आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृत्वाचे संस्कार २३ हजार कि. मी. प्रवासातून रुजवले, माधुरी सहस्रबुद्धे यांनी हातात घेतली मोहीम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ पाठक 

औरंगाबाद - मातृत्वाच्या संस्कारांचा अमूल्य वारसा भारतीय संस्कृतीतून मिळाला. यातून अनेक महापुरुष घडले. हेच महत्त्वपूर्ण मातृत्व संस्काराचे बीज जगभरात रुजवण्याची मोहीम माधुरी सहस्रबुद्धे यांनी हातात घेतली. तब्बल २३ हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी बावीस देशांत या संस्कारांचे बीज रोवले आहे. यात संस्कारांचे महत्त्व लक्षात घेऊन जॉर्जियाच्या शिक्षणमंत्री मून यांनी भारतामध्ये कुटुंब एकत्र पद्धतीचा अनुभव घेतला. जागतिक दौऱ्याच्या या मोहिमेवर माधुरी यांच्यासोबत तिघींचा सहभाग होता. येत्या बुधवारी औरंगाबाद येथे आयोजित व्याख्यानमालेसाठी माधुरी सहस्रबुद्धे या मोहिमेचा अनुभव कथन करणार आहेत.मातृत्व संस्कारांमध्ये मोठी शक्ती आहे. यामुळेच भारतामध्ये मोठ्या क्षेत्रात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांची घडण झाली आहे. मात्र, आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये महत्त्वाचे संस्कार कमी पडत आहेत. यामुळे समाजामध्ये गुन्हेगारी आणि विपरीत परिस्थिती निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती वाढत आहेत. त्यामुळेच आज मातृत्व संस्कार रुजवण्याची गरज जाणवत आहे. जागतिक स्तरावर हीच मोहीम हाती घेऊन आम्ही संस्काराचे बीज रोवले आहे, असेही त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.जबाबदारीची जाणीव महत्त्वाची 

महिलांच्या हक्क आणि अधिकारांसाठी पुढाकार घेतला जातो. यासाठी लढाई उभारण्याची प्रत्येकाची तयारी असते. हेच कार्य करत असताना आजची महिला आपल्या जबाबदारीपासून दुरावत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे मातृत्व संस्कार कमी पडत आहेत. हे बीज अधिक घट्ट करण्याची गरज असल्याचे वाढत्या विपरीत घटनांमुळे लक्षात येते. त्यामुळे मुलांवर संस्कार करण्याची जबाबदारीही आपलीच असल्याचे लक्षात घेणे गरजेचे आहे, असेही माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या.
 

सात देशांच्या बत्तीस महिला


भारतात एकत्र कुटुंब पद्धतीला महत्त्वाचे स्थान आहे. घरातील प्रत्येकात यामुळे आपसूक जवळीक निर्माण होते. हीच एकत्र कुटुंब पद्धती सात देशांच्या बत्तीस महिलांना अधिकच महत्त्वपूर्ण व लक्षवेधी वाटली. त्यामुळे त्यांनी भारतात पुणे, ग्वाल्हेर, गुवाहाटी, दिल्लीत एकत्र कुटुंब पद्धती अनुभवली. या सर्व कुटुंब सदस्यांसोबत यांनी तीन दिवस घालवले. यात जॉर्जियाच्या शिक्षणमंत्री मून यांचाही समावेश होता.
 

भाषा अनेक, विचार एकच 


२२ देशांच्या प्रवासादरम्यान अनेक भाषांच्या महिला भेटल्या. भाषा अनेक असल्या तरी सामाजिक क्रांती आणि कार्याची विचारसरणी मात्र एकच असल्याचे दिसते. त्यामुळेच मातृत्व संस्कार रुजवण्याचे काम अधिक सोपे आणि सखोल पद्धतीने झाले. जॉर्जिया, इराण यांसारख्या देशांमध्ये हे संस्कार अधिक महत्त्वाचे मानले गेले आहेत, असे निदर्शनास आले, असेही त्या म्हणाल्या.ग्लोबल मदर संकल्पना रुजवणार

मातृशक्ती संस्कार आणि एकत्र कुटुंब पद्धती याच काळाची गरज आहे. या दोन्हींमध्ये समन्वय घडवण्यासाठी महिला महत्त्वाचा दुवा मानला जातो. तेवीस हजार किलोमीटरच्या प्रवासातून हे सातत्याने लक्षात आले. त्यामुळे आता ग्लोबल मदर ही संकल्पना राबवण्याची मोहीम हाती घेणार आहे. यामुळे मातृत्व संस्कार अधिक सखोलरीत्या रुजवले जातील. - माधुरी सहस्रबुद्धे