाडे कुटुंबीयांनी केला. मात्र, त्या ठिकाणी नवाडे कुटुंबीयांची भूमिका संशयास्पद असल्याने स्वातीचे वडील माणिकराव गोरे यांनी स्वातीचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावी, अशी मागणी कळंब पोलिसांना केली होती. मात्र, त्यावेळी पोलिसांनी धमकावून शवविच्छेदन इन कॅमेरा न करता आटोपल्याचा आरोप माणिकराव गोरे यांनी केला. या प्रकरणी गोरे यांनी कळंब पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून स्वातीचे पती सुधीर भोयर, नणंद स्मिता नवाडे आणि नंदई विजय नवाडे यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला. मात्र, स्वाती हिने आत्महत्या केली नसून तीचा खूनच करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तसेच डॉक्टरांनी दिलेला अहवाल आणि पोलिसांनी केलेला पंचनाम्यात फरक आढळून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि कळंब पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याने या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी गोरे यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना मृतक मुलीचे पालक.