आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mathematical Formulas For Children To Be Painted On The Walls Of 20 Villages For Reducing The Fear Of Maths From Children's Mind

मुलांसाठी 20 गावांतील भिंतींवर रेखाटली गणिताची सूत्रे, विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर करण्यासाठी स्वखर्चाने केली सुरुवात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : गणित विषय म्हटला की अनेकांच्या मनात धडकी भरते. परीक्षेला जाताना गणिताची सूत्रे लक्षात ठेवणे म्हणजे जिकिरीचे काम वाटते, परंतु चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा आणि मूल तालुक्याच्या २० गावांच्या भिंती या गणिताच्या सूत्रांनी रंगलेल्या आहेत. गणिताविषयी मुलांच्या मनातील भीती घालवण्यासाठी अभियंता तरुण अक्षय वाकुडकर आणि त्याच्या २० मित्रांनी हा 'मिशन मॅथेमॅटिक' उपक्रम सुरू केला असून त्यामुळे विद्यार्थ्यांना आता जाता-येता गणिताची अवघड सूत्रे पाठ करणे सोयीचे झाले आहेच, पण त्यामुळे गणिताविषयीची भीतीही हळूहळू दूर होत आहे.

अक्षय मूळचा घोसरी गावचा आहे. घोसरीत पहिली ते पाचवी जि. प. ची शाळा आहे. त्यानंतर मुले २ कि. मी. वरील नांदगाव येथे शिकायला जातात. सुमारे ६०० घरे असलेल्या घोसरीची लोकसंख्या १,८८९ इतकी आहे. शेतकरी कुटुंबातील अक्षयने नागपुरात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतली असून सध्या तो इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या परीक्षेची तयारी करत आहे. वडील हरिदास वाकुडकर यांनी त्याला गावात शिक्षणासाठी काही तरी कर, असा सल्ला दिला होता. मुलांना गणित हा विषय सर्वाधिक भेडसावत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे मुलांच्या मनातील भीती घालवण्यासाठी गावातील घरांच्या भिंतीच गणिताच्या सूत्रांनी रंगवायचे ठरवले, असे अक्षयने सांगितले. हा उपक्रम यशस्वी होईल, यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे गावकरी साशंक होते. यशापयशाचा विचार न अक्षय व त्याच्या मित्रांनी सुरुवात केली.

अभियंत्यासह २० मित्रांचे 'मिशन मॅथेमॅटिक', चंद्रपूर जिल्ह्यात आगळा उपक्रम

ग्रामीण विद्यार्थ्याच्या मनातील गणिताची भीती दूर करण्यासाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त आहे. गणितात अपयशी ठरल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व्यवहारात पारंगत होत नाहीत. भिंतीवर गणिताची सूत्रे असल्यामुळे मुले सहज पाठ करतात. पोंभुर्णा व मूल तालुक्यात प्रत्येक शाळेत जाऊन अक्षय मुलांना गणित समजावून सांगतो. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. - प्रशांत झाडे, उपसरपंच, भोसरी

सध्या मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. गावातील भिंतींवर गणिताची सूत्रे रंगवल्याने जाता-येता पाठ होतात. शिवाय अक्षय सरांची समजावून सांगण्याची पद्धतही खूप सोपी आहे. केवळ पहिली ते दहावीच नव्हे, तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यामुळे खूप फायदा होत आहे. - रूपाली व्याहाडकर, एम.ए. इकॉनॉमिक्स

याचे श्रेय मित्रांना

सुरुवातीला आमच्याकडे संशयाने पाहणारे गावकरी आज कौतुक करत शाबासकी देत आहेत. या उपक्रमाचे श्रेय मित्रांना आहे. प्रत्येकाने कामे विभागून घेतली आहेत. यापुढे हा उपक्रम प्रथम जिल्हाभर, नंतर विभाग आणि नंतर वाढवत वाढवत राज्यभर नेण्याचा मानस अक्षयने बोलून दाखवला.

बातम्या आणखी आहेत...