आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरात पाऊस : माथेरान देशात सर्वात जलमय स्थान, ४५० मिमी पावसाची नोंद; राज्यातील धरणांत आवक वाढली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून लोकप्रिय असणारे माथेरान शनिवारी देशातील सर्वांत जलमय स्थान ठरले. शनिवारी दिवसभरात माथेरानला तब्बल ४५०  मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचप्रमाणे शनिवारी महाराष्ट्राचीही हे देशातील सर्वांत जलमय राज्य म्हणून नोंद झाली. विदर्भ आणि काही प्रमाणात मराठवाडा वगळता उर्वरित सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्याने शनिवारी अनुभवला. त्यातही राज्यातील ४२ ठिकाणी पावसाने २४ तासांत तीन आकडी संख्या गाठली, हेही वैशिष्ट्यपूर्ण ठरले. 


मुसळधार पावसाने पाण्याखाली गेलेले रेल्वे रूळ, ठिकठिकाणी कोसळणाऱ्या दरडी आणि ट्रॅकवर सतत साचणारा दगड, मातीचा ढीग यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुणे -मुंबईसह इतरही गाड्या सोमवारपर्यंत रद्द केल्याचे जाहीर केले. डेक्कन क्वीन, पनवेल - नांदेड, मुंबई - हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्या सोमवारपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी सकाळनंतर काहीशी विश्रांती घेतली. अधूनमधून सरी कोसळत असल्या तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांत आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाची बॅटिंग अजून सुरू असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. पुण्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खडकवासला धरण पूर्ण भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. जुलैच्या अखेरीस पुन्हा धरण काठोकाठ भरल्याने मुठा नदीत शनिवारी रात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.  चासकमान धरणातून भीमा नदीतसाडेपाच हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. भीमा खोऱ्यातील कळमोडी, आंद्रा आणि खडकवासला धरणे पूर्ण भरली आहेत. मात्र पिंपळगाव जोगे, घोड, नाझरे आणि उजनी धरणांची स्थिती पावसाअभावी जैसे थे आहे. भीमा खोऱ्यातील पंचवीसपैकी वीस धरणांच्या क्षेत्रात पावसामुळे स्थिती सुधारली आहे.

 

कोयना धरणात ६३ टीएमसी पाणीसाठा
सांगली, कोल्हापूर, सातारा या तीन जिल्ह्यांत गेल्या ४८ तासांत संततधार पावसाच्या हजेरीने परिसर जलमय झाला आहे. तिन्ही जिल्ह्यांतील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याने कोयना, धारणेसह अन्य धरणांतही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीने दुसऱ्यांदा पात्र ओलांडले असून कृष्णा नदीच्या पाण्याची पातळीही विविध ठिकाणी ३० फुटांवरून अधिक झाली आहे. महाराष्ट्राच्या वरदायिनी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात ६३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 

 

कसारा घाटात रस्त्याला तडे, वाहतूक विस्कळीत

इगतपुरी | मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर जुन्या कसारा घाटात अतिवृष्टीमुळे रस्त्याला शनिवारी तडे गेले आहेत. यामुळे कसारा घाटात अनेक तास एकेरी वाहतूक सुरू होती. युद्धपातळीवर काम करून या रस्त्याची डागडुजी करण्याचे काम रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते. शनिवारी रात्री १० वाजता पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांना गस्त घालताना रस्त्याला तडे गेल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ एकेरी वाहतूक करत वाहनधारकांच्या सोयीसाठी सेफ्टी कोन, बॅरिकेड, साइन बोर्ड लावले. मुसळधार पाऊस असूनही रविवारी सकाळपासून डागडुजीला सुरुवात करण्यात आली आहे.

 

नाशिक जिल्ह्यातील ४ तालुक्यांत संततधार, गोदावरीसह अन्य नद्यांच्या पातळीत वाढ

नाशिक | सलग तीन दिवस मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठा तसेच भूजल पातळीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. सलग तीन दिवसापासून संततधार सुरू अाहे. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुटीचे असल्याने चाकरमान्यांच्या सुटीवर पाणी फेरले गेले. 
पहिने, त्रंबकेश्वर, भावली डॅम, हरिहर किल्ला, नांदूर मधमेश्वर, सोमेश्वर धबधबा या ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. रविवारी पेठ, सुरगाणा, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पावसाचा जोर पाहण्यास मिळाला. मात्र, अन्य भागांत अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे उर्वरित आठ तालुक्यांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे चित्र आहे.  त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यामध्ये धरणाची संख्या मोठ्या प्रमाणात असून धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दारणा, गोदावरी, नासर्डी आणि वालदेवी नद्यांच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू होता. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली असून या ठिकाणी अनेक युवक धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊन जीव धोक्यात टाकताना दिसून येत होते.

 

दोन दिवसांत उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात ९ टक्क्यांची वाढ  

सोलापूर | मागील दोन दिवसांपासून धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.  गतवर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे १०९ टक्के असलेले धरणातील पाणीसाठा उणे ५९ टक्के एवढ्या नीचांकी पातळीवर गेला होता. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापपर्यंत एकही मोठा पाऊस झाला नाही. पण उजनीच्या वर असलेल्या पुणे जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने शनिवारी दुपारपासून विसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. धरणात शनिवारी सायंकाळी दौंडचा ५६ हजार ६४५ क्युसेक व बंडगार्डनचा २४ हजार १७२ क्युसेक विसर्ग होता. तर उजणी धरणात एकूण ८० हजार ८१७ क्युसेकचा विसर्ग सुरू होता. परंतु दुपारपासून यात वाढ होऊन पाणीसाठा रविवारी दुपारी उणे १७.५४ टक्क्यांवर आला.

बातम्या आणखी आहेत...