आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहिदांच्या वारसांना 1 काेटीची मदत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - देशासाठी लढताना शहीद झालेल्या महाराष्ट्रातील अधिकारी व जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून देण्यात येणारी मदत आता २५ लाखांहून १ काेटी करण्यात आली आहे. जखमी जवानांनाही २० ते ६० लाखांपर्यंत मदत केली जाईल. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेण्यात आला. 


युद्ध व युद्धजन्य परिस्थितीत प्राण गमावलेल्या किंवा अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून एकरकमी अनुदान दिले जाते. १९९९ पर्यंत शहिदांच्या वारसांची मदत केवळ दाेन लाखांपर्यंत हाेती. २७ मार्च २०१८ला सरकारने ही मदत २५ लाखांपर्यंत वाढवली. १ जानेवारी २०१९ पासून शहिदांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या रकमेत १ काेटीपर्यंत वाढ करण्यात आली. तसेच १ ते २५% अपंगत्व आलेल्यांना २० लाख रु, २६ ते ५० % अपंगत्व आल्यास ३४ लाख, तर ५१ ते १०० % अपंगत्व आल्यास ६० लाख रुपये देण्यात येतील.  


सर्व शिक्षा अभियान शिक्षकांच्या मानधनात १,५०० रुपये वाढ
सर्व शिक्षा अभियान अपंग समावेशित शिक्षण उपक्रमातील शिक्षकांच्या मानधनात १५०० रुपये वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. आता ही रक्कम २१ हजार ५०० रुपये हाेईल. राज्यातील १९४६ विशेष शिक्षकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यासाठी ३.५० कोटी निधी सरकार देणार आहे.