आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गॅप्याँग - दक्षिण काेरियातील चर्चमध्ये शुक्रवारी लगीनघाई हाेती. सहा हजार जाेडप्यांच्या सामुदायिक विवाह साेहळ्याचे थाटामाटात आयाेजन करण्यात आले हाेते. ते तितकेच आनंदात पार पडलेही. परंतु या साेहळ्यात सहभागी प्रत्येकाच्या मनावर काेराेना संसर्गाचे नकळत असे सावट हाेते. त्यामुळेच नवपरिणीत जाेडप्यापासून उपस्थित पाहुणे मंडळींच्या चेहऱ्यावर काेराेना प्रतिबंधक मास्क लावलेले दिसून आले. मात्र त्यांचा उत्साह तसूभरही कमी झाल्याचे जाणवले नाही. सन म्युंग मून यांनी स्थापन केलेल्या या चर्चच्या वतीने वऱ्हाडी मंडळींसह सर्वांसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३० हजारांवर मास्कचे वाटप करण्यात आले हाेते.
दक्षिण काेरियात काेराेनाची बाधा झालेल्यांची संख्या २४ आहे. त्यावर नववधू चोई जी-याँग मनमोकळेपणाने म्हणाली, माझा विवाह झाला. याचा नक्कीच आनंद आहे. परंतु कोरोनाच्या संसर्गाची भीती नव्हती, असे म्हणणे खोटेपणाचे ठरेल, अशी प्रतिक्रिया तिने दिली. सोहळ्यात ६४ देशांतील जोडपी विवाहबद्ध झाली. नवपरिणीत जोडप्यांनी फोटोेसेशनही करून घेतले. याप्रसंगी नातेवाईक-मित्र परस्परांचे अभिनंदन करत होते.
स्तुत्य : ३० हजारांहून जास्त लोकांचा सहभाग
चर्च या इव्हेंटसाठी ४ वर्षांपासून तयारी करत होते. त्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याचा प्रश्नच नव्हता. जगभरातील ३० हजारांहून जास्त लोक यात सहभागी झाले होते. चर्चचे अधिकारी जंग यंग-चुल म्हणाले, खबरदारीचा उपाय म्हणून चीनच्या लोकांना प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
विक्रम : अमेरिकेत ३० हजार वधू-वर विवाहबंधनात
दक्षिण कोरियात १९६१ पासून सामुदायिक विवाहांची परंपरा आहे. तेव्हा काही डझन जोडपीच येत असत. परंतु, नंतर ही संख्या वाढत गेली. १९९७ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये ३० हजार वधू-वरांनी विवाह केला होता. १९९९ मध्ये सेऊलमध्ये २१ हजार वधू-वरांचा विवाह सोहळा झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.