50 हजारांसाठी विवाहितेचा / 50 हजारांसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ..थायराइडच्या गोळ्या तोंडात कोंबून जिवे मारण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी

Feb 28,2019 07:14:00 PM IST

अमळनेर- माहेरुन 50 हजार रुपये आण, यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पती, सासूसह सात जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत रंजिता दीपक सपकाळे (वय-32 , प्रताप मिल कंपाउंड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे सन 2005 मध्ये लग्न झाले. लग्नात मानपान झाला नाही, असे सासरच्यांचे गा-हाणे आहे.

माहेरुन 50 हजार रुपये घेऊन ये, असा आग्रह सासरच्यांनी केला. त्यासाठी विवाहितेचा पती दीपक रमेश सपकाळे, सासू इंदूबाई रमेश सपकाळे, दीर प्रवीण रमेश सपकाळे, दिराणी पूनम प्रवीण सपकाळे, नणंद नलिनी संजय अहिरे, सविता सैंदाने, कविता संदीप कांबळे हे छळ करीत होते. त्यांच्या त्रासाला कंटाळून महिलेने माहेरुन 50 हजार रुपये आणून सासरच्यांना दिले. त्यानंतर दोन महिने वागणूक सुधारली. परंतु, महिलेची नणंद कविता कांबळे ही अधून-मधून माहेरी येऊन घरात भांडण लावते. मूलबाळ होत नाही, म्हणून महिलेचा छळ होतो.

26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास महिलेस थायराइडचा त्रास होत असल्यामुळे ती झोपली होती. तिचा पती दीपक रमेश सपकाळे याने थायराइडच्या गोळ्या महिलेच्या तोंडात कोंबून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. घराचा दरवाजा बाहेरुन लावून बाहेर निघून गेला. याबाबत महिलेने घराचा दरवाजा ठोकत शेजारच्यांकडे मदत मागितली. शेजाऱ्यांनी महिलेच्या नातेवाईकांना फोन लावून बोलवून घेतले. नातेवाईक शांताबाई मोरे, वैजताबाई जाधव यांना बोलवून डॉ. निखिल बहुगुणे यांच्याकडे महिलेस उपचारासाठी दाखल केले. तपास पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर करीत आहेत.

X
COMMENT