आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माउलींचा संजीवन समाधी सोहळा 25 नोव्हेंबर रोजी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : आषाढी वारीसाठी इंद्रायणीच्या तीरावर अलंकापुरीत जमून पंढरपूरपर्यंत वाटचाल करणाऱ्या लक्षावधी वारकऱ्यांची पावले कार्तिकी वारीचे औचित्य साधून पुनश्च क्षेत्र आळंदीकडे वळणार आहेत. भाविकांच्या आस्थेचा विषय असणारा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा यंदा आळंदी येथे २५ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. त्याला जोडून २० नोव्हेंबरपासून देवस्थान समितीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.


आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे म्हणाले, 'यंदा द्वादशीला तिथीक्षय झाल्याने माउलींचा संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य त्रयोदशीला (२५ नोव्हेंबर) होणार आहे. सोहळ्यानिमित्त कार्तिकी वारीचा प्रारंभ २० नोव्हेंबरला देऊळवाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीचे पूजन करून होईल. यंदा माउलींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा होणार आहे. कार्तिकी एकादशी २३ नोव्हेंबरला आहे. त्यानंतरच्या तिथीक्षयामुळे समाधी सोहळा एक दिवस पुढे जाणार आहे. राज्यातील विविध दिनदर्शिकांमध्ये सलग दोन एकादशी दर्शवल्या आहेत. मात्र, संप्रदाय भागवत एकादशी साजरी करत असल्याने २५ नोव्हेंबरला समाधी सोहळा होणार आहे. भाविकांनी, वारकऱ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

संजीवन समाधी सोहळ्याची परंपरा
माउलींनी संजीवन समाधी घेतली, याचा अर्थ ज्या पंचमहाभूतांनी आपले मानवी शरीर बनलेले असते, ते भाग त्या त्या महाभूतांत विलीन झाले. मात्र, माउलींचे चैतन्य, ऊर्जा आणि स्पंदनरूपी अस्तित्व आजही जा‌णवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तो दिवस साजरा करण्याची, माउलींचे दर्शन घेण्याची, त्यांचा उपदेश आचरणात आणण्यासाठी गेल्या ७२३ वर्षांपासून हा संजीवन समाधी सोहळा साजरा केला जातो. या वेळी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात.

असे होतील कार्यक्रम
२० नोव्हेंबर - सकाळी ७ ते ९ वाजेदरम्यान गुरू हैबतबाबांच्या पायरीचे पूजन
२१ नोव्हेंबर - भाविकांच्या महापूजा, कीर्तनसेवा, महानैवेद्य
२२ नोव्हेंबर - समाधी प्रसंगावर आधारित कीर्तनसेवा
२३ नोव्हेंबर - मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत पवमान अभिषेक
२४ नोव्हेंबर - धूपारती आणि समाधीचे दर्शन
२५ नोव्हेंबर - दुपारी एक वाजता पालखीची नगरप्रदक्षिणा
रात्री दोनपर्यंत जागर, नामदास महाराज कीर्तन, महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, पुष्पवृष्टी
 

बातम्या आणखी आहेत...