आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: जिल्हाधिकारी कार्यालयावर मातंग समाजाचा विराट मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सकाळपासून सुरु असलेली पावसाची रिपरिप.. दुपारी काही कालावधीसाठी कोसळणार्या मुसळधार पाऊसधारा.. अन् सायंकाळपर्यंत सुरु असलेली संततधार.. अशा दिवसभराच्या पावसाळी वातावरणात अनेकांनी घराबाहेर न पडणे पसंत केले. पण या भर पावसातही मोठ्या संख्येने निघालेला सकल मातंग समाज क्रांती मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर येवून धडकला. आपल्या २३ मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. समाजातील दुर्बल समुह व युवकांसमोर असलेल्या बेरोजगारी, शैक्षणिक प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली.

 

अनुसुचित जातीच्या एकूण १३ टक्के आरक्षणाची अ, ब, क, ड वर्गवारी करावी, त्यासाठी नेमलेल्या लोकुर समितीची, ड. का. मेहरा आयोगाची व डॉ. बाबासाहेब गोपले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या "लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या' शिफारशींची अंमलबजावणी करावी. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या २९ विधानसभा मतदारसंघापैकी १६ मतदारसंघात चर्मकार, ९ मतदारसंघात महार, तर ३ मतदारसंघात मातंग समाजाचे आमदार नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे ही वर्गवारी आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


संविधान जाळणाऱ्या व देशविरोधी घोषणा देणाऱ्या समाजकंटकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी. त्यांच्याविरुद्ध फौजदारी व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवावा. अण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करावी. ग्रामीण भागात बेरोजगार मातंग कुटुंबियांना ५ एकर जमीन द्यावी. अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या जाचक अटी शिथील कराव्यात. या महामंडळाला केंद्र शासनाने १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा. वितरित केलेले कर्ज माफ करावे, या मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.

 

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा. साठे व लहुजी साळवे यांच्या स्मारकांसाठी पुण्यात शासकीय जमीन द्यावी. या महापुरुषांच्या जयंतीदिनी शाळा, कॉलेजांत कार्यक्रम अनिवार्य करावे. मातंग समाजातील कलावंतांचे पुनर्वसन करावे. बोधेगाव ता. शेवगावात राष्ट्रीय कला विद्यापीठ व स्मारक बांधावे, यांसह इतर मागण्यांचाही समावेश आहे. दुपारी पावसात निघालेला सुमारे एक हजार जणांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. बाजार समिती चौकाशेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. औरंगाबाद महामार्गाने पायी चालत निघालेला मोर्चा चांदणी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळाला. रस्त्याच्या एका बाजूने शिस्तीत मोर्चा निघाल्याने वाहतूक कोंडी झाली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळाने निवेदन देत चर्चा केली. त्यानंतर माेर्चा विसर्जित झाला.

बातम्या आणखी आहेत...