आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक जिल्ह्यात मुसळधार; गाेदावरीला पूर, रामकुंडातील अनेक मंदिरे बुडाली पुराच्या पाण्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - उशिरा का हाेईना वरुणराजाने नाशिक शहर व जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवली. शनिवारी रात्री परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे रविवारी सकाळपासूनच गाेदावरी नदीपात्राच्या पाणीपातळीत वाढ हाेऊन पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. नदीपात्रातील दुताेंड्या मारुती मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागले हाेते. पावसाची संततधार तसेच धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे गाेदाघाटावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली हाेती. परिसरातील दुकादार, नागरिकांनी तातडीने आपले सामान सुरक्षित ठिकाणी हलवले. पूर पाहण्यासाठी माेठी गर्दी झाली हाेती. गाडगे महाराज पूल परिसरात पार्किंग करण्यात आलेली एक कार पुरात अडकली हाेती. काही अतिउत्साही तरुणांनी जीव धाेक्यात घालून पाेहण्याचा आनंद लुटला.


धार्मिक विधी रस्त्यावरच
नाशिक शहरातील रामकुंड परिसरात नदीपात्राला पूर आल्यामुळे अनेक नागरिकांना रस्त्यावरच धार्मिक विधी करावे करण्याची वेळ आली. तसेच रामकुंड, गाेदाघाट परिसरातील अनेक छाेटी मंदिरेदेखील पाण्याखाली गेली हाेती.


घाटात दरड कोसळली 
इगतपुरी - नाशिक- मुंबई मार्गावरील नवीन कसारा घाटात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी रविवारी सकाळी घाटातील ब्रेकफेल पाॅइंटजवळ दरड कोसळली, त्यामुळे मुंबईला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. टोल प्लाझावरील कर्मचारी व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दरड हटवून वाहतूक सुरळीत केली. घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात धुके पसरल्यामुळे वाहनचालकांना दिवसाही दिवे लावून गाड्या चालवाव्या लागत हाेत्या.

 

भावली धरण ३५ तर दारणा २६ टक्के भरले
इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे भावली धरण ३५ टक्के तर दारणा धरण २६ टक्के भरले आहे.

दारणा नदीच्या उगमस्थानी असलेल्या भावली धरणाची क्षमता दीड टीएमसी आहे. रविवारी सकाळपर्यंत या भागात २४ तासांत २११ मिमी पावसाची नोंद झाली. आतापर्यंत एकूण १०४४ मिमी पाऊस झाला आहे. दारणा धरण परिसरात २४ तासांत ६५ मिमी झाला. इगतपुरी शहरातही १७० मिमी पावसाची नाेंद झाली. घोटी (१०५ मिमी), नांदगाव बु. ६५ (मिमी), टाकेद (५९ मिमी), वाडीवऱ्हे (८४ मिमी), धारगाव (१३० मिमी) इतकी नाेंद झाली. इगतपुरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक गाडीचे इंजिन इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी ७.५० च्या सुमारास रुळावरून घसरले. रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंजिनापासून डबे मोकळे करून मालवाहतूक गाडी परत रेल्वे यार्डात नेली. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला नाही.


त्र्यंबकेश्वर- नाशिक वाहतूक काही काळासाठी बंद
त्र्यंबकेश्वर - त्र्यंबकेश्वर येथे शनिवारी सायंकाळपासून ते रविवारी सकाळी साडेसातपर्यंत १३५ मिमी पाऊस पडला. त्यामुळे शहरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले हाेते. पावसाचा वेग वाढल्याने नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्ता काही वेळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. 

 

दारणा, वालदेवी आणि नासर्डी नद्यांनाही पूर
इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह पेठ, सुरगाणा, नाशिक तालुका चिंब भिजून निघाला आहे. रविवारी सकाळी आठपासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नाशिक शहरात ६२ तर तालुक्यात ९४ मिमी पावसाची नाेंद झाली. पावसामुळे दारणा, वालदेवी आणि नासर्डी नदीला पूर आला होता.

बातम्या आणखी आहेत...