Maruti Suzuki / मारुतीच्या उत्पादनात सलग चाैथ्या महिन्यात घसरण, मेमध्ये १८% घट; पुढील वर्षी बीएससी-६ नियम लागू होणार असल्याने परिणाम

एप्रिल महिन्यात उत्पादनात कंपनीनेच केली होती १० टक्क्यांची कपात

वृत्तसंस्था

Jun 11,2019 07:50:00 AM IST

मुंबई - मारुती सुझुकीने मे महिन्यात उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट केली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या फायलिंगमध्ये ही माहिती समोर आली आहे. कंपनीने ही कपात सर्वच मॉडेलमध्ये केली आहे. यामध्ये कॉम्पॅक्ट आणि छोट्या श्रेणीतील वाहनांचाही समावेश आहे. कंपनीने या वर्षी मेमध्ये एकूण १,५१,१८८ कारचे उत्पादन केले ज्यात सुपर कॅरी एलसीव्हींचा समावेश होता, तर मागील वर्षी मे महिन्यात एकूण १,८४,६१२ कारचे उत्पादन केले होते. म्हणजेच यामध्ये १८.०१ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. सुपर कॅरी श्रेणीला सोडल्यास कंपनीच्या इतर सर्व श्रेणींतील उत्पादनात घट झाली आहे.


व्हॅनच्या उत्पादनात ३४.९९ टक्क्यांची कपात : मारुती सुझुकीच्या अल्टो, स्विफ्ट, डिझायरसारख्या प्रवासी वाहनांच्या उत्पादनात १८ टक्क्यांची घट झाली आहे. छोट्या श्रेणीतील कारमध्येही मागील वर्षीच्या तुलनेत ४२.२९ टक्क्यांची कपात झाली आहे. कंपनीने कॉम्पॅक्ट श्रेणीच्या कारच्या उत्पादनात ९.५४ टक्क्यांची कपात केली आहे. मागील वर्षीच्या ९३,६४१ युनिटच्या तुलनेमध्ये यावर्षी केवळ ८४,७०५ युनिट उत्पादन झाले आहे. युटिलिटी गाड्यांच्या उत्पादनात ३.२१ टक्क्यांची कपात झाली आहे, तर व्हॅनच्या उत्पादनात ३४.९९ टक्क्यांची कपात झाली आहे. मारुती सुझुकीने एप्रिल महिन्यात उत्पादनात १० टक्क्यांची कपात केली होती जी मार्चमध्ये सुमारे २०.९ टक्क्यांच्या जवळ होती, तर फेब्रुवारीमध्ये उत्पादनात ८ टक्क्यांची कपात करण्यात आली होती.

एप्रिलमध्ये मोडला आठ वर्षांचा विक्रम
वाहन निर्मात्यांना अनेक दिवसांपासून कार विक्रीत घट सहन करावी लागत आहे. अशा परिस्थितीत कार निर्मात्या कंपन्यांना उत्पादनात घट सहन करावी लागत आहे. मागील महिन्यात महिंद्रा अँड महिंद्राने पुढील १३ दिवसांपर्यंत सर्व उत्पादने बंद ठेवणार असल्याची घोषणा केली होती. बाजारातील मागणीसोबत संतुलन ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता.

देशामध्ये वाहनांच्या उत्पादनात घट होण्याची विविध कारणे अशी
मारुती सुझुकीने दोन दशकांपूर्वी डिझेल इंजिन असलेल्या कारची निर्मिती सुरू केली होती. कंपनी सध्या त्यांच्या आठ मॉडेलचा पर्याय देते. यामध्ये स्विफ्ट, बलेनो, डिझायर, अर्टिगा एमपीव्ही, सियाझ सेडान आणि लाइट-कमर्शियल गाडी सुपर कॅरीचा समावेश आहे. मात्र, पुढील वर्षीपासून लागू होणाऱ्या बीएस-सिक्स नियमांमुळे कंपनी डिझेल कारचे उत्पादन बंद करत आहे. छोट्या कारमध्ये बीएस-सिक्स नियमांनुसार डिझेल इंजिन अपग्रेड करण्याचा खर्च खूप जास्त आहे. तसेही डिझेल कारच्या भविष्याबाबतची अनिश्चितता सलग वाढत आहे. पेट्रोल कारच्या तुलनेमध्ये डिझेल कारच्या किमती जास्त असतात.

डिझायर १० वर्षांत सर्वाधिक विक्री होणारी कार

मारुती सुझुकीची डिझायर कार मागील १० वर्षांत देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. ही कार आतापर्यंत सुमारे १९ लाख ग्राहकांची आवडीची कार झाली आहे. कंपनीने वर्ष २०१८-१९ मध्ये डिझायर कारच्या सुमारे २.५ लाख युनिटची विक्री केली आहे. म्हणजेच प्रति महिना २१ हजार डिझायरची विक्री झाली आहे. कॉम्पॅक्ट सेडान कार श्रेणीमध्ये या कारची ५५ टक्के भागीदारी आहे. मारुती सुझुकीची डिझायर गेल्या वर्षभरापासून भारतात अव्वल क्रमांकावर आहे. या कारचे इंटिरिअर, नवीन फीचर्स आणि अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स या मागणीची कारणे आहेत.

X
COMMENT