आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळपेवाडी दरोड्यातील मास्टरमाइंड पपड्या जेरबंद, साधूची वेशभूषा करून झाला होता पसार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- कोळपेवाडी दरोड्याचा मास्टरमाइंड कुख्यात आरोपी पपड्या काळे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. पपड्यासह २० ते २२ अारोपींनी लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून दुकानाचे मालक श्याम धाडगे यांची गोळी झाडून हत्या केली होती. १९ ऑगस्टला घडलेल्या या घटनेत आतापर्यंत १७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 


सात िकलो सोने व तीन िकलो चांदी असा सुमारे दोन कोटींचा ऐवज लुटला गेल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेने तीन सराफांसह १३ आरोपींना अटक केली. परंतु मास्टरमाइंड पपड्या ऊर्फ संजय ऊर्फ राहुल व्यंकटी ऊर्फ महादू ऊर्फ महादेव ऊर्फ गणपती काळे ऊर्फ तुकाराम चव्हाण (५५, सुदर्शननगर, वर्धा) फरार होता. पपड्या हा बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर तालुक्यातील सेंदला येथील पारधी वस्तीवर पत्नी रेेखा हिला भेटण्यासाठी साधूच्या वेशात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. पवार यांच्या पथकाने सोमवारी (२४ सप्टेंबर) पहाटे ३ वाजता सेंदला येथील पारधी वस्तीवर छापा टाकला. पपड्या पत्नी रेखासह थोड्याच वेळेपूर्वी मेहेकर बसस्थानकाकडे गेला असल्याची माहिती त्यांना मिळाली. पवार यांनी तत्काळ मेहेकर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आत्माराम प्रधान यांना ही माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखा व मेहेकर पोलिसांनी बसस्थानकावर सापळा रचून बसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला पपड्या व रेखाला अटक केली. 


स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पवार यांच्यासह उपनिरीक्षक रोहन खंडागळे, हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, योगेश गोसावी, मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, अण्णा पवार, विनोद मासाळकर, रवी कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, मनोज गोसावी, मन्सूर सय्यद, सचिन अडबल, संतोष लोढे, राहुल सोळुंके, भागीनाथ पंचमुख, योगेश सातपुते, देवीदास काळे, विजय ठोंबरे, बाबासाहेब भोपळे यांच्यासह मेहेर ठाण्याचे निरीक्षक प्रधान, संजय पवार, देवीचंद चव्हाण, गजानन सानप, पंढरी गिते, उमेश घुगे, अतुल पवार, श्रीराम निळे, गणेश लोंढे, संजय जाधव, देवेंद्र इंगळे आदींनी ही कामगिरी केली. 


प्रेयसीचे नाव गोंदले म्हणून सापडला 
पपड्या वेगवेगळी नावे वापरून वावरत होता. सेंदला येथे पारधी वस्तीवर पत्नीला भेटण्यासाठी तो साधूच्या वेशात आला होता. पोलिसांनी पकडले, तेव्हा तो मी नव्हेच असे पपड्याने सांगितले. आपले नाव तुकाराम चव्हाण असल्याचे त्याने सांगितले. परंतु पपड्याच्या छातीवर प्रेयसीचे नाव गोंदलेले असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी छातीवरील 'छबी' हे नाव पाहिले, तेव्हा तो पपड्या असल्याचे स्पष्ट झाले. 


नक्षलवाद्यांकडून ५ लाखांची ऑफर 
पपड्याचे देशभरातील गुन्हेगारी टोळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्याने आतापर्यंत चार खून व दरोड्याचे अनेक गुन्हे केले आहेत. विशाखापट्टणम येथील कारागृहात असताना पपड्याची नक्षलवाद्यांचा म्होरक्या 'अण्णा'शी मैत्री झाली. अण्णाने त्याला १६ नक्षलवाद्यांची एक तुकडी सांभाळण्याची ऑफर दिली. त्यासाठी महिना पाच लाख देण्याची तयारी अण्णाने दाखवली असल्याचेही पोलिस तपासात पुढे आले आहे. 


२५ एकर शेतीचा मालक 
पपड्या हा नेवासे तालुक्यातील सलाबतपूर येथे लहानाचा मोठा झाला. काही दिवस तो बीड जिल्ह्यात राहिला. नंतर वर्धा शहरात स्थायिक झाला. वर्धा शहरातील उच्चभ्रू वस्तीत त्याचा पाच गुंठे जागेवर टोलेजंग बंगला आहे. तेथे २५ एकर शेती त्याने घेतलेली आहे. त्याला चार बायका व दोन प्रेयसी असून त्याच्या मुलांना चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. राज्यभरातील पारधी समाजाला पपड्या नाव ओळखीचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...