आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाविरुद्ध लग्न झाल्याने नवविवाहितेने विहिरीत मारली उडी, पण पाणीच नसल्याने जखमी होऊन रात्रभर सोसल्या कळा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - मनाविरुद्ध लग्न झाल्याने नाराज झालेली १९ वर्षीय तरुणी सासरी भोपाळला जाताना हिंगोली रेल्वे स्टेशनवर सासऱ्याला चुकांडा देऊन पसार झाली. आत्महत्येचा निर्धार करून तिने अंधारवाडी शिवारातील  विहिरीत उडी मारली. परंतु विहिरीत पाणीच नसल्याने तिला गंभीर दुखापत झाली. अख्खी रात्र तिला विहिरीत मरणयातना सोसाव्या लागल्या.  


मंगल देवानंद धुळे (१९) हिचे माहेर कुपटी (ता. कळमनुरी) आहे. गेल्या वर्षी तिचे लग्न भोपाळ येथे तिच्या नातेसंबंधांतील तरुणाशी  झाले होते. ती उन्हाळ्यात  कुपटी येथे वडील भास्कर ज्ञानोजी वाघमारे यांच्याकडे आली होती. तिला भोपाळला परत नेण्यासाठी तिचा सासरा सखाराम धुळे आले होते. हे दोघे जण कुपटीतूून हिंगोलीत आले आणि हिंगोलीतून भोपाळ येथे रेल्वेने जाण्यासाठी गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशनवर  थांबले. सासरा बाजूला गेल्याची संधी साधून मंगल  स्टेशनवरून फरार झाली आणि तिने थेट अंधारवाडी शिवार गाठले. आपल्या  इच्छेविरुद्ध लग्न केल्यामुळे  आत्महत्याच करायची असा निश्चय करून अंधारवाडी शिवारातील एका विहिरीत उडी मारली. परंतु विहिरीत पुरेसे पाणी नसल्यामुळे तिच्या हातापायाला गंभीर जखमा झाल्याने जिवंतपणीच मरण यातना सुरू झाल्या. रात्री अंधार असल्यामुळे आणि आवाज देऊनही कुणी मदतीला आले नाही. 

 

सकाळी झाली विहिरीतून सुटका

शुक्रवारी सकाळी अंधारवाडी शिवारात ग्रामस्थांना विहिरीतून वाचवा वाचवा असा आवाज ऐकू आला. त्यानंतर सदर घटनेबाबत ग्रामस्थांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संतोष वाठोरे व  पोलीस कर्मचारी राजू ठाकूर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने तिला बाहेर काढले.